आम्ही काय प्रकाशित करतो
प्रकल्पग्रस्तांच्या बातम्या
प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने
प्रकल्पग्रस्तांची कर्तृत्वे
मत-मतांतरे
संपादकांस पत्रे
बातमी-लायक फोटो (Geo-Tagged)
बातमी-लायक व्हिडिओ
स्थानिक संस्कृतीविषयक लेख
स्थानिक भाषांमधील साहित्य
प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने
भूमिका
नवी मुंबई शहर वसविण्यासाठी येथील स्थानिकांच्या जमिनी सिडकोने हिसकावून घेतल्या त्यास आज २०२४ साली सुमारे पन्नास वर्षे होत आली. मात्र ह्या पाच दशकांच्या प्रदीर्घ कालावधीत नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांना ह्या प्रकल्पामुळे कोणकोणत्या आपत्तींना, हाल-अपेष्टांना, व मानसिक आघातांना सामोरे जावे लागले ह्याची सरकारदरबारी पुसटशी देखील नोंद घेतलेली कुठे आढळत नाही. नवी मुंबईच्या गैर-सरकारी इतिहासातदेखील पोटभरू खाजगी संशोधक व अभ्यासकांनी प्रकल्पग्रस्तांचा काहीएक दृष्टिकोन असू शकतो ह्याचे जरादेखील भान ठेवल्याचे दिसत नाही. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींचे भूखंड लाटून त्यांवर आलिशान कार्यालये थाटलेल्या प्रस्थापित प्रसारमाध्यमांच्या एका गटाने तर नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त समाजाला नेहमीच कृतघ्न ठरविले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त म्हणजे सिडकोच्या जीवावर मजा मारणारे ऐदी लोक असा एक फार गोड गैरसमज अगदी पद्धतशीरपणे निर्माण केला गेला आणि त्यास सातत्याने खतपाणी घालण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नवी मुंबईच्या इतिहासातील भूसंपादनाच्या काळ्याकुट्ट अध्यायास उजेडात आणून येथील प्रकल्पग्रस्तांच्या जीवनाची दारुण सत्यस्थिती जगासमोर मांडण्यासाठी आपल्याकडे एकच - पण अतिशय प्रभावी - साधन उरते, ते म्हणजे : प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने!
१९७५ च्या सुमारास स्थानिकांच्या विरोधास न जुमानता त्यांच्या जमिनी सिडकोने कवडीमोलाने (तत्कालीन बाजारभावाच्या १०% पेक्षाही कमी किमतीस) नवी मुंबई शहरासाठी संपादित केल्या. मात्र सिडकोने संपादित केलेल्या ह्या जमिनी काही माळराने किंवा वरकस नापीक जमिनी नव्हत्या तर खरीप हंगामात भात आणि रब्बी हंगामात तिळापासुन वालापर्यंतची सर्व द्विदल धान्ये भरभरून पिकविणाऱ्या कसदार शेत जमिनी होत्या. स्थानिकांच्या अगणित पिढ्यांचे पालन-पोषण करणाऱ्या ह्या सुजलाम सुफलाम शेत जमिनीत मुरुमाचे डंपरच्या डंपर ओतून आमच्या काळ्या आईला जिवंत गाडून सिडकोने नवी मुंबई शहराची पायाभरणी केली! ही तुघलकी आपदा ज्यांना स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी बघावी लागली त्यांपैकी आमच्यासारख्या तेव्हाच्या गुडघ्याएवढ्या पोरांनीदेखील आज चाळीशी ओलांडली आहे. म्हणजेच सिडकोच्या ह्या अ-लोकशाही भूसंपादन प्रक्रियेचे पूर्णस्वरूप प्रकल्पग्रस्तांची जी पिढी आपल्या प्रौढावस्थेपासून पाहत आलेली आहे त्या पिढीने आता वयाची साठी ओलांडली आहे. साहजिक आहे की नवी मुंबईच्या काळ्याकुट्ट इतिहासाचे हे साक्षीदार निसर्गनियमानुसार लवकरच नामशेष होत जातील. आणि त्यांच्याबरोबरच त्यांनी पाहिलेला हा इतिहासदेखील! त्यामुळे ह्या दडपल्या गेलेल्या इतिहासाची पद्धतशीर नोंद होण्यासाठी सदर पिढीतील प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने येत्या दशकभरात प्रसिद्ध होणे फार गरजेचे आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांची ही आत्मकथने ऑडिओ/व्हिडिओ स्वरूपात गोळा करणे, त्यांना संग्रहित करणे, त्यांचे शब्दांकन व भाषांतर करून त्यांना पुस्तकस्वरूपात प्रकाशित करणे अत्यावश्यक आहे. काळाची ही गरज ओळखून सीताराम म्हात्रे फाऊंडेशनने प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने हा मौखिक इतिहासपद्धतीचा उपक्रम हाती घेतला आहे.
आता मौखिक इतिहासपद्धती म्हणजे काय? मौखिक इतिहास म्हणजे काय? मौखिक इतिहासाची व्याख्या मराठी विश्वकोशात खालील प्रकारे केली आहे :
***जलद दुवे***
आत्मकथन : सौ. एकादशी का. म्हात्रे
प्रकल्पग्रस्तांच्या मुलाखतीची प्रश्नावली
मुलाखतीची प्रमाणित कार्यप्रणाली
प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने : अर्काइव्ह
ऐतिहासिक घटनांमधील साक्षीदारांकडून त्यांच्या स्मृतींवर आधारित माहिती गोळा करणे व त्यांचे विश्लेषण करणे म्हणजे मौखिक इतिहास होय... असंरचित मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तीकडून एखाद्या घटनेची, कार्यक्रमाची किंवा क्रियेची माहिती गोळा करण्याची ही पद्धती होय... मौखिक इतिहासाचा मुळ उद्देश अशा व्यक्तिची मुलाखत घेण्याचा असतो की, ज्याला इतिहासातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे एखादा महत्त्वपूर्ण अलिखित इतिहास उलगडण्यासाठी लोकांचा दबलेला आवाज पुढे आणण्याचे, लोकांना व्यक्त करण्याचे मौखिक इतिहास हे एक साधन आहे... मौखिक इतिहासपद्धतीमुळे दुर्लक्षित घटकांची जाणीव, संवेदना समजून घेण्यास मदत होते. मौखिक इतिहास हा सत्ताधारी घटकाकडून न येता, तो थेट भोगलेल्या व्यक्तिच्या तोंडून बाहेर येत असतो.
वरील परिच्छेदावरून सहज लक्षात येईल की व्यवस्थेने दडपलेला आपला आवाज व विस्मृतीच्या गर्तेत ढकलला गेलेला आपला इतिहास पुन्हा एकदा जिवंत करण्याकरिता आपणां प्रकल्पग्रस्तांसाठी आत्मलेखन हे किती महत्वाचे साधन आहे. त्यासाठीच फाऊंडेशनने मौखिक इतिहासपद्धतीच्या मानदंडांचे पालन करून एक मुलाखत प्रश्नावली व मुलाखतीची प्रमाणित कार्यप्रणाली तयार केली आहे, जेणेकरून मुलाखतकारांना प्रकल्पग्रस्तांची ही आत्मकथने गोळा करणे सोयीचे होईल. कोण असतील बरे हे मुलाखतकार? समाजातील कोणतीही संवेदनशील साक्षर व्यक्ती! आमच्या ह्या उपक्रमाअंतर्गत मुलाखतकार बनण्यासाठी आवश्यक अशी एकच पात्रता - ती म्हणजे प्रकल्पग्रस्तांचा दृष्टिकोन समजून घेण्याची कुवत. आणि आवश्यक असे एकच कौशल्य - ते म्हणजे समोरच्याचे बोलणे संयमपूर्वक ऐकणे.
तर अशा ह्या मुलाखतकारांनी वर दिलेल्या प्रश्नावलीच्या साहाय्याने प्रमाणित कार्यप्रणालीचे पालन करून आपल्या कुटुंबातील व परिसरातील ज्येष्ठ प्रकल्पग्रस्तांच्या मुलाखती घेऊन त्या पद्धतशीरपणे मोबाईलमधील व्हॉइस रेकॉर्डिंग ॲपच्या साहाय्याने रेकॉर्ड करून त्या सीताराम म्हात्रे फाऊंडेशनकडे पाठवल्यानंतर त्या मुलाखतींचे फाऊंडेशनद्वारे शब्दांकन व भाषांतर करण्यात येईल. तदनंतर सदर मुलाखती छापील व डिजिटल स्वरूपात We, the PAP । आम्ही प्रकल्पग्रस्त ह्या नियतकालिकामधून तसेच फाऊंडेशनच्या वेब व सोशल पानांवर नियमितपणे प्रकाशित करण्यात येतील. त्याचबरोबर कालांतराने फाऊंडेशनद्वारे ह्या मुलाखतींचे संग्रह छापील पुस्तक व ईबुक स्वरूपात 'ना नफा, ना तोटा' तत्वावर प्रकाशित करण्यात येतील. तसेच ह्या मुलाखतींचे मूळ ऑडिओ मौखिक इतिहासपद्धतीच्या मानदंडांनुसार संग्रहण (archive) करून सीताराम म्हात्रे फाऊंडेशनच्या वेबसाईटवर भविष्यात अभ्यासक व संशोधकांसाठी उपलब्ध केले जातील.
ह्याव्यतिरिक्त एखाद्या प्रकल्पग्रस्ताने स्वतःच्या शब्दांत आपले आत्मकथन लिहून आमच्याकडे पाठवल्यास तेदेखील आम्ही आमच्या ह्या उपक्रमाअंतर्गत प्रकाशित व संग्रहित करू. तसेच एखाद्या प्रकल्पग्रस्ताने नवी मुंबईचा हा अपरिचित इतिहास उलगडणारे आपले आत्मचरित्र लिहिल्यास आम्ही तेदेखील आमच्या नियतकालिकामधून व पुस्तक स्वरूपात प्रकाशित करू.
तसेच कोणा प्रकल्पग्रस्तास आत्मकथन करावयाचे आहे परंतु त्यांची मुलाखत घ्यायला मुलाखतकार उपलब्ध होत नाही अशी स्थिती असल्यास आम्हाला +91-865-735-1636 ह्या मोबाईल क्रमांकावर कळवा, त्यांचे आत्मकथन त्यांच्या सोयीच्या ठिकाणी रेकॉर्ड करण्याची व्यवस्था फाऊंडेशनद्वारे करण्यात येईल.
चला तर, आपल्या कुटुंबातील व परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या मुलाखती रेकॉर्ड करून त्या प्रकाशित व संग्रहित करू या. आम्हाला पूर्ण खात्री आहे की प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण येत्या दहा वर्षांत केवळ नवी मुंबईच्या अलिखित इतिहासातच नव्हे तर अखंड भारतातील मौखिक इतिहास प्रकल्पांमध्ये देखील मोलाची भर घालू शकू.
प्रकाशन : १ मार्च, २०२४


