इंग्रजी सर्वांसाठी
इंग्रजी संभाषण आज एक अशी साधनसंपत्ती होऊन बसली आहे जी आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक तर आहे परंतु समाजातील एक फार मोठा वर्ग त्या साधनसंपत्तीपासून वंचित राहतो आहे, कारण इंग्रजी संभाषण हे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून शिकलेल्यांची मक्तेदारी बनली आहे तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून शिक्षण हे फक्त सधन वर्गालाच परवडण्याजोगे! इंग्रजी संभाषण ही फक्त सधन वर्गाचीच मक्तेदारी बनून राहू नये व ही साधनसंपत्ती समाजातील सर्वांत शेवटच्या वर्गापर्यंत पोहचावी आणि त्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त व्हावा हे इंग्रजी सर्वांसाठी (English for ALL) ह्या आमच्या उपक्रमाचे उद्दिष्ट्य आहे. इंग्रजीचे लोकशाहीकरण हे भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या इतर साधनसंपत्तींच्या समान वाटपाइतकेच महत्वाचे आहे हे ध्यानी घेऊन या उपक्रमांतर्गत निम्न उत्पन्न गटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषणाचे प्रशिक्षण देणाऱ्या निःशुल्क कार्यशाळा फाऊंडेशनतर्फे घेण्यात येत आहेत. भविष्यात नवी मुंबई परिसरातील महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांकरिता निःशुल्क इंग्रजी संभाषण वर्ग सुरु करण्याचा आमचा मानस आहे.



***जलद दुवे***
क्षणचित्र दालन
मातोश्री तुलसीबाई सीताराम म्हात्रे शिष्यवृत्ती
क्षणचित्र दालन
"इंग्रजी सर्वांसाठी" ह्या आमच्या उपक्रमाची पुढची तर्कसंगत पायरी म्हणजेच "रोजगारासाठी इंग्रजी" (English for Employment) हा अभिनव उपक्रम फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येत आहे. ह्या उपक्रमांतर्गत निम्न उत्पन्न गटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता कार्यशाळा आयोजित करून इंग्रजी संभाषण व लेखन कौशल्यांद्वारे सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या परंतु फारशा चोखाळल्या न जाणाऱ्या करिअर संधींबद्दल सखोल माहिती दिली जात आहे. ह्या कार्यशाळांमधून निर्माण झालेली जागरूकता कौशल्यांमध्ये परिवर्तित करण्यासाठी सदर विद्यार्थ्यांना Certificate in Computer Assisted Translation हा निःशुल्क अभ्यासक्रम शिकविला जात आहे. अंतरराष्ट्रीयीकरणाचा अविभाज्य अंग असलेल्या स्थानिकीकरणाच्या (Localization) क्षेत्रामध्ये रोजगार संधी उपलब्ध करून देणाऱ्या सदर अभ्यासक्रमाकरिता प्रवेश परीक्षा घेऊन पात्र विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गांमध्ये व संगणक प्रयोगशाळांमध्ये भाषांतराचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जात आहे.
"रोजगारासाठी इंग्रजी" ह्या उपक्रमांतर्गत निःशुल्क भाषांतर वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "शिकता-शिकता कमवा" योजना फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येत आहे. ह्या योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या भाषांतर कार्याचे मानधन फाऊंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनी वितरित करण्यात आले.




गैर-इंग्रजी शाळांमधून शिकणाऱ्या व शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीबद्दलची भीती जाऊन त्या जागी इंग्रजीबद्दल प्रीती निर्माण व्हावी यासाठी सीताराम म्हात्रे फाऊंडेशनने English for All पारितोषिके देणे सुरु केले आहे. इंग्रजी भाषा व इंग्रजी संप्रेषण कौशल्यांसंबंधित विषयांमध्ये सर्वोच्च गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पारितोषिक देण्यात येते. सन्मानचिन्ह व इंग्रजी भाषा विषयक पुस्तके असे ह्या पारितोषिकांचे स्वरूप आहे. नवी मुंबईतील शाळा व महाविद्यालयांमध्ये ही पारितोषिके वितरित करण्यात येत आहेत.



शालेय विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी वाचनाची सवय रुजावी व त्यायोगे त्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व वाढावे ह्या उद्देश्याने सीताराम म्हात्रे फाऊंडेशन महानगरपालिका संचालित शाळांच्या ग्रंथालया ंना देणगी स्वरूपात ललित व ललितेतर पुस्तके भेट देते. ही पुस्तके शालेय विद्यार्थ्यांचे वय, प्रवृत्ती व भावनिक गरजा लक्षात घेऊन निवडली जातात व शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या हाती सुपूर्द केली जातात.

फाऊंडेशनच्या कोषाध्यक्ष ग्रीष्मा पाटील अभ्युदय नगर मुंबई पब्लिक स ्कूल, काळाचौकी ह्यांना पुस्तके भेट देताना.