आम्ही काय प्रकाशित करतो
प्रकल्पग्रस्तांच्या बातम्या
प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने
प्रकल्पग्रस्तांची कर्तृत्वे
मत-मतांतरे
संपादकांस पत्रे
बातमी-लायक फोटो (Geo-Tagged)
बातमी-लायक व्हिडिओ
स्थानिक संस्कृतीविषयक लेख
स्थानिक भाषांमधील साहित्य
प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने
मुलाखतीची प्रमाणित कार्यप्रण ाली
प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने ह्या उपक्रमासाठी प्रकल्पग्रस्तांच्या मुलाखती घेताना मुलाखतकारांनी खालील कार्यप्रणालीचे कोटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे जेणेकरून ही आत्मकथने आपणांस जास्तीत जास्त शास्रोक्तपणे संकलित, प्रकाशित व संग्रहित करता येतील आणि भविष्यकालीन अभ्यासकांसाठी व जनसामान्यांसाठी उपलब्ध करून देता येतील. यासाठी -
मुलाखतीआधी :
-
तुमच्या फोनमधील तुमच्या पसंतीच्या ऑडिओ रेकॉर्डिंग ॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन शक्य असल्यास “Interview Mode” ऑन करा जेणेकरून तुमच्या फोनमधील दोन्ही बाजूचे मायक्रोफोन एकाच वेळी सक्रिय होतील.
-
कोणालातरी सोबत घेऊन कमीत कमी १० मिनिटांची नमुना मुलाखत रेकॉर्ड करून पहा जेणेकरून मुलाखतीच्या वेळी आत्मकथनकार व मुलाखतकार यांच्या बैठकीची आदर्श व्यवस्था, तुमचा मोबाईल फोन धरण्याची/ठेवण्याची आदर्श स्थिती यांसारख्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील.
-
मुलाखतीच्या किमान एक-दोन दिवस आधी आत्मकथनकारास प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने : प्रश्नावली व मुलाखतीच्या सर्वाधिकारांचे हस्तांतरणची एक प्रत द्या जेणेकरून त्यांना त्या प्रश्नांसंबंधी विचार करण्यास व संबंधित आठवणींना उजाळा देण्यास पुरेसा वेळ मिळेल. मात्र प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी आत्मकथनकाराने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहिजे असे नाही हे लक्षात असू द्या. तसेच मुलाखत कोणत्याही क्षणी संपविण्याचा पूर्ण अधिकार आत्मकथनकारास असेल हेही ध्यानी असू द्या.
-
मुलाखतीस जाताना मोबाईल बरोबर सोबत एखादी डायरी आणि पेनदेखील ठेवा. आत्मकथनकार बोलत असताना महत्वाच्या मुद्द्यांच्या नोंदी ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होईल. ह्या नोंदी त्याबाबतीत अधिक माहिती मिळविणारे प्रश्न विचारण्यास उपयोगी पडतील.
-
मुलाखतीची ऑडिओ क्वालिटी शक्य तितक्या उच्च दर्जाची असणे मुलाखत प्रकाशित व संग्रहित करण्याच्या प्रत्येक टप्प्यावर फार महत्वाचे असते. त्यासाठी –
-
मुलाखतीच्या जागी मोटर्स, पंखे, पाळीव प्राणी, ट्रॅफिक इत्यादींचा गोंगाट नसल्याची खात्री करा.
-
मुलाखतीस सुरुवात करण्याआधी तुमच्या व आत्मकथनकाराच्या सहज बोलचालीचा एक नमुना ऑडिओ रेकॉर्ड करून पहा जेणेकरून तुम्हां दोघांच्या आवाजाची पातळी तसेच आजूबाजूचा गोंगाट किंवा स्टॅटिक रेकॉर्ड होत असल्यास तेही तुमच्या लक्षात येईल व त्यावर उपाययोजना करता येईल.
-
मुलाखतीआधी आत्मकथनकर्त्यांस प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने उपक्रमाचा उद्देश्य त्यांना समजेल अशा शब्दांत समजावून सांगा. नवी मुंबईच्या इतिहासात त्यांच्या आत्मकथनाचे महत्व काय आहे हे त्यांना सांगा. त्यांचे आत्मकथन, तसेच त्याची भाषांतरे, फाऊंडेशनच्या मॅगझिनमध्ये, फाऊंडेशनच्या वेबसाईटवर, फाऊंडेशनच्या सोशल पानांवर तसेच कालांतराने छापील पुस्तक व ईबुक स्वरूपात फाऊंडेशनतर्फे “ना-नफा, ना-तोटा” तत्वावर प्रकाशित केले जातील तसेच संग्रहित केले जातील हे स्पष्ट करा. ह्या उपक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया ह्या पानास भेट द्या.
-
मुलाखतीस सुरुवात करण्याआधी प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने : प्रश्नावली व मुलाखतीच्या सर्वाधिकारांचे हस्तांतरण मधील सर्व तपशील पेनाने भरून घ्या. दोन्ही पानांवर तुमची आणि आत्मकथनकाराची स्वाक्षरी झाल्यानंतर हे एक महत्वाचे लीगल डॉक्युमेंट असल्याने ते काळजीपूर्वक सांभाळून ठेवा. ही मूळ प्रत तुमच्याकडून जमा करून घेण्याची व्यवस्था फाऊंडेशनद्वारे नंतर करण्यात येईल. [संदर्भासाठी प्रत]
-
आत्मकथनकार व मुलाखतकार मुलाखतीस बसले असतानाचे फोटो काढून घ्या (सेल्फी नको) व ते Telegram ॲपचा वापर करुन 8976335654 ह्या क्रमांकावर फाऊंडेशनकडे पाठवा. [संदर्भासाठी फोटो]
मुलाखतीदरम्यान :
-
पाण्याचे दोन ग्लास समोर ठेवुनच मुलाखतीस सुरुवात करा जेणेकरून घसा कोरडा पडल्याने मुलाखतीत व्यत्यय येणार नाही.
-
प्रश्नावलीतील सर्वच्या सर्व प्रश्न विचारलेच पाहिजेत असं नाही. एखाद्या प्रश्नाचे उत्तर आधीच्या उत्तरात मिळालेले असल्यास तो प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही.
-
आत्मकथनकार बोलत असताना मध्येच बोलणे टाळा. तुम्ही लक्ष देऊन ऐकत आहात हे दर्शविण्यासाठी “हं”, “हां” अशा उच्चारांऐवजी मान डोलावणे, स्मित हास्य करणे किंवा डायरीत नोंदी करणे इत्यादी शारीरिक हालचालींचा वापर करा जेणेकरून आत्मकथनकाराचे बोलणे बिनाव्यत्यय रेकॉर्ड होईल.
-
आत्मकथनकाराने एखाद्या प्रश्नाच्या उत्तरात काही लक्षवेधी माहिती किंवा तपशील पुरविल्यास त्यांचे उत्तर संपल्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे न जाता त्यांना त्या तपशीलाबद्दल अधिक माहिती मिळेल असे सुसंबद्ध प्रश्न विचारा. जसे की, मला त्याबद्दल अजून सांगा, हे कधी घडले, कुठे, कोणी, काय इत्यादी.
मुलाखतीनंतर :
-
मुलाखत संपल्या-संपल्या –
रेकॉर्डिंग प्ले करून मुलाखत व्यवस्थित रेकॉर्ड झाली आहे याची खात्री करा. [संदर्भासाठी रेकॉर्डिंग]
मुलाखतीच्या ऑडिओ फाईलला आत्मकथनकाराचे नाव-गाव दर्शविणारे नाव खालीलप्रकारे द्या : PAPM_LastnameFirstnameMiddlename_Villagename
उदा. कोपरखैरण्यातील चंद्रकांत काळुराम म्हात्रे यांच्या मुलाखतीचे नाव PAPM_MhatreChandrakantKaluram_Koparkhairane असे असायला हवे.
टेलिग्राम (Telegram) ॲपचा वापर करून ती ऑडिओ फाईल 8976335654 ह्या क्रमांकावर सीताराम म्हात्रे फाऊंडेशनकडे पाठवा.
-
अडॉबी स्कॅन (Adobe Scan) किंवा तसल्या इतर ॲपचा वापर करून तपशील भरलेली व स्वाक्षऱ्या केलेली प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने : प्रश्नावली व मुलाखतीच्या सर्वाधिकारांचे हस्तांतरण ची दोन्ही पाने स्कॅन करा व पीडीएफ स्वरूपात सीताराम म्हात्रे फाऊंडेशनकडे पाठवा. हे डॉक्युमेंट जोपर्यंत फाऊंडेशनकडे येत नाही तोपर्यंत मुलाखत प्रकाशित अथवा संग्रहित करता येत नाही. त्यामुळे ही पायरी न चुकता पूर्ण करायला हवी. [संदर्भासाठी प्रत]
-
आत्मकथनकाराकडे मुलाखतीतील मजकूराशी संबंधित ऐतिहासिक दृष्टया महत्वाची कागदपत्रे जसे की सिडकोने भूसंपादनावेळी पाठविलेल्या अव्यक्तिगत नोटीशी, वर्तमानपत्रांची कात्रणे इत्यादी तसेच त्यांचे स्वतःचे, कुटुंबियांचे व नवी मुंबई परिसराचे जुने फोटो (सत्तर-ऐशीच्या दशकातले किंवा त्याहूनही जुने) असल्यास व त्यांची परवानगी असल्यास ती कागदपत्रे व फोटो स्कॅन करून फाऊंडेशनकडे पाठवा जेणेकरून तीदेखील मुलाखतीसोबत प्रकाशित करता येतील.
***जलद दुवे***
आत्मकथन : सौ. एकादशी का. म्हात्रे
प्रकल्पग्रस्तांच्या मुलाखतीची प्रश्नावली
प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने : अर्काइव्ह
काय करावे? (DOs)
-
एका वेळी एकच प्रश्न विचारा.
-
आत्मकथनकारास एखादा प्रश्न समजला नाही तर तो वेगळ्या शब्दांमध्ये त्यांना समजावून द्या.
-
प्रश्न विचारल्यानंतर आत्मकथनकारास विचार करण्यास वेळ द्या. शांततेला घाबरू नको.
-
आत्मकथनकारास त्यांच्या बोलीभाषेत बोलू द्या. त्यांनी प्रमाण मराठीत बोलणे ह्या उपक्रमासाठी अजिबात आवश्यक नाही.
-
बोलण्याचे काम आत्मकथनकारास करु द्या.
-
आत्मकथनकारास जास्तीत जास्त माहिती देण्यास उद्युक्त करा. प्रश्नावलीमधील प्रश्न मुक्त प्रश्न (Essay Type) आहेत म्हणजेच त्यांची एका वाक्यात उत्तरे अपेक्षित नाहीत.
-
आत्मकथनकारास त्यांची “कहाणी” सांगू द्या - ती कहाणी विषयाशी सुसंगत नसली तरीही.
-
मुलाखत सुरु झाल्यानंतर साधारण तासाभरात आत्मकथनकारास “छोटासा विराम (break) घ्यायचा का” असे विचारा. (होय म्हणाल्यास रेकॉर्डिंग पॉझ (pause) करून शेवटचे शब्द नमूद करून ठेवा जेणेकरून ब्रेकनंतर मुलाखत जेथे थांबवली होती तेथूनच पुढे चालू ठेवता येईल.)
-
संपूर्ण मुलाखत एकाच बैठकीत घेण्याचा प्रयत्न करा. (संपूर्ण मुलाखत दोन तासांपेक्षा अधिक काळ लांबवू नये, कारण तसे झाल्यास आत्मकथनकारास थकवा येऊन मुलाखतीची गुणवत्ता घसरण्याचा धोका असतो.)
काय करु नये? (DON’Ts)
Ø उत्तरांचे सूतोवाच करणारे प्रश्न (leading questions) विचारू नये. उदा. “सिडको आल्याने स्थानिक शेतकऱ्यांचे वाटोळे झाले असे तुम्हाला वाटते का?”
(ह्या प्रश्नाला मुक्त प्रश्न अशा प्रकारे बनवता येईल : “सिडकोच्या येण्याचा स्थानिक शेतकऱ्यांवर काय परिणाम झाला?)
Ø आत्मकथनकार बोलत असताना मध्येच बोलू नये. (मात्र त्यांचे उत्तर देऊन झाल्यावर “ही फारच महत्वाची माहिती तुम्ही दिलीत” इत्यादी प्रोत्साहनपर टिप्पणी करण्यास काहीच हरकत नाही.)
Ø आत्मकथनकार विषयांतर करीत असल्यास त्यांना रोखू नये. (त्यांना त्यांचे म्हणणे पूर्ण करू द्यावे.)
Ø मुलाखतीदरम्यान स्वतःची मते मांडत बसू नये : “माझा अनुभव असा आहे…” इत्यादी. आत्मकथनकाराने तुमचे मत विचारल्यास त्यांना नम्रपणे सांगा की मुलाखतीचा उद्देश्य त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा आहे, तुमचा नाही.
CHECKLIST: मुलाखतकाराने फाऊंडेशनकडे काय-काय पाठवायला हवे?
(टेलिग्राम (Telegram) ॲपचा वापर करून 8976335654 ह्या क्रमांकावर)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१. मुलाखतकाराचे पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर व आत्मकथनकाराशी नाते
२. आत्मकथनकाराचे पूर्ण नाव, पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर
३. आत्मकथनकार व मुलाखतकार मुलाखतीस बसले असतानाचे फोटो
४. प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने प्रश्नावली व मुलाखतीच्या सर्वाधिकारांचे हस्तांतरण मधील सर्व तपशील भरून दोन्ही व्यक्तींनी सह्या केलेली स्कॅन कॉपी
५. मुलाखतीची ऑडिओ फाईल, PAPM_LastnameFirstnameMiddlename_Villagename ह्या फॉर्मॅटमध्ये नाव देऊन.
६. आत्मकथनकाराकडून मिळालेली मुलाखतीतील मजकूराशी संबंधित कागदपत्रे व फोटो ह्यांच्या स्कॅन कॉपी.
प्रथम प्रकाशन : ११ मार्च, २०२४


