विनम्र आवाहन
नमस्कार,
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून सीताराम म्हात्रे फाऊंडेशनच्या 'प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने' ह्या उपक्रमास प्रारंभ झाला आहे. नवी मुंबई शहर वसविण्यासाठी येथील स्थानिकांच्या जमिनी सिडकोने हिसकावून घेतल्या त्यास आज २०२४ साली सुमारे पन्नास वर्षे होत आली. मात्र ह्या पाच दशकांच्या प्रदीर्घ कालावधीत नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांना ह्या प्रकल्पामुळे कोणकोणत्या आपत्तींना, हाल-अपेष्टांना, व मानसिक आघातांना सामोरे जावे लागले ह्याची सरकारदरबारी पुसटशी देखील नोंद घेतलेली कुठे आढळत नाही. नवी मुंबईच्या गैर-सरकारी इतिहासातदेखील पोटभरू खाजगी संशोधक व अभ्यासकांनी प्रकल्पग्रस्तांचा काहीएक दृष्टिकोन असू शकतो ह्याचे जरादेखील भान ठेवल्याचे दिसत नाही. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींचे भूखंड लाटून त्यांवर आलिशान कार्यालये थाटलेल्या प्रस्थापित प्रसारमाध्यमांच्या एका गटाने तर नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त समाजाला नेहमीच कृतघ्न ठरविले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त म्हणजे सिडकोच्या जीवावर मजा मारणारे ऐदी लोक असा एक फार गोड गैरसमज अगदी पद्धतशीरपणे निर्माण केला गेला आणि त्यास सातत्याने खतपाणी घालण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नवी मुंबईच्या इतिहासातील भूसंपादनाच्या काळ्याकुट्ट अध्यायास उजेडात आणून येथील प्रकल्पग्रस्तांच्या जीवनाची दारुण सत्यस्थिती जगासमोर मांडण्यासाठी आपल्याकडे एकच - पण अतिशय प्रभावी - साधन उरते, ते म्हणजे : प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने!
या उपक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी
ह्या पृष्ठास भेट द्या
किंवा
मुलाखतकार म्हणून आपले नाव येथे नोंदवा.
चला तर, आपल्या कुटुंबातील व परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या मुलाखती घेऊन प्रकल्पग्रस्तांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडू या!