आम्ही कोण?
आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।
देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया ॥
-केशवसुत
सीताराम म्हात्रे फाऊंडेशन ही नवी मुंबईतील एक अशी अनोखी धर्मादाय संस्था आहे जी कोणत्याही प्रकारची देणगी अथवा वर्गणी स्वीकारीत नाही. ह्या संस्थेचे सर्वच्या सर्व उपक्रम सीताराम म्हात्रे फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष श्री. चंद्रकांत काळुराम म्हात्रे स्वखर्चाने चालवतात.
सीताराम म्हात्रे फाऊंडेशनचे उपक्रम
* संतसाहित्य युनिकोडमध्ये (शब्दागर प्रकल्प)
*आम्ही प्रकल्पग्रस्त (द्विभाषिक नियतकालिक)
* मातोश्री तुलसीबाई सीताराम म्हात्रे शिष्यवृत्ती
* कै. जयराम जेपाल स्मृती शिष्यवृत्ती
* निःशुल्क व्यावसायिक भाषांतर अभ्यासक्रम
* निःशुल्क इंग्रजी संभाषण वर्ग
* निःशुल्क संगणक प्रशिक्षण वर्ग
सीताराम म्हात्रे फाऊंडेशनच्या सर्व उपक्रमांच्या यशस्वितेचे पूर्ण श्रेय फाऊंडेशनच्या कार्यकारिणीस जाते. फाऊंडेशनची कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे :

श्री. चंद्रकांत काळुराम म्हात्रे (संस्थापक-अध्यक्ष) : व्यावसायिक भाषांतराच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक दशकापेक्षा अधिक अनुभवाबरोबरच प्राथमिक ते पदव्युत्तर अध्यापन आणि साहित्यिक व भाषाशास्त्रीय संशोधन ह्या क्षेत्रांतील दोन दशकांचा गाढा अनुभव. संतसाहित्याचे अभ्यासक व भाषांतरकार. One Hundred Poems of Chokha Mela हे पुस्तक मुंबई विद्यापीठात इंग्रजीच्या एम.ए. (ऑनर्स) अभ्यासक्रमात समाविष्ट.

हभप सौ. एकादशी काळुराम म्हात्रे (सचिव) : यशस्वी महिला लघुउद्योजक. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानासुद्धा अडल्या-नडलेल्यास सर्वतोपरी साहाय्य करण्याची त्यांची वृत्ती आमच्या फाऊंडेशनची प्रेरणास्रोत बनली आहे. त्यांच्या पावलांवर पावले टाकत फाऊंडेशनचे कार्य चालते आहे.

डॉ. ग्रीष्मा पाटील (कोषाध्यक्ष) : मत्स्यविज्ञान क्षेत्रात अल्पावधीतच लक्षवेधी योगदान करणाऱ्या युवा संशोधक. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, हाफकिन इन्स्टिट्यूट, केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था व केंद्रीय सागरी मत्स्यविज्ञान संशोधन संस्था यांमध्ये संशोधनकार्याचा सखोल अनुभव. प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये मूलगामी शोध निबंध प्रकाशित. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक भाषांतर क्षेत्रात भरीव योगदान.

हभप श्री. काळुराम उ. म्हात्रे (सदस्य) : संतसाहित्याचे ज्येष्ठ निरुपणकार व वारकरी संतांच्या जीवन-तत्वज्ञानाचे खंदे पुरस्कर्ते. आमच्या फाऊंडेशनचे 'मॉरल कंपास'. फाऊंडेशनच्या कार्यास असलेला तत्वनिष्ठेचा भरभक्कम पाया त्यांच्याच मार्गदर्शनातून लाभलेला आहे. फाऊंडेशनच्या कार्याचा शिरपेच असलेल्या "संतसाहित्य युनिकोडमध्ये" प्रकल्पाचे प्रेरणास्रोत.

प्राचार्य प्रताप महाडिक (सदस्य) : एफ.जी. नाईक महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत. शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव. नवी मुंबईतील अनेक प्रतिष्ठित सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे विश्वस्त. सीताराम म्हात्रे फाऊंडेशनचे वरिष्ठ सल्लागार.

डॉ. चंद्रकळा का. म्हात्रे (सदस्य) : महाविद्यालयीन अध्यापनाचा व संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये अनेक शोध निबंध प्रकाशित. न्यूयॉर्क-स्थित अमेरिकन जर्नल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ह्या प्रतिष्ठित संशोधन पत्रिकेच्या रिव्ह्यूअर म्हणून कार्यरत. Indian Banking System व Contemporary Development Trends in India ही पुस्तके प्रसिद्ध.

सौ. अरुणा पाटील (सदस्य) : मराठी साहित्याच्या अभ्यासक. संतसाहित्य हा त्यांच्या खास जिव्हाळ्याचा विषय. प्रगल्भ समाजभान असलेल्या फाऊंडेशनच्या चैतन्यमूर्ती. फाऊंडेशनच्या "आम्ही प्रकल्पग्रस्त" ह्या नियतकालिकाच्या स्फुर्तीदात्या.
***जलद दुवे***
क्षणचित्र दालन
समाज भूषण पुरस्कार
मातोश्री तुलसीबाई सीताराम म्हात्रे शिष्यवृत्ती
क्षणचित्र दालन

