संतसाहित्य युनिकोडमध्ये
संशोधकांमध्ये ईच्छा व क्षमता असूनदेखील भारतीय भाषांमधील संतसाहित्याचे संगणकीय भाषाशास्त्रीय व परिमाणात्मक भाषाशास्त्रीय संशोधन आजतागायत होऊ शकलेले नाही याचे मूळ कारण म्हणजे ज्यांवर संगणन प्रक्रिया होऊ शकेल असे पाठ भांडार (Text Repository) मुळातच अस्तित्वात नाहीत किंवा संशोधकांना सहज उपलब्ध होत नाहीत. संतसाहित्याच्या संशोधन क्षेत्रांतील ही फार मोठी उणीव भरून काढण्यासाठी फाऊंडेशनने "संतसाहित्य युनिकोडमध्ये" (Bhakti Literature in Unicode) हा उपक्रम हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या चरणाची सुरुवात २७ फेब्रुवारी, २०२२ रोजी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून करण्यात आली. या पहिल्या चरणांत समग्र मराठी संतसाहित्य युनिकोडमध्ये उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या चरणांत हिंदी संतसाहित्यावर काम करण्यात येईल व तदनंतर इतर भारतीय भाषांमधील संतसाहित्य युनिकोडमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. जेणेकरून संतसाहित्याच्या संशोधकांना हे शतकानुशतकांचे सांस्कृतिक व साहित्यिक संचित एका ठिकाणी सहजगत्या उपलब्ध होऊन संशोधनाचा मार्ग सुकर होईल. भविष्यात हा प्रकल्प भारतातील डिजिटल मानव्यविद्याशाखेच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरेल!
शासकीय व वैयक्तिक पातळीवर सुरु असलेल्या प्रयत्नांमुळे संतसाहित्य बऱ्याच प्रमाणात छापील पुस्तके स्कॅन करून बनवलेल्या पीडीएफ फाईलच्या स्वरूपात इंटरनेटवर उपलब्ध आहे; तर युनिकोड स्वरूपातले तुरळक अभंग डिजिटल जहिरातींच्या भडिमारात इतस्ततः विखुलेले आहेत. मात्र या दोन्ही प्रकारांचा संगणकीय प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने भाषाशास्त्रीय संशोधकांना काहीच उपयोग होत नाही. अशी प्रक्रिया करण्यासाठी ते साहित्य युनिकोडमध्ये एका जागी व जाहिराती किंवा तत्सम अडथळ्यांशिवाय उपलब्ध होणे गरजेचे असते. संतसाहित्याच्या भाषाशास्त्रीय संशोधनक्षेत्रातील ही गरज पूर्ण करणे हे संतसाहित्य युनिकोडमध्ये (Bhakti Literature in Unicode) या आमच्या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.
ह्या उपक्रमाच्या पहिल्या चरणातील गाथांची नमुना पृष्ठे तयार झाली आहेत
व आपल्या अवलोकनासाठी येथे उपलब्ध आहेत :
समग्र संत नामदेव गाथा युनिकोडमध्ये रूपांतरित करणाऱ्या स्वयंसेवक
