top of page

समाज भूषण पुरस्कार 

साध्या प्रकाशझोताची देखील अपेक्षा न करता समाजासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन समाजाच्या उत्कर्षात त्यांच्या योगदानाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सीताराम म्हात्रे फाऊंडेशनचा समाज भूषण पुरस्कार दिला जातो. 

समाज भूषण पुरस्कार २०२४

समाज भूषण पुरस्कार २०२४ हा श्री. सुधाकर जोमा म्हात्रे, कोपरखैरणे ह्यांना त्यांच्या सामाजिक व गृहनिर्माण क्षेत्रांतील अमूल्य योगदानासाठी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी फाऊंडेशनच्या द्वितीय वर्धापनदिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे डॉ. राजेश करंकाळ, इंग्रजी विभागप्रमुख, मुंबई विद्यापीठ ह्यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.

त्यांना देण्यात आलेले मानपत्र :

समाज भूषण श्री. सुधाकर जोमा म्हात्रे

 

मानपत्र

"तुमच्या ऐन उमेदीच्या काळात स्थानिक आगरी-कोळी-नवबौद्ध-कातकरी समाजाच्या तोंडातला घास व डोक्यावरचे छप्पर सिडकोने हिरावून घेतले. निसर्गक्रमानुसार ह्या समाजाची लोककसंख्या वाढेल तेव्हा त्यांना घरे पुरवण्याचे तर दूरच परंतु नकाशांवर मनमान्या रेषा आखून त्यांची राहती घरे तोडून सिडकोने त्यांना बेघर केले. अशा ह्या तुघलकी संकटाच्या काळी तुम्ही आपल्या समाज-बांधवांच्या मदतीस धावून आलात व स्वतःस गृहनिर्माण क्षेत्रास वाहून घेतले. संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रातील गावठाणांमध्ये आपल्या अथक परिश्रमाने शेकडो इमारती उभ्या राहिल्या ज्यांमध्ये केवळ सिडकोनेच नव्हे तर अवघ्या शासन यंत्रणेने वाऱ्यावर सोडलेल्या भूमिपुत्रांच्या तीन पिढ्या आज आनंदाने नांदत आहेत. मोठा गाजावाजा केलेले सिडकोचे साडेबारा टक्के सोडा पण सिडकोच्या साडेबारा दमड्या देखील न मिळालेला भूमिपुत्रांचा एक फार मोठा वर्ग ह्या नवी मुंबईत आहे ज्यांच्याकडून कसल्याही नफ्याची व लाभाची अपेक्षा न करता तुम्ही त्यांना घरे बांधून दिलीत. त्यांच्या मुलाबाळांच्या डोक्यावर निवारा उभा केलात! आणि हे सर्व करत असताना प्रसिद्धीची-प्रतिष्ठेची हाव बाळगणे तर दूरच पण हे एवढे प्रचंड कार्य तुम्ही कधी कोणत्या व्यासपीठावर मांडले देखील नाही! आपल्या ह्या अतुलनीय कार्याद्वारे आपण नवी मुंबईतील स्थानिक समाजावर जे आकाशाएवढे उपकार केले आहेत त्यांची नम्र जाणीव ठेवून आम्ही आपणांस हे मानपत्र अर्पण करीत आहोत."

*****

IMG_9575.JPG

समाज भूषण पुरस्कार २०२३

 

समाज भूषण पुरस्कार २०२३ हा हभप काशिनाथ महाराज वेटा व हभप धर्मूबाई महाराज वेटा ह्यांना त्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रांतील अमूल्य योगदानासाठी १० फेब्रुवारी २०२३ रोजी फाऊंडेशनच्या प्रथम वर्धापनदिन सोहळ्यात अर्पण करण्यात आला.

 

त्यांना देण्यात आलेली मानपत्रे :

समाज भूषण हभप काशिनाथ महाराज वेटा

 

मानपत्र

"प्रातःस्मरणीय ह.भ.प. काशीनाथ महाराज वेटा, 

 

कळकळीचे हरिपाठ प्रवर्तक, प्रख्यात प्रवचनकार, सर्वमान्य ज्ञानेश्वरी-पारायण व्यासपिठाधिकारी अशा अनेक नात्यांनी आगरी समाजातील वारकरी सांप्रदायाच्या वाटचालीत आपला सिंहाचा वाटा राहिला आहे. परमार्थाबरोबरच समाजकारणात देखील आपण हिरहीरीने भाग घेतला आहे व सशक्तपणे आपल्या समाजाचे नेतृत्व केले आहे. खरे ब्राह्मणत्व हे जन्माने नव्हे तर आपल्या कर्माने सिद्ध होते ह्याचे आपण जिवंत उदाहरण आहात. आपल्या शास्त्रशुद्ध आचरणाने व सविनय विद्वत्तेने दशकानुदशके पौरोहित्य करून आपण जातसिद्ध पुरोहित वर्गाची मक्तेदारी मोडून काढली व आपल्या समाजाच्या धार्मिक जीवनात क्रांती घडवून आणली, आपल्या समाजातील नव्या पिढीसमोर एक उत्तुंग आदर्श निर्माण केला. आपल्या समुद्राएवढ्या कर्तृत्वाचा आढावा घ्यायला पानेच्या पाने खर्ची घालावी लागतील ह्याची पुरेपूर जाणीव ठेवून आम्ही आपणांस हे मानपत्र अर्पण करीत आहोत. आपले धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्य असेच अविरत चालू ठेवण्यासाठी आपणांस उदंड आयुष्य व निरामय आरोग्य लाभो हीच आमची सदिच्छा."

*****

_76A9314.JPG

समाज भूषण हभप धर्मूबाई महाराज वेटा

मानपत्र

प्रातःस्मरणीय ह.भ.प. धर्मूबाई महाराज वेटा,

 

"वारकरी सांप्रदायाची अजरामर शिकवण आपल्या गायनातून घरोघरी पोहचविणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील आद्य महिला भजनी गायिकांपैकी आपण एक. गेल्या सहा दशकांमध्ये प्रासादिक भजनी मंडळांच्या पुरुषप्रधान क्षेत्रात आपण स्वतःचा असा काही ठसा उमटवला आहे की आज आपला आदर्श समोर ठेवून आगरी समाजात प्रत्येक गावात महिला भजन मंडळे निर्माण झाली आहेत. जितक्या सहजपणे आपण आपल्या भारदस्त आवाजाने पंडिता गंगुबाई हनगलांच्या शास्त्रीय गायनाची आठवण करून देता तितक्याच धडाडीने आपण सामाजिक क्षेत्रात एक कार्यकर्त्या म्हणून वावरता. स्त्री-सशक्तीकरण हा परवलीचा शब्द बनण्याआधीच्या काळात महिला आघाडी स्थापन करून व तिचे नेतृत्व करून येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण नवा पायंडा पाडलात. आपल्या कर्तृत्वाची उजळणी करायची म्हणजे आकाशाला गवसणी घालायची ह्याची पूर्ण जाणीव ठेवून आम्ही आपणांस हे मानपत्र अर्पण करीत आहोत. पले धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्य असेच अविरत चालू ठेवण्यासाठी आपणांस उदंड आयुष्य व निरामय आरोग्य लाभो हीच आमची सदिच्छा."

*****

_76A9319.JPG

© 2025 Sitaram Mhatre Foundation

Call us:

+91-865-735-1636

Find us: 

Sitaram Smaran, House no. 896,

Sector 19B, Koparkhairane,

Navi Mumbai

  • Pinterest
  • Twitter
  • LinkedIn
  • Facebook
  • YouTube

Website developed & maintained by:

Mhatre's Traslation & Allied Services

Sitaram Mhatre Foundation

Our Programmes:

English for ALL

Science for ALL

Computers for ALL

Memoirs of the PAP

Bhakti Literature in Unicode

bottom of page