
पाश्चात्य जीवनशैली व पाश्चात्य विचारसरणीचा अनुयायी असलेल्या भारतीय समाजाच्या एका फार मोठ्या वर्गामध्ये संतसाहित्याच्या प्रचार व प्रसारासाठी सीताराम म्हात्रे फाऊंडेशनतर्फे संतसाहित्य २१व्या शतकासाठी उपक्रमाअंतर्गत अनेक कार्यक्रम हाती घेतले जातात. फाऊंडेशनतर्फे केले जाणारे संतसाहित्याचे प्रकाशन हे त्या कार्यक्रमांचाच एक भाग. संतसाहित्याच्या २१व्या शतकातील वाचकांसाठी अनुरूप अशा संपादित आवृत्या फाऊंडेशन प्रकाशित करते. तसेच ह्या उपक्रमाअंतर्गत संतसाहित्याची इंग्रजी भाषांतरे देखील फाऊंडेशन प्रकाशित करते. लवकरच संतसाहित्याची हिंदी सहित इतर भाषांतरे फाऊंडेशनतर्फे प्रकाशित करण्यात येतील. ह्याबरोबरच फाऊंडेशन संतसाहित्याच्या पारायणाचे कार्यक्रम आयोजित करते. संतसाहित्य व त्यात प्रतिबिंबित झालेल्या वारकरी संप्रदायाच्या विचारसरणीपासून जाणते-अजाणतेपणे दूर राहिलेल्या पण अध्यात्माची ओढ असल्याने बुवा-बाबांद्वारे नाडल्या गेलेल्या जनसामान्यांस व विशेषकरून युवा पिढीस संतसाहित्याकडे आकृष्ट करणे हे ह्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट्य आहे. सन २०२३ साली आयोजित केलेल्या यशस्वी ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रमानंतर फाऊंडेशनने सन २०२४ पासून विविध संत गाथांच्या पारायणाचे कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. ह्या गाथा पारायण शृंखलांमधील पहिले पुष्प म्हणजे फाऊंडेशनने आयोजित केलेले तुकाराम गाथा पारायण!



