Bhakti Literature in Unicode Project
Sant Muktabai Gatha
Coordinator-Editor: Chandrakant Mhatre
Unicodification: Aruna Patil
***PART OF THE PROJECT SHABDAAGAR EBOOK SANT MUKTABAI GATHA***
संत मुक्ताबाई गाथा
[१]
सर्वीं सर्वसुख अहंतेचि दुःख । मोहममताविष त्यजीयेले ॥१॥
साधकबाधक करुनि विवेक । मतिमार्गतर्क शोधियेला ॥२॥
सर्व तीर्थ हरि दुधाळु धेनुवा । वोळला कणवा चातकाचा ॥३॥
सुक्ष्म मार्ग त्याचा भक्त देही मायेचा । आकळावयाचा सत्व धरी ॥४॥
वेद जव वाणी श्रुति रूपे कहाणी । ऐको जाय कर्णी तव परता जाय ॥५॥
मुक्ताई सोहंभावे तनु भरले दिसे देवे । मूर्तामूर्त सोहंवे हरी घोटी ॥६॥
[२]
करणे जव काहो करू जाये शेवट । तव पडे आडवाट द्वैतभावे ॥१॥
राहिले करणे नचले पै कर्म । हरीविण देहधर्म चुकताहे ॥२॥
मोक्षालागी उपाय करितोसि नाना । तव साधनी पतना पडो पाहे ॥३॥
मुक्ताई करि हरिश्रवणपाठ । तेणे मोक्षमार्ग नीट सकळ साधे ॥४॥
[३]
ऊर्णाचिया गळा बांधली दोरी । पाहो जाय घरी तव तंतु नाही ॥१॥
तैसे झाले बाई जव एकत्व नाही । दुजी जव साई तव हे अंध ॥२॥
ऐसी मी वो अंध जात होते वाया । प्रकृति सावया पावली तेथे ॥३।
मुक्ताई सावध करी निवृत्तिराज । हरिप्रेम उमज एकतत्वे ॥ ४॥
[४]
शांतिक्षमा वसे देही देव पैसे । चित्त समरसे मुक्तमेळु ॥१॥
निर्गुणे उपरमु देव पुरुषोत्तमु । प्रकृतिसंगमु चेतनेचा ॥२॥
सज्ञानी दिवटा अज्ञानी तो पैठा । निवृत्तीच्या तटा नेतु भक्ता ॥३॥
मुक्ताई दिवस अवघा हृषीकेश । केशवेविण वास शून्य पैसे ॥४।
[५]
प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण । दीपे दीप पूर्ण एका तत्वे ॥१॥
देखिले गे माये पंढरी पाटणी । पुंडलिका आंगणी विठ्ठलराज ॥२॥
विज्ञानेसि तेज सज्ञानेसि निज । निर्गुणेसि चोज केले सये ॥३॥
मुक्ताई तारक सम्यक विठ्ठल । निवृत्तीने चोखाळ दाखविले ॥४॥
[६]
शून्यापरते पाही तव शून्य तेही नाही । पाहाते पाहोनि ठायी ठेवियले ॥१॥
कैसा गे माये हा तारकु दिवटा । पंढरी वैकुंठा प्रगटला ॥२॥
नकळे याची गति आदिमध्यअंतीं । जेथे श्रुति नेति नेति प्रगटल्या ॥३॥
मुक्ताई सप्रेम विठ्ठलसंभ्रम । शून्याहि शून्यसम तेजबाज ॥४॥
[७]
प्रारब्ध संचित आचार गोमटे । निवत्तितटाके निघालो आम्ही ॥१॥
मुळीचा पदार्थ मुळीच पै गेला। परतोनि अबोला संसारासी ॥२॥
सत्यमिथ्याभाव सत्वर फळला । हृदयी सामावला हरिराज ॥३॥
अव्यक्त आकार साकार हे स्फूर्ति । जीवशिवप्राप्ति ऐसे केले ॥४॥
सकाम निष्काम वृत्तीचा निज फेर । वैकुंठ आवार दाखविले ॥५॥
मुक्तलग मुक्त मुक्ताईचे तट । अवघेचि वैकुंठ निघोट रया ॥६॥
[८]
नामबळे देही असोनि मुक्त । शांति क्षमा चित्त हरिभजने ॥१॥
दया धरा चित्ती सर्वभूती करुणा । निरंतर वासना हरिरूपी ॥२॥
माधव मुकुंद हरिनाम चित्ती । सर्व पै मुक्ति नामपाठे ॥३॥
मुक्ताईचे धन हरिनामे उच्चारु । अवघाचि संसारु मुक्त केला ॥४॥
[९]
सर्वरूपी निर्गुण संचले पै सर्वदा । आकार संपदा नाही तया ॥१॥
आकारिती भक्त मायामय काम । सर्वत्र निःसीम अंतरी आहे ॥२॥
वृत्तीचा उच्छेदू निवृत्ति तत्त्वता । सर्वही समता सांगितली ॥३॥
मुक्ताई अवीट मुक्तपंथरत । जीवी शिवी अनंत तत्वविद ॥४॥
[१०]
सहस्त्रदळी हरि आत्मा हा कुसरी । नांदे हा भीतरी अलिप्त सदा ॥१॥
रविबिंब बिंबे घटमठी सदा । ते नातळे पै कदा तैसा आत्मा ॥२॥
अलिप्त श्रीहरि सेवी का झडकरी । सेविता लवकरी हरीच होआल ॥३॥
चंदनाच्या दृती वेधल्या वनस्पती । तैसे आहे संगती या हरिपाठे ॥४॥
मुक्ताई चिंतीत चिंतामणी चित्ती । इच्छिले पावती भक्त सदा ॥५॥
[११]
देउळाच्या कळसी नांदे एक ऋषी । तया घातली पुशी योगेश्वरी ॥१॥
दिवसा चांदिणे रात्री पडे उष्ण । कैसेनि कठिण तत्व जाले ॥२॥
ऋषी म्हणे चापेकळि काळ पै कापे । प्रकाशदीपे निघोनि जाये ॥३॥
ठायी ठायी असे पाहता न दिसे । मनाच्या धारसे एक होय ॥४॥
एकएकले वायाचि पै गुंतले । मुक्त पै वाहिले सहज असे ॥५॥
वैकुंठ अविट असोनि प्रगट । वायाची आडवाट मुक्ताई म्हणे ॥६॥
[१२]
अलिप्त संसारी हरि नामपाठे । जाईजे वैकुंठे मुक्तलग ॥ १॥
हरिविण मुक्त न करी हो सर्वदा । संसारआपदा भव तोडी ॥२॥
आशेच्या निराशी अचेतना मारी । चेतविला हरि आपरूपे ॥३॥
मुक्ताई जीवन्मुक्तचि सर्वदा । अभिन्न पै भेदा भेदियले ॥४॥
[१३]
अविट न विटे हरीचे हे गुण । सर्व सनातन ध्याता रूपे ॥१॥
साध्य हे साधन हरिरूप ध्याने । रामकृष्णकीर्तने मुक्त आम्ही ॥२॥
असंगेचि नटु नटलो पै साचे । नाही त्या यमाचे भय आम्हा ॥३॥
मुक्ती पुर्णता मुक्ताई लाधली । साधन दिधली चांगयासी ॥४॥
[१४]
आदिमध्यऊर्ध्व मुक्त हरि भक्त । सबाह्य अंतरी हरि एकु ॥१॥
नलगती तीर्थे हरिरूपे मुक्त । अवघेचि सूक्त जपिन्निले ॥२॥
ज्याचे नामे मुक्त पै जडमूढ । तरले दगड समुद्री देखा ॥३॥
मुक्ताई हरिनामे सर्वदा पै मुक्त । नाही आदिअंत उरला आम्हा ॥४॥
[१५]
मुक्तपणे ब्रीद बांधोनीया द्विज । नेणती ते बीज केशवहरि ॥१॥
ज्याचेनि मुक्तता सर्वही पै मुक्त । करूनिया रत न सेविती ॥२॥
वेद बोलियेले ब्रह्मार्पण भावे । सदा मुक्त व्हावे अरे जना ॥३॥
मुक्ताई मुक्त हरिनाम सेवीत । अवघेचि मुक्त सेविता हरि ॥४॥
[१६]
मुक्तामुक्त दोन्ही नाइकतो कर्णी । हरिनामपर्वणी सदाकाळ॥१॥
नाही काळ तेथे आम्हा वेळ कैची । हरिनामछंदाची गोडी थोरी ॥२॥
नाना विघ्नबाधा नाइको आम्ही कदा । निरंतर धंदा रामकृष्ण ॥३॥
मुक्तपणे मुक्त मुक्ताई पै रत । हरिनाम स्मरत सर्व काळ ॥४॥
[१७]
मुक्त पै अखंड त्यासी पै फावले । मुक्तचि घडले हरीच्या पाठे ॥१॥
रामकृष्ण मुक्त जाले पै अनंत । तरले पतीत युगानुयुगी ॥२॥
कृष्ण नामे जीव झाले सदाशिव । वैकुंठ राणीव मुक्त सदा ॥३॥
मुक्ताई संजीवन मुक्त मुक्तिकोडे । जाले पै निवाडे हरिरूप ॥४॥
[१८]
भजनभावो देही नित्य नामपैठा । नामेचि वैकुंठा गणिका गेली ॥१॥
नाममंत्र आम्हा हरिरामकृष्ण । दिनदिशी प्रश्न मुक्तमार्गु ॥ २ ॥
नामचि तारकु तरले भवसिंधु । हरिनामछंदू मंत्रसार ॥३॥
मुक्ताई चिंतन हरिप्रेम पोटी । नित्य नाम घोटी अमृत सदा ॥४॥
[१९]
नाममंत्रे हरि निजदासां पावे । ऐकोनी ध्यावे झडकरी ॥१॥
सुदर्शन करी पावे लवकरी । पांडवा साहाकारी श्रीकृष्ण रया ॥२॥
निजानंद दावी उघडे पै वैकुंठ । नामेचि प्रगट आम्हालागी ॥३॥
मुक्ताई जीवनोन्मुक्त हा संसार । हरि पारावर केला आम्ही ॥४॥
[२०]
अंतरबाह्य निके सर्व इंद्रियांचे चोज । निजी निजबीज एकतत्व ॥१॥
आदि नाही अनादि नाही । ते रूप पाही अविट बाईये ॥२॥
मुक्ताई संजीवन तत्वता निर्गुण । आकार सगुण प्रपंचीचा ॥३॥
[२१]
चित्तासी व्यापक व्यापुनि दूरी । तेचि माजीघरी नांदे सदा ॥१॥
दिसे मध्य सुख मुक्तलग हरि । शांति वसे घरी सदोदित ॥२॥
नाही या शेवट अवघाची निघोट । गुरुतत्वे वाट चैतन्याची ॥३॥
मुक्ताई संपन्न मुक्त पै शेजुले । सर्वत्र उभविले मुक्त चोख॥४॥
[२२]
परब्रह्मी चित्त निरंतर धंदा । तया नाही कदा गर्भवास ॥१॥
उपजोनी जनीं धन्य ते योनी । चित्त नारायणी मुक्तलग ॥२॥
अव्यक्त पै व्यक्ति चित्तासी अनुभव । सर्व सर्वी देव भरला दिसे ॥३॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञान उन्मनी विज्ञान । चित्त नारायण जाले त्याचे ॥४॥
आदि अंतीं हरि सर्व त्याचा जाला । परतोनी अबोला प्रपंचेसी ॥५॥
मुक्ताईचे चित्त निरंतर मुक्त । हरि हेचि संचित आम्हा घरी ॥६॥
[२३]
मुक्तलगचित्ते मुक्त पै सर्वदा । रामकृष्णगोविंदा वाचे नित्य॥१॥
हरि हरि छंदु तोडी भवकंदु । नित्य नामानंदु जपे रया॥२॥
सर्वत्र रूपडे क्षरलेसे दृश्य । ज्ञाता ज्ञेय भास हरीमाजी ॥३॥
मुक्ताई सघन रूप हरि चित्ती । संसारसमाप्ति हरीच्या नामे ॥४॥
[२४]
मुक्तपणे सांग देवो होय देवांग । मीपणे उद्वेग नेघे रया ॥१॥
वाउगे मीपण आथिले प्रवीण । एक नारायण तत्व खरे ॥२॥
मुक्तामुक्ती दोन्ही करी का रे शिराणी । द्वैताची कहाणी नाही तुज ॥३॥
मुक्ताई अद्वैत द्वैती द्वैतातीत । अवघाचि अनंत दिसे देही ॥४॥
(अपूर्ण)

