top of page

 

आम्ही काय प्रकाशित करतो

प्रकल्पग्रस्तांच्या बातम्या

प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने

प्रकल्पग्रस्तांची कर्तृत्वे

मत-मतांतरे

संपादकांस पत्रे

बातमी-लायक फोटो (Geo-Tagged)

बातमी-लायक व्हिडिओ

स्थानिक संस्कृतीविषयक लेख

स्थानिक भाषांमधील साहित्य

We the PAP_Header_website.png

प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने

भूमिका

भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये विकासकामांचे महत्व अनन्यसाधारण असते​. प्रशस्त महामार्ग असोत, लहान-मोठी धरणे असोत, किंवा अगदी पंचतारांकित विमानतळेदेखील असोत, ह्या सर्वच विकासकामांना विकासाची इंजिने म्हणणे अगदी रास्त असते. मात्र अशा विकासकामांसाठी ज्या भूमिपुत्रांची जमीन ही एक पूर्वावश्यकता असते त्या भूमिपुत्रांवर सदर विकासकामांच्या नावाखाली आर्थिक-सामाजिक अन्याय होणार नाही, त्यांच्या रोजीरोटीबरोबरच त्यांच्या जीवनपद्धतीवरदेखील गदा येणार नाही याचे शासन-पातळीवर भान राखणे लोकशाहीमध्ये अपेक्षित असते. दुर्दैवाने शहरांत वातानुकूलित प्रशस्त दालनानांमध्ये बसून अशा विकासकामांचे आराखडे बनवणाऱ्या व त्यांना प्रत्यक्षात अंमलात आणणाऱ्या आमच्या लोकनिर्वाचित प्रतिनिधीनींना व प्रशासकीय लोकसेवकांना "आम्ही भारताचे लोक"मध्ये प्रकल्पग्रस्त लोकांचादेखील अंतर्भाव होतो याचे अजिबात भान असलेले दिसत नाही. परिणामतः घराशेजारी धरण असूनदेखील आमच्या आया-बायांना डोक्यावर दुडीच्या दुडी घेऊन रणरणत्या उन्हात मैलोनमैल पायपीट करावी लागते; घराशेजारून 'समृद्धी' महामार्ग जात असूनदेखील आमच्या पोरांना उपजीविकेसाठी तिथे साधी चहाची टपरीदेखील टाकता येत नाही; आणि उभ्या देशातील स्थलांतरितांच्या घरांची स्वप्ने पूर्ण करणाऱ्या 'एकविसाव्या शतकातील शहरांत' भूमिपुत्रांना स्वतःच्या जमिनीवर घरे बांधता येत नाहीत! अशा वेळी एक प्रश्न पडतो की हा सर्व "विकास" नक्की कोणासाठी?

ज्यांना अशा प्रकल्पांचा प्रत्यक्ष चटका बसलेला नाही अशा उच्चविद्याभूषित व उच्चपदस्थ लोकांनादेखील हा प्रश्न अनाठायी वाटतो. त्यांच्या मते प्रकल्पग्रस्त म्हणजे जमिनीच्या पैशावर ज्यांच्या जीवाची चंगळ झाली आहे असे नशीबवान पण कृतघ्न लोक! अशा विद्वानांना हेदेखील ठाऊक नसते की अगदी सन २००० पर्यंत प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीचा मिळालेला सरकारी मोबदला हा त्या जमिनीच्या बाजारभावाच्या जेमतेम १०% असायचा आणि आजच्या तारखेस दिला जाणारा मोबदला बाजारभावाच्या निमपटदेखील नसतो. त्याशिवाय जमिनीला फक्त मोबदल्यात मोजले जाणारे बाजरी मूल्य नसते तर एक शाश्वत उपजीविका मूल्यदेखील असते जे अशा महाभागांच्या खिजगणतीत देखील नसते. विकासकामांच्या लोंढ्याखाली विस्थापित झालेल्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या आयुष्याचे काय वाटोळे होते हे बघायचे असेल तर पुनर्वसनाच्या नावाखाली त्या विस्थापितांना एखाद्या भकास डोंगराशेजारी किंवा उजाड माळरानावर दिल्या जाणाऱ्या सरकारी वस्त्यांमध्ये एखादी चक्कर टाकून बघावी. पण इतका आटापिटा करणार कोण असे म्हणून अभ्यासू पत्रकार व पोटभरू संशोधक आपल्या अकलेचे दिवे पाजळून 'सर्वप्रकारे पुनर्वसन होऊनदेखील प्रकल्पग्रस्त कसा कृतघ्नपणा करतात' यावर रकानेच्या रकाने खरडतात. अशा परिस्थितीत प्रकल्पग्रस्तांची बाजू कोणी त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्था मांडेल अशी अजिबात अपेक्षा न करता प्रकल्पग्रस्तांनी आपली बाजू आपणच मांडायला हवी, आपला इतिहास आपणच लिहायला हवा. 

 

आपल्या ह्या पुर्वापार दडपल्या गेलेल्या इतिहासाची पद्धतशीर नोंद होण्यासाठी  प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने प्रसिद्ध होणे फार गरजेचे आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांची ही आत्मकथने ऑडिओ/व्हिडिओ स्वरूपात गोळा करणे, त्यांना संग्रहित करणे, त्यांचे शब्दांकन व भाषांतर करून त्यांना पुस्तकस्वरूपात प्रकाशित करणे अत्यावश्यक आहे. काळाची ही गरज ओळखून सीताराम म्हात्रे फाऊंडेशनने प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने हा मौखिक इतिहासपद्धतीचा उपक्रम हाती घेतला आहे.

आता मौखिक इतिहासपद्धती म्हणजे काय? मौखिक इतिहास म्हणजे काय? मौखिक इतिहासाची व्याख्या मराठी विश्वकोशात खालील प्रकारे केली आहे : 

ऐतिहासिक घटनांमधील साक्षीदारांकडून त्यांच्या स्मृतींवर आधारित माहिती गोळा करणे व त्यांचे विश्लेषण करणे म्हणजे मौखिक इतिहास होय... असंरचित मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तीकडून एखाद्या घटनेची, कार्यक्रमाची किंवा क्रियेची माहिती गोळा करण्याची ही पद्धती होय... मौखिक इतिहासाचा मुळ उद्देश अशा व्यक्तिची मुलाखत घेण्याचा असतो की, ज्याला इतिहासातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे एखादा महत्त्वपूर्ण अलिखित इतिहास उलगडण्यासाठी लोकांचा दबलेला आवाज पुढे आणण्याचे, लोकांना व्यक्त करण्याचे मौखिक इतिहास हे एक साधन आहे... मौखिक इतिहासपद्धतीमुळे दुर्लक्षित घटकांची जाणीव, संवेदना समजून घेण्यास मदत होते. मौखिक इतिहास हा सत्ताधारी घटकाकडून न येता, तो थेट भोगलेल्या व्यक्तिच्या तोंडून बाहेर येत असतो.

(विशेष नोंद : मौखिक इतिहास पद्धतीची शास्त्रीय बाजू सविस्तर जाणून घेण्यासाठी "मौखिक इतिहासाचे वेगळेपण कशात असते" हा प्रा. आलेसांद्रो पोर्तेली ह्या विश्वप्रसिद्ध इतिहासकारांचा निबंध वाचा.)

वरील परिच्छेदावरून सहज लक्षात येईल की व्यवस्थेने दडपलेला आपला आवाज व विस्मृतीच्या गर्तेत ढकलला गेलेला आपला इतिहास पुन्हा एकदा जिवंत करण्याकरिता आपणां प्रकल्पग्रस्तांसाठी आत्मलेखन हे किती महत्वाचे साधन आहे. त्यासाठीच फाऊंडेशनने मौखिक इतिहासपद्धतीच्या मानदंडांचे पालन करून एक मुलाखत प्रश्नावली व मुलाखतीची प्रमाणित कार्यप्रणाली तयार केली आहे, जेणेकरून मुलाखतकारांना प्रकल्पग्रस्तांची ही आत्मकथने गोळा करणे सोयीचे होईल. कोण असतील बरे हे मुलाखतकार? समाजातील कोणतीही संवेदनशील साक्षर व्यक्ती! आमच्या ह्या उपक्रमाअंतर्गत मुलाखतकार बनण्यासाठी आवश्यक अशी एकच पात्रता - ती म्हणजे प्रकल्पग्रस्तांचा दृष्टिकोन समजून घेण्याची कुवत. आणि आवश्यक असे एकच कौशल्य - ते म्हणजे समोरच्याचे बोलणे संयमपूर्वक ऐकणे.

 

तर अशा ह्या मुलाखतकारांनी वर दिलेल्या प्रश्नावलीच्या साहाय्याने प्रमाणित कार्यप्रणालीचे पालन करून आपल्या कुटुंबातील व परिसरातील ज्येष्ठ प्रकल्पग्रस्तांच्या मुलाखती घेऊन त्या पद्धतशीरपणे मोबाईलमधील व्हॉइस रेकॉर्डिंग ॲपच्या साहाय्याने रेकॉर्ड करून त्या सीताराम म्हात्रे फाऊंडेशनकडे पाठवल्यानंतर त्या मुलाखतींचे फाऊंडेशनद्वारे शब्दांकन व भाषांतर करण्यात येईल. तदनंतर सदर मुलाखती फाऊंडेशनच्या वेब व सोशल पानांवर नियमितपणे प्रकाशित करण्यात येतील. त्याचबरोबर कालांतराने फाऊंडेशनद्वारे ह्या मुलाखतींचे संग्रह छापील पुस्तक व ईबुक स्वरूपात 'ना नफा, ना तोटा' तत्वावर प्रकाशित करण्यात येतील. तसेच ह्या मुलाखतींचे मूळ ऑडिओ मौखिक इतिहासपद्धतीच्या मानदंडांनुसार संग्रहण (archive) करून सीताराम म्हात्रे फाऊंडेशनच्या वेबसाईटवर भविष्यात अभ्यासक व संशोधकांसाठी उपलब्ध केले जातील.

ह्याव्यतिरिक्त एखाद्या प्रकल्पग्रस्ताने स्वतःच्या शब्दांत आपले आत्मकथन लिहून आमच्याकडे पाठवल्यास तेदेखील आम्ही आमच्या ह्या उपक्रमाअंतर्गत प्रकाशित व संग्रहित करू. तसेच एखाद्या प्रकल्पग्रस्ताने हा अपरिचित इतिहास उलगडणारे आपले आत्मचरित्र लिहिल्यास आम्ही तेदेखील आमच्या वेबसाईटवर व पुस्तक स्वरूपात प्रकाशित करू.

तसेच कोणा प्रकल्पग्रस्तास आत्मकथन करावयाचे आहे परंतु त्यांची मुलाखत घ्यायला मुलाखतकार उपलब्ध होत नाही अशी स्थिती असल्यास आम्हाला +91-865-735-1636 ह्या मोबाईल क्रमांकावर कळवा, त्यांचे आत्मकथन त्यांच्या सोयीच्या ठिकाणी रेकॉर्ड करण्याची व्यवस्था फाऊंडेशनद्वारे करण्यात येईल.

चला तर, आपल्या कुटुंबातील व परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या मुलाखती रेकॉर्ड करून त्या प्रकाशित व संग्रहित करू या. आम्हाला पूर्ण खात्री आहे की प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण येत्या दहा वर्षांत केवळ महाराष्ट्राच्या अलिखित इतिहासातच नव्हे तर अखंड भारतातील मौखिक इतिहास प्रकल्पांमध्ये देखील मोलाची भर घालू शकू.

प्रकाशन : १ मार्च, २०२४

© 2025 Sitaram Mhatre Foundation

Call us:

+91-865-735-1636

Find us: 

Sitaram Smaran, House no. 896,

Sector 19B, Koparkhairane,

Navi Mumbai

  • Pinterest
  • Twitter
  • LinkedIn
  • Facebook
  • YouTube

Website developed & maintained by:

Mhatre's Traslation & Allied Services

Sitaram Mhatre Foundation

Our Programmes:

English for ALL

Science for ALL

Computers for ALL

Memoirs of the PAP

Bhakti Literature in Unicode

bottom of page