top of page

प्रस्तावना

प्रा. अलेसांद्रो पोर्तेली यांचा “What Makes Oral History Different” हा निबंध मौखिक इतिहासाच्या अभ्यासातील एक मैलाचा दगड मानला जातो. इतिहास, स्मृती, आणि (आत्म)कथन यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्याची एक नवीन दृष्टी या निबंधाने इतिहाससंशोधन जगताला दिली आहे. मौखिक कथन हा केवळ माहितीचा स्रोत नसून त्यात अर्थनिर्मितीची प्रक्रिया अंतर्भुत असते ही मूलगामी जाणीव या लेखातून स्पष्ट होते.

मराठी भाषेत मौखिक इतिहासाच्या सैद्धांतिक चर्चा तुलनेने मर्यादित आहेत. या पार्श्वभूमीवर सीताराम म्हात्रे फाऊंडेशनच्या 'प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने' या उपक्रमांतर्गत हा निबंध मराठीत उपलब्ध करून देण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थी, संशोधक आणि स्थलकार्य करणाऱ्या व्यक्तींना या विचारांशी थेट संवाद साधता येईल.

या भाषांतरामध्ये मूळ निबंधातील संकल्पनात्मक अचूकता आणि तर्कशुद्ध मांडणी शक्य तितकी जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. काही संज्ञा आणि संकल्पना मराठीत रूपांतरित करताना त्यांच्या सैद्धांतिक अर्थछटा टिकवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्याच वेळी मजकूर शक्य तितका वाचनसुलभ राहील याचीही काळजी घेतली आहे.

हे भाषांतर मूळ लेखकाच्या परवानगीने केवळ शैक्षणिक आणि अव्यावसायिक वापरासाठी प्रकाशित केले आहे.

मूळ लेखकाचा परिचय

प्रा. अलेसांद्रो पोर्तेली हे इटलीस्थित मौखिक इतिहासाचे अभ्यासक, लेखक आणि संगीतशास्त्रज्ञ आहेत. ते 'रोम ला सॅपिएन्झा' विद्यापीठाचे अँग्लो-अमेरिकन साहित्याचे निवृत्त प्राध्यापक आहेत. पोर्तेली यांच्या लेखनाने मौखिक इतिहासाचे लक्ष ऐतिहासिक अचूकतेच्या संकुचित दृष्टिकोनाकडून मौखिक वृत्तांतांचा अर्थ आणि स्मृतीच्या स्वरूपाकडे वळवले आहे. त्यांच्या लेखनाने या ज्ञानशाखेत एक आमूलाग्र बदल घडवून आणला. त्यांचे १९९१ सालचे द डेथ ऑफ लुईजी त्रास्तुली हे पुस्तक एका घटनेच्या परस्परविरोधी वृत्तांतांच्या अन्वयार्थांवर भाष्य करते. त्यांच्या १९९९ सालच्या द ऑर्डर हॅज बीन कॅरिड आऊट या पुस्तकाला ओरल हिस्ट्री असोसिएशन पुरस्कार आणि व्हियारेजिओ पारितोषिक मिळाले, तर त्यांच्या दे से इन हार्लन काउंटी (२०१०) या पुस्तकाला ॲपलेशियन स्टडीज असोसिएशनचा डब्ल्यू. डी. वेदरफोर्ड पुरस्कार मिळाला. १९७२ मध्ये पोर्तेली यांनी Circolo Gianni Bosio या लोकसाहित्य, मौखिक इतिहास आणि लोकांच्या संस्कृतीच्या अभ्यासाप्रती समर्पित कार्यकर्त्यांच्या मंडळाची स्थापना केली.

भाषांतरकाराचा परिचय

चंद्रकांत काळुराम म्हात्रे हे नवी मुंबईस्थित द्विभाषिक कवी, भाषांतरकार, व संतसाहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी इंग्रजी विषयामध्ये एम.ए. तसेच एम.फिल. या पदव्या प्राप्त केल्या असून भाषांतर विषयामध्ये पी.जी.डी.टी. ही पदविका प्राप्त केली आहे. त्यांचे One Hundred Poems of Chokha Mela हे पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या आणि One Hundred Poems of Tukaram हे पुस्तक सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ तामिळनाडूच्या एम.ए. (इंग्रजी) अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच, त्यांना संत सोयराबाई, संत कर्ममेळा, संत निर्मला व संत बंका यांच्या अभंगांच्या इंग्रजी भाषांतरासाठी (२०२५) English PEN व शिकागो युनिव्हर्सिटीचा संयुक्त पुरस्कार प्राप्त झालेला आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न (१९३३) या ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतरासाठी न्यू इंडिया फाऊंडेशन ट्रान्स्लेशन फेलोशिपकरिता त्यांचे नाव सध्या विचाराधीन (short listed) आहे.

स्त्रोत पाठ

A. Portelli, ‘What makes oral history different’ in R. Perks and A. Thomson (Ed.), The Oral History Reader, London, Routledge, 1998.

 

आम्ही काय प्रकाशित करतो

प्रकल्पग्रस्तांच्या बातम्या

प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने

प्रकल्पग्रस्तांची कर्तृत्वे

मत-मतांतरे

संपादकांस पत्रे

बातमी-लायक फोटो (Geo-Tagged)

बातमी-लायक व्हिडिओ

स्थानिक संस्कृतीविषयक लेख

स्थानिक भाषांमधील साहित्य

We the PAP_Header_website.png

प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने

मौखिक इतिहासाचे वेगळेपण कशात असते

मूळ लेखक : अलेसांद्रो पोर्तेली
भाषांतरकार : चंद्रकांत काळुराम म्हात्रे

“होय,” सौ. ऑलिव्हर म्हणाल्या, “आणि जेव्हा बराच काळ गेल्यानंतर ते त्याबाबतीत बोलू लागतात तेव्हा त्यांच्याकडे त्या प्रश्नाची उकल तयार असते जी त्यांनी स्वतःच रचलेली असते. तिचा काहीतरी उपयोग होण्यासारखा असतो का?” “असतो तर,” प्वॉरो म्हणाले… “अशी काही तथ्ये जाणून घेणे गरजेचे असते जी लोकांच्या स्मृतींमध्ये रेंगाळत राहिलेली असतात. भले त्यांना ते तथ्य नक्की काय असते, जे काही घडले ते का घडले किंवा त्यामागचे कारण काय होते हे कदाचित माहित नसते. पण एखादी गोष्ट जी आपल्याला माहित नसते किंवा आपल्याकडे ती जाणून घेण्याचा कोणताच मार्ग नसतो ती त्यांना सहज माहित असण्याची शक्यता असते. त्यामुळे कित्येकदा अशा स्मृतींमधून उपपत्त्या निघालेल्या आहेत…

अगाथा ख्रिस्ती, एलिफन्ट्स कॅन रीमेम्बर

 

 

मात्र त्याची ऐतिहासिक संशोधने ही पुस्तकांवर इतकी आधारलेली नसत जितकी ती लोकांवर आधारलेली असत; कारण त्याच्या आवडत्या विषयांमध्ये पुस्तकांचा समावेश अशोभनीयरीत्या दुर्लभपणे व्हायचा; उलटपक्षी त्याला जुनी माणसे, आणि त्याहूनही अधिक त्यांच्या बायका, खऱ्या इतिहासासाठी फारच मौल्यवान असणाऱ्या आख्यानरूप पारंपरिक ज्ञानाचे भांडार वाटत. त्यामुळे आपल्या शेतावर एखाद्या विस्तीर्ण सिकामोअर वृक्षाखाली उतरत्या छपराच्या घरात सुखासमाधानाने बंदिस्त राहणाऱ्या एखाद्या अस्सल डच कुटुंबाशी जेव्हा कधी त्याची गाठभेट होई तेव्हा त्याला  ते कुटुंब एखाद्या चामडी बांधणीच्या बटन असलेल्या लहान ग्रंथाप्रमाणे वाटत असे, आणि तो एखाद्या ग्रंथप्रेमीच्या उत्साहाने त्यांना अभ्यासत असे.

वॉशिंग्टन आयर्विंग, ‘रिप व्हॅन विंकल’

​​

स्मृतींमधून उपपत्तींकडे

एका समंधाने विद्वत्तेच्या प्रांगणाला पछाडले आहे : मौखिक इतिहासाच्या समंधाने. इटालियन बुद्धिजीवी वर्ग, जो बाहेरून आलेल्या नाविन्यपूर्ण गोष्टींकडे नेहमीच संशयाच्या दृष्टीने बघतो—आणि तरीही “परदेशी शोध” मात्र नेहमीच शिरोधार्य मानतो—तो मौखिक इतिहास म्हणजे काय असतो व त्याचा वापर कसा होतो हे समजून घेण्याचा प्रयत्नदेखील न करता मौखिक इतिहासाला कमी लेखण्यासाठी पुढे सरसावला आहे. त्यासाठी जी पद्धत वापरली गेली त्यामध्ये मौखिक इतिहास जे दावे करत नाही ते त्यावर लादण्याचा व सर्वांच्या चिंतानिवारणाकरिता त्या दाव्यांचे खंडन करण्याचा समावेश होता. उदाहरणार्थ, इटालियन दैनिकांपैकी सर्वाधिक बौद्धिक व आंतरराष्ट्रीय कलाच्या ला रिपब्लिकाने ‘“तळातुन आलेली” वर्णने आणि “मौखिक इतिहासा”ची कृत्रिम गाठोडी ज्यामध्ये वस्तू स्वतःहून चालणे आणि बोलणे अपेक्षित असते,” अशी संभावना करण्याच्या घाईत हेदेखील लक्षात घेतले नाही की मौखिक इतिहासाला ज्यांनी “स्वतःहून चालणे आणि बोलणे” अपेक्षित असते त्या वस्तू नव्हे तर लोक असतात (अर्थात असे लोक ज्यांना वस्तूंपेक्षा वरचा दर्जा सहसा दिला जात नाही).

 

अशी एक भीती दिसून येते की मौखिकतेचे पूरनियंत्रण दरवाजे उघडल्याबरोबर जणू काही कसल्याशा निराकार द्रवपदार्थाच्या स्वयंस्फूर्त अनियंत्रित लोंढ्यात लिखाण (आणि त्याच्याबरोबर तर्कशुद्धतादेखील) वाहून जाईल. पण असा पवित्रा घेतल्याने आपला एका वस्तुस्थितीकडे कानाडोळा होतो. ती म्हणजे लिखाणाबद्दलच्या आपल्या अतिरेकी आदरापायी आपली भाषा व संप्रेषणाबाबतची दृष्टी इतकी कमालीची विकृत बनली आहे की आपल्याला आता मौखिकता किंवा खुद्द लिखाणाचे स्वरूप यापैकी कशाचेच आकलन होत नाही. वस्तुतः लिखित आणि मौखिक स्रोत हे परस्परांहून पूर्णपणे भिन्न नसतात. त्यांची सामायिक तसेच स्वायत्त गुणवैशिष्ट्ये असतात, आणि अशी विशिष्ट कार्ये असतात जी दोन्हींपैकी कोणीतरी एकच पार पाडू शकतो (किंवा स्रोतांचा एक संच दुसऱ्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे पार पाडतो). म्हणूनच त्यांच्या अर्थनिश्चितीकरिता वेगवेगळी व विशिष्ट साधने आवश्यक असतात. पण मौखिक स्रोतांचे अतिमूल्यन किंवा अधोमूल्यन केल्याचा परिणाम त्यांचे विशिष्ट गुणधर्म पुसून टाकण्यामध्ये, ह्या स्रोतांना एकतर रूढ लिखित स्रोतांसाठी निव्वळ आधार ठरवण्यामध्ये, किंवा त्यांना सर्व समस्यांवरचा भ्रामक रामबाण इलाज ठरवण्यामध्ये होतो. ज्या निरनिराळ्या प्रकारे मौखिक इतिहास अंगभूतपणे वेगळा, आणि म्हणूनच विशिष्टरीत्या उपयोगी ठरतो, त्यापैकी काही ह्या निबंधात मांडण्याचा प्रयत्न केला जाईल.

मौखिक स्रोतांची मौखिकता

मौखिक स्रोत हे मौखिक स्रोत असतात. रेकॉर्ड केलेला ऑडिओ/व्हिडिओ हाच खराखुरा दस्तऐवज असतो हे कबूल करण्यास अभ्यासक तयार असतात; पण काम मात्र जवळजवळ सर्वजण प्रतिलेखांवर करतात, आणि प्रकाशनदेखील फक्त प्रतिलेखांचेच केले जाते. अधूनमधून ऑडिओ/व्हिडिओ खरोखरच नाश पावत असतात : उच्चारित शब्दाच्या नाशाचे एक प्रतीकात्मक उदाहरण.

 

प्रतिलेख ध्वन्य वस्तूंचे रूपांतर दृश्य वस्तूंमध्ये करतो, ज्यामध्ये अपरिहार्यपणे बदल व अर्थनिश्चितीकरण अंतर्भूत असतात. प्रतिलेखांच्या तुलनेत रेकॉर्डिंगची आगळी परिणामकारकता—उदाहरणार्थ, अध्ययन-अध्यापनाच्या कार्यांमध्ये—ही प्रत्यक्ष अनुभवायचीच गोष्ट असते. प्रतिलेखनाच्या नवनवीन आणि अधिक बारकाईपूर्ण पद्धती शोधण्यात गरजेपेक्षा अधिक लक्ष घालणे अनावश्यक आहे असे मला जे वाटते त्याचे हे एक कारण आहे. संशोधनकार्यामध्ये ऑडिओ/व्हिडिओची जागा प्रतिलेख घेईल अशी अपेक्षा करणे म्हणजे मूळ चित्रांच्या नक्कली समोर ठेवून कलासमीक्षण करणे, किंवा भाषांतरे समोर ठेवून साहित्यिक समीक्षा करण्यासारखे आहे. टोकाचे शाब्दिक भाषांतर हे कधीच सर्वोत्तम भाषांतर नसते, आणि खऱ्या अर्थाने प्रामाणिक असलेल्या भाषांतरामध्ये नेहमीच एका मर्यादेपर्यंत नवशोध अंतर्भूत असतो. हेच तत्व मौखिक स्रोतांच्या प्रतिलेखनाला देखील लागू होऊ शकते.

 

मौखिक स्रोतांच्या मौखिकतेचा अनादर करण्याचा थेट परिणाम अर्थनिश्चितीच्या सिद्धांतावर (म्हणजेच सामाजिक वास्तवाच्या आकलनाच्या सिद्धांतावर) होत असतो. सामान्यतः ज्या पहिल्या पैलूवर जोर दिला जातो तो असतो उगम : मौखिक स्रोत आपल्याला निरक्षर लोकांविषयी किंवा ज्यांचा लिखित इतिहास एकतर गहाळ झालेला आहे किंवा त्याचा विपर्यास केला गेला आहे अशा सामाजिक समूहांविषयी माहिती देतात. दुसरा पैलू निगडित आहे मजकुराशी : अशा लोकांचे आणि समूहांचे दैनंदिन जीवन आणि भौतिक संस्कृती. तथापि, ह्या गोष्टी फक्त मौखिक इतिहासालाच लागू होतात असे नाही. उदाहरणार्थ, देशनिर्वाश्यांच्या पत्रांचा उगम आणि मजकूर वरच्या सारखाच असतो, पण ती लिखित स्वरूपात असतात. उलटपक्षी अनेक मौखिक इतिहास प्रकल्पांनी अशा सामाजिक समूहांतील सदस्यांच्या मुलाखती गोळा केलेल्या आहेत जे लेखनाचा वापर करतात, आणि ते प्रकल्प अशा विषयांशी निगडित राहिलेले आहेत ज्यांचा अभ्यास सामान्यपणे मानक लिखित अभिलेखीय साहित्य करते. त्यामुळे सामाजिक इतिहास सामान्यतः ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्रोतांचा उपयोग करतो त्यांच्या तुलनेत मौखिक स्रोतांचे वेगळेपण निर्धारित करताना उगम आणि मजकूर पुरेसे नाहीत; म्हणूनच मौखिक इतिहासाचे अनेक सिद्धांत हे वस्तुतः साकल्याने सामाजिक इतिहासाचे सिद्धांत असतात.

 

ह्या वस्तुस्थितीमुळे मौखिक इतिहासाचे वेगळेपण निर्धारित करणाऱ्या घटकाच्या शोधात आपल्याला सर्वप्रथम रूपाकडे वळावे लागेल. इथे आपल्याला हे पुन्हा सांगण्याची गरजदेखील असायला नको की लेखन हे भाषेला अनन्यपणे खंडकीय गुणविशेषांद्वारे  (रेखीम, अक्षर, शब्द, आणि वाक्यांद्वारे) प्रतिरूपित करत असते. पण भाषेच्या जडणघडणीत गुणविशेषांच्या अशा आणखी एका संचाचा देखील समावेश असतो, ज्यांना कोणत्याच एकल खंडकात सामावता येत नाही, मात्र ते अर्थवाहक नक्कीच असतात. सूर व आवाजाची पट्टी आणि लोकरूढ वाणीची लय हे अशाप्रकारच्या गर्भित अर्थाचे आणि सामाजिक लक्षितार्थांचे वाहक असतात ज्यांना लेखनामध्ये प्रतिरूपित करता येणे शक्य नसते—जरी स्वरलिपीच्या सहाय्याने हे शक्य होऊ शकले तरी ते अपुऱ्या व अजिबात सुगम नसलेल्या स्वरूपाचे असते. एकाच विधानाचे अगदी परस्परविरोधी अर्थ होऊ शकतात ज्याची निश्चिती वक्त्याच्या स्वरयोजनानुसार होते, मात्र ते प्रतिलेखामध्ये वस्तुनिष्ठपणे प्रतिरूपित करणे शक्य नसते; त्याचे फक्त साधारण वर्णन प्रतिलेखकाच्या स्वतःच्या शब्दांत केले जाऊ शकते.

 

सर्वसाधारणपणे प्रतिलेखाला सुवाच्य बनवण्यासाठी त्यामध्ये विरामचिन्हे घालणे गरजेचे असते, जी नेहमीच प्रतिलेखकाने घातलेली जवळ-जवळ स्वेच्छानुसारी भर असते. विरामचिन्हे व्याकरणाच्या नियमांनुसार विभागलेले विराम दर्शवतात : प्रत्येक चिन्हाची एक संकेतमान्य जागा, अर्थ, आणि  लांबी असते. ही चिन्हे बोलणाऱ्या व्यक्तीच्या लयींशी आणि विरामांशी क्वचितच जुळतात, आणि परिणामतः ती वाणीला व्याकरणाच्या व तर्काच्या अशा नियमांमध्ये डांबतात ज्यांचे पालन ती वाणी करतेच असे नाही. वाणीचा अर्थ समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये विरामाची नेमकी लांबी व स्थान यांची महत्वाची भूमिका असते. नियमित व्याकरणीय विरामांचा कल जे काही बोलले जाते त्याची एका ढोबळ विवरणात्मक व निर्देशात्मक आकृतिबंधाभोवती सुव्यवस्था लावण्याकडे असतो, तर अनियमित लांबी व स्थान असलेले विराम भावनात्मक मजकुराला उठाव देतात. जसजशी चर्चेस घेतलेल्या विषयासंबंधी त्यांची मनोवृत्ती बदलत जाते तसतसे अनेक (आत्म)कथनकर्ते एकाच मुलाखतीदरम्यान एका प्रकारच्या लयीत बोलताबोलता वेगळ्या लयीत बोलायला लागतात. अर्थातच, ह्याचा बोध फक्त श्रवणाद्वारे होऊ शकतो, वाचनाद्वारे नाही.

 

मुलाखतीदरम्यानचा वाणीचा वेग आणि त्यात होणारे बदल यांसंबंधीदेखील अशाच प्रकारचा मुद्दा मांडता येऊ शकतो. ह्याबाबत अर्थनिश्चितीसंबंधी कोणतेही ठराविक नियम नाहीत : वेग मंदावण्याचा अर्थ अधिक महत्व देणे असा होऊ शकतो तसेच अधिक अवघड वाटणे असादेखील होऊ शकतो, आणि वाढलेला वेग हा काही मुद्दे पटकन बोलून मोकळे होण्याची इच्छा दर्शवू शकतो तसेच विषयाशी अधिक परिचय किंवा सहजता दर्शवू शकतो. सर्वच प्रकरणांमध्ये वेगातील बदलांच्या विश्लेषणाला लयीच्या विश्लेषणाची जोड दिलीच पाहिजे. तथापि वारंवार होणारे बदल हा वाणीचा स्थायीभाव असतो, तर नियमितता हा लेखनाचा (सगळ्यात जास्त छापील लेखनाचा) स्थायीभाव असतो आणि वाचनाचा गृहीत स्थायीभाव असतो : वाचण्याच्या लयीत अथवा वेगात होणारे बदल हे वाचकाद्वारे केले जातात, खुद्द मूळ पाठाद्वारे नाही.

 

हा काही भाषाशास्त्रीय शुद्धतेचा प्रश्न नाही. ज्या गुणविषेशांना खंडकांमध्ये सामावून घेणे शक्य नसते ते गुणविशेष मूलभूत कथनपर कार्ये (अनन्य नसली तरी अतिशय महत्वाची) बजावत असतात : ते (आत्म)कथनकर्त्यांच्या भावना, त्यांचा त्या कहाणीमधला सहभाग, आणि त्या कहाणीचा त्यांच्यावर कशा प्रकारे परिणाम झाला हे सर्व प्रकट करत असतात. ह्यामध्ये पुष्कळदा असे दृष्टिकोन समाविष्ट असतात जे वक्ता इतर कोणत्या प्रकारे व्यक्त करू शकत नाही (किंवा करू इच्छित नाही), किंवा अशा बाबीदेखील असतात ज्या पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणाखाली नसतात. ह्या गुणविशेषांना हद्दपार करून आपण वाणीच्या भावनिक मजकुराचे इतके सपाटीकरण करतो की तिला लिखित दस्तऐवजाच्या कथित समतोलपणाच्या व वस्तुनिष्ठतेच्या पातळीवर आणून सोडतो. जेव्हा माहितीदार वंचित वर्गांतील असतात तेव्हा तर हे अधिकच लागू होते : ज्यांनी आपल्या वाणीमध्ये लेखनाचा एकसुरीपणा उतरवण्याचा धडा गिरवलेला आहे अशा मध्यमवर्गीय भाषकांच्या तुलनेत त्यांची शब्दसंपत्ती कदाचित कमी असू शकते पण सूर, आवाजाची पट्टी व स्वरयोजनेचा त्यांचा पल्ला पुष्कळदा अधिक मोठा असतो.

 

मौखिक इतिहासाचे कथाकथनात्मक स्वरूप

मौखिक इतिहासात्मक स्रोत कथनपर असतात. म्हणूनच मौखिक इतिहास सामग्रीच्या विश्लेषणाने साहित्याच्या आणि लोकसाहित्याच्या क्षेत्रातील कथाकथनात्मक सिद्धांताने विकसित केलेल्या सामान्य कोट्यांपैकी काहींचा स्वतःसाठी उपयोग करून घेतला पाहिजे. हे जितके लोकसाहित्याच्या रूपतः अधिक सुव्यवस्थित सामग्रीला लागू पडते तितकेच मुक्त मुलाखतींमध्ये केलेल्या कथनाला लागू पडते.

 

            उदाहरणार्थ, काही (आत्म)कथनांमध्ये कथनाच्या ‘वेगा’मध्ये लक्षणीय परिवर्तने समाविष्ट असतात; हा वेग म्हणजेच वर्णन केलेल्या प्रसंगांना लागलेला कालावधी आणि कथनाला लागलेला कालावधी यांचे परस्परांशी प्रमाण होय. एखादा माहितीदार आपले वर्षानुवर्षांचे अनुभव मोजक्या शब्दांतच सांगेल, किंवा लहानसहान प्रसंग अगदी सविस्तर सांगत बसेल. जरी आपण अर्थनिश्चितीचे काहीएक सामान्य मानक स्थापित करू शकत नाही तरीही ही दोलने अर्थपूर्ण असतात : एखादा प्रसंग सविस्तर सांगत बसणे हा त्याचे महत्व अधोरेखित करण्याचा एक प्रकार असू शकतो,  पण इतर अधिक नाजूक मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याची ती रणनीतीदेखील असू शकते. सर्वच प्रकरणांमध्ये कथनाचा वेग आणि (आत्म)कथनकर्त्याचा आशय ह्यांमध्ये एक संबंध खचितच असतो. हेच तत्व जेरार्ड जेनेट ह्यांनी मांडलेल्या इतर अनेक कोट्यांना लागू होते, जसे की ‘अंतर’ किंवा ‘परिप्रेक्ष्य’, जी (आत्म)कथनकर्त्याची कहाणीप्रती असलेली मनोभूमिका स्पष्ट करतात.

 

उपेक्षित वर्गांतून आलेल्या मौखिक स्रोतांची नाळ लोककथनांच्या परंपरेशी जुळलेली असते. सुशिक्षित वर्गांच्या लिखित परंपरेच्या तुलनेत ह्या परंपरेत कथनात्मक वाङ्मयप्रकारांमधील भेदांकडे वेगळ्या तऱ्हेने पाहिले जाते. हे ‘वस्तुस्थितीपूर्ण’ आणि कलात्मक’ कथनांमधील, तसेच ‘प्रसंग’ आणि संवेदना किंवा कल्पना ह्यांमधील वाङ्मयप्रकारसंबंधी भेदांना लागू पडते. एखादा वृत्तांत ‘खरा’ असल्याचा समज दंतकथेच्या बाबतीत तितकाच महत्वाचा असतो जितका तो वैयक्तिक अनुभव आणि ऐतिहासिक स्मृतीच्या बाबतीत महत्वाचा असतो, मात्र असे असूनसुद्धा खासकरून ऐतिहासिक माहिती प्रेषित करण्याच्या कामी नेमलेला एकदेखील औपचारिक मौखिक वाङ्मयप्रकार अस्तित्वात नाही; ऐतिहासिक, काव्यमय, आणि दंतकथात्मक कथने पुष्कळदा अविभाज्यपणे एकमेकांत गुंफली जातात. परिणामतः अशा कथनांमध्ये (आत्म)कथनकर्त्याच्या बाह्यजगतात जे काही घडते आणि अंतर्जगतात जे काही घडते, तसेच व्यक्तीशी संबंधित असलेल्या गोष्टी आणि समूहाशी संबंधित असलेल्या गोष्टी यांमधील सीमारेषा प्रस्थापित लिखित वाङ्मयप्रकारांमधील सीमारेषांच्या तुलनेत अधिक धूसर होऊ शकतात. त्यामुळे वैयक्तिक ‘सत्य’ हे सामायिक ‘कल्पने’शी तंतोतंत जुळू शकते.

 

ह्यापैकी प्रत्येक घटकाचा रूपात्मक आणि शैलीगत घटकांनी खुलासा केला जाऊ शकतो. एखाद्या व्यक्तीच्या कथनामध्ये रूपबद्ध सामग्रीचा (म्हणी, गीते, सूत्रे, आणि साचेबंद व्यक्तिरेखांचा) वापर सामान्यांपेक्षा कमी किंवा अधिक आहे यावरून त्या कथनामध्ये सामूहिक दृष्टिकोनाचे प्रमाण कितपत आहे हे मोजता येऊ शकते. पुष्कळदा, प्रमाण भाषा व बोलीभाषा यांचा आलटून-पालटून केलेला असा वापर हा वक्त्यांचे कथनावर कितपत नियंत्रण आहे याचा द्योतक असतो.

 

एक नमुनेदार वारंवार आढळणारी संरचना अशी असते की ज्यामध्ये सर्वसाधारणपणे प्रमाण भाषा वापरली जाते, मात्र विषयांतरांच्या वेळी किंवा एकटादुकटा किस्सा सांगतेवेळी बोलीभाषा डोके वर काढते, जिचा वापर (आत्म)कथनकर्त्याच्या अधिक प्रत्यक्ष सहभागाशी जुळतो किंवा (जसे की ज्यावेळी बोलीभाषेचा आणि रूपबद्ध भाषेचा वापर एकसमयावच्छेदेकरून होतो) सामूहिक स्मृतीच्या घुसखोरीशी जुळतो. उलटपक्षी बोलीभाषेतील कथनामध्ये प्रमाण भाषेचा उद्भव त्यावेळी होऊ शकतो ज्यावेळी ते कथन सार्वजनिक क्षेत्राशी जास्त जवळचा संबंध असलेल्या विषयांना हाताळते, जसे की राजकारण. मागच्याप्रमाणेच ह्याचेदेखील दोन्ही अर्थ होऊ शकतात : विषयवस्तूपासून घेतलेल्या फारकतीचे कमी अधिक अंशी जाणीवपूर्वक प्रमाण, किंवा राजकारणातील सहभागाने सुरु झालेल्या अधिक ‘सुशिक्षित’ अभिव्यक्तीच्या प्रकारावर ‘विजय’ मिळविण्याची प्रक्रिया. याउलट पारिभाषिक शब्दांचे बोली-रूपांतरण हे पारंपारिक वाणीच्या जीवनशक्तीचे आणि ज्या मार्गाने त्या बोलीचे भाषक आपल्या संस्कृतीच्या अभिव्यक्तीची कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करतात त्याचे द्योतक असू शकते.

प्रसंग आणि अर्थ

वरील विवेचनावरुन असा निष्कर्ष निघतो की मौखिक इतिहासाला वेगळेपण देणारी पहिली गोष्ट ही आहे की तो आपल्याला प्रसंगांबद्दल तुलनेने कमी आणि त्यांच्या अर्थाबद्दल जास्त सांगतो. ह्याचा अर्थ असा होत नाही की मौखिक इतिहासाला वस्तुस्थितीविषयक सप्रमाणता नसते. मुलाखती पुष्कळदा अपरिचित प्रसंग किंवा परिचित प्रसंगांचे अपरिचित पैलू उघडकीस आणतात; उपेक्षित वर्गांच्या दैनंदिन जीवनाच्या अनन्वेषित भागांवर त्या नेहमीच नवीन प्रकाश टाकतात. या दृष्टिकोनातून मौखिक स्रोतांमुळे निर्माण होणारी एकच समस्या म्हणजे पडताळणीची समस्या (पुढच्या विभागात मी या मुद्द्याकडे परत वळेन).

 

            परंतु एक अनन्य आणि बहुमोल असे तत्व जे मौखिक स्रोत इतिहासकारावर सक्तीने लादतात आणि जे इतर कोणत्याच स्रोतांमध्ये समतुल्य प्रमाणात नसते ते आहे वक्त्याची आत्मनिष्ठा. जर आपली संशोधनाकडे बघण्याची दृष्टी पुरेशी व्यापक आणि सुस्पष्ट असेल तर त्यातून एखाद्या समूहाच्या अथवा वर्गाच्या आत्मनिष्ठतेचा आडवा छेद (म्हणजेच प्रातिनिधिक नमुना) समोर येऊ शकतो. मौखिक स्रोत लोकांनी काय केले इतकेच आपल्याला सांगत नाहीत तर त्यांना काय करायचे होते, आपण काय करत आहोत असे त्यांना वाटत होते, आणि आपण काय केले असे त्यांना आता वाटते हेदेखील सांगतात. आपल्याला जे माहित आहे त्यात मौखिक स्रोत कदाचित फारशी भर घालू शकत नाहीत, उदाहरणार्थ संपात सामील झालेल्या कामगारांना त्यामुळे चुकवावी लागलेली आर्थिक किंमत; पण ते आपल्याला त्या संपामुळे कामगारांना चुकवाव्या लागलेल्या मानसिक किमतीची पुरेपूर कल्पना देतात. रशियन रूपवाद्यांची एक वाङ्मयीन कोटि उसनी घेऊन आपण असे म्हणू शकतो की मौखिक स्रोत, विशेषकरून उपेक्षित वर्गांतून आलेले मौखिक स्रोत, हे वार्तेच्या (fabula)—गोष्टीच्या तार्किक, कारणवाचक क्रमाच्या—संदर्भात इतर स्रोतांना पूरक ठरणारे अत्यंत उपयुक्त घटक आहेत; पण ते स्रोत अनन्य आणि आवश्यक बनतात ते त्यांच्या कथानकामुळे—गोष्ट सांगण्यासाठी (आत्म)कथनकर्ते गोष्टीच्या सामग्रीची ज्याप्रकारे मांडणी करतात त्या मांडणीमुळे. वक्त्यांचे आपल्या इतिहासाशी जे नाते असते त्याला कथनाची संरचना खोलवर उलगडून दाखवते.

 

            इतिहासाच्या क्षेत्रात तुलनेने अधिक ठळकपणे दिसणाऱ्या ‘घटितां’इतकेच महत्व आत्मनिष्ठेला आहे. प्रत्यक्षात जे काही घडले त्याच्याइतकेच माहिती देणाऱ्यांना जे घडले असे वाटते ते खरोखर एक ऐतिहासिक घटित असते (म्हणजेच, त्यांना तसे वाटणे हेच ते घटित). जेव्हा तेर्नीमधील कामगार त्यांच्या इतिहासातील एक निर्णायक प्रसंग (लुईजी त्रस्तूलीची हत्या) एका तारखेवरून दुसऱ्या तारखेवर आणि एका पार्श्वभूमीकडून दुसऱ्या पार्श्वभूमीकडे नेऊन ठेवतात तेव्हा त्यामुळे वास्तविक कालानुक्रमावर प्रश्नचिन्ह उभे राहत नाही, पण त्यांचे तसे करणे आपल्याला त्या शहराच्या इतिहासातील एका संपूर्ण टप्प्याच्या आपण लावलेल्या अन्वयार्थाची नव्याने मांडणी करण्यास नक्कीच भाग पाडते. जेव्हा तेर्नीमधीलच स्थानिक युनियनचा एक वयोवृद्ध नेता दुसऱ्या महायुद्धानंतर आपण कम्युनिस्ट पार्टीला आपली रणनीती पूर्णपणे बदलण्यास कसे जवळपास भाग पाडले होते ह्याची स्वप्नवत कहाणी रचतो तेव्हा आपण डाव्या विचारसरणीमधील राजकीय वादविवादांच्या आपल्या पूर्वप्रतिमानांमध्ये बदल करत नाही तर तळागाळातील ज्या कार्यकर्त्यांना क्रांतीच्या आपल्या गरजा व आकांक्षा आपल्या सुप्तमनात गाडून ठेवाव्या लागल्या होत्या त्या कार्यकर्त्यांना मोजाव्या लागलेल्या विशिष्ट निर्णयांच्या प्रत्यक्ष किमतीची व्याप्ती आपल्याला कळते. जेव्हा आपल्याला शोधाअंती आढळून येते की देशाच्या इतर भागांमध्ये अशाच प्रकारच्या कहाण्या सांगितल्या जातात तेव्हा असा अर्धकच्चा दंतकथागत व्यूह आपल्या नजरेसमोर येतो ज्यामध्ये नाउमेद झालेल्या एका म्हाताऱ्याची व्यर्थ बडबड त्याच्या पार्टीच्या इतिहासाबद्दल असे बरेच काही सांगून जाते जे त्या पार्टीच्या अधिकृत नेत्यांच्या लांबलचक आणि सुबोध संस्मरणांमध्ये कधीच सांगितले जात नाही.१०

 

आपण मौखिक स्रोतांवर विश्वास ठेवावा का?

मौखिक स्रोत विश्वसनीय असतात पण त्यांची विश्वसनीयता वेगळी असते. मौखिक कथनाचे महत्व त्याच्याकरवी घटिताला धरून चालण्यामध्ये नसते तर त्या घटितापासून फारकत घेण्यामध्ये असते कारण ह्याच प्रक्रियेमधून कल्पनाशक्ती, प्रतीकात्मकता आणि आकांक्षा यांचा अविष्कार होत असतो. म्हणून कोणतेही मौखिक स्रोत ‘खोटे’ नसतात. सर्व प्रकारच्या स्रोतांसाठी आवश्यक असणाऱ्या भाषाशास्त्रीय समीक्षेच्या आणि तथ्य पडताळणीच्या सर्व प्रस्थापित निकषांवर आपण मौखिक स्रोतांची तथ्यात्मक विश्वसनीयता तपासून घेतल्यानंतर त्यांचे वेगळेपण उरते ते ह्या वस्तुस्थितीत की ‘चुकीची’ विधानेसुद्धा मानसिकदृष्ट्या ‘सत्यच’ असतात, तसेच तथ्यात्मकदृष्ट्या विश्वासार्ह वृत्तांतांइतकेच हे सत्य महत्वाचे असू शकते.

 

            खचितच, ह्याचा अर्थ असा नाही की तथ्यात्मक विश्वसनीयतेला लिखित दस्तऐवजांची मक्तेदारी समजणाऱ्या प्रबळ पूर्वग्रहाला आपण खरे मानायचे. खूपदा लिखित दस्तऐवज हे अज्ञात मौखिक स्रोतांचे फक्त अनियंत्रित प्रसारण असते (उदाहरणार्थ, त्रस्तूलीच्या मृत्यूवरील अहवाल, ज्याची सुरुवात अशी होते : ‘तोंडी मिळालेल्या माहितीनुसार…’). या मौखिक ‘आदि-स्रोतांपासून’ ते लिखित दस्तऐवजापर्यंतचा प्रवास हा पुष्कळदा अशा प्रक्रियांचा परिणाम असतो ज्यांना कसलीच शास्त्रीय विश्वसनीयता नसते आणि ज्यांमध्ये वारंवार वर्ग-धार्जिणेपणाचे प्राबल्य असते. न्यायालयीन खटल्यांच्या अभिलेखांमध्ये (किमान इटलीमध्ये तरी—जिथे टेप रेकॉर्डरला किंवा लघुलिपीतील अनुलेखांना काहीच कायदेशीर दर्जा दिला जात नाही) जे नोंदवून घेतले जाते ते प्रत्यक्ष साक्षीदारांचे स्वतःचे शब्द नसतात तर न्यायाधीशांनी लिपिकाला सांगितलेला (डिक्टेट केलेला) सारांश असतो. अशा कार्यपद्धतीमध्ये अंतर्निहित असलेला विपर्यास हा त्याचे मूल्यमापन करण्याच्या पलीकडचा असतो, विशेषकरून जेव्हा मुळात वक्त्यांनी स्वतःला बोलीभाषेत अभिव्यक्त केलेले असते. तरीसुद्धा मौखिक स्रोतांना नाक मुरडणारे अनेक इतिहासकार या न्यायिक अनुलेखांचा काहीएक प्रश्न न विचारता स्वीकार करत असतात. जराशा कमी प्रमाणात हे संसदीय अभिलेखांना, सभांच्या आणि अधिवेशनांच्या अधिवृत्तांना, आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतींनाही (लघुलेखनाच्या वारंवार वापरामुळे) लागू पडते : हे सर्व असे स्रोत आहेत ज्यांचा वापर प्रमाणित ऐतिहासिक संशोधनामध्ये वैधपणे आणि सर्रास केला जातो.

 

            या पूर्वग्रहाचाच एक उप-परिणाम म्हणजे मौखिक स्रोत आणि घडलेल्या घटनांमध्ये अंतर पडलेले असते, आणि म्हणूनच त्यांना सदोष स्मरणशक्तीद्वारे होणाऱ्या विपर्यासाचा दोष लागतो ह्या मुद्द्यांवर दिला जाणारा भर. वास्तविक पाहता ही समस्या अनेक लिखित दस्तऐवजांच्या बाबतीत उद्भवते : हे दस्तऐवज ज्या घटनेबद्दल बोलत असतात सामान्यतः ती घटना घडून गेल्यानंतरच काही काळाने ते दस्तऐवज लिहले जातात, आणि पुष्कळदा त्या घटनेत प्रत्यक्ष सहभाग नसलेल्यांकडून. मौखिक स्रोत हे काळाचे अंतर त्यांच्या कितीतरी अधिक जवळच्या वैयक्तिक सहभागामुळे भरून काढू शकतात. राजकारण्यांची किंवा कामगार नेत्यांची संस्मरणे जोपर्यंत त्यांतील चूक सिद्ध होत नाही तोपर्यंत सामान्यतः विश्वसनीय मानली जातात, मात्र ज्या घटनांबद्दल ती संस्मरणे बोलत असतात त्यांच्या काही पैलूंपासून तीदेखील तितक्याच अंतरावर असतात जितक्या अंतरावर अनेक मौखिक इतिहासाच्या मुलाखती असतात. फरक इतकाच असतो की ती संस्मरणे ‘लिखित पाठा’चे अविकारी रूप घेऊन काळावरील आपले परावलंबित्व लपवत असतात. उलटपक्षी मौखिक (आत्म)कथनकर्त्यांना त्यांच्या संस्कृतीच्या परिघात स्मरणशक्तीला मदत करणारी काही विशिष्ट साधने उपलब्ध असतात. अनेक कहाण्या पुन्हापुन्हा सांगितल्या जातात, किंवा समुदायातील इतर सदस्यांबरोबर त्याविषयी चर्चा होत असतात; आकृतिबद्ध कथन—किंबहुना छंदोबद्ध रचनादेखील—एखाद्या घटनेच्या पाठ्य रूपांतराचे जतन करण्यास मदत करू शकते.

 

वस्तुतः आपल्याला हे विसरता कामा नये की मौखिक माहितीदार हे साक्षरदेखील असू शकतात. रोमन टेकड्यांच्या जेंत्सानोमधील शेतमजूर संघाचे भूतपूर्व नेते तिबेरियो डुची यांचे उदाहरण अप्रतिनिधिक असू शकते : आपले स्वतःचे अनुभव लक्षात ठेवण्याबरोबरच त्यांनी स्थानिक अभिलेखागारामध्ये संशोधनदेखील केले होते. पण अनेक माहितीदार पुस्तके व वर्तमानपत्रे वाचतात, रेडिओ ऐकतात व टीव्ही बघतात, प्रवचने व राजकीय भाषणे ऐकतात, दैनंदिन्या लिहितात, आणि पत्रे, कात्रणे, आणि छायाचित्रांचे अल्बम संग्रही ठेवतात. गेल्या कित्येक शतकांपासून मौखिक परंपरा आणि लिखाण हे एकमेकांपासून विभक्तपणे अस्तित्वात राहिलेले नाहीत : ज्याप्रमाणे अनेक लिखित स्रोत हे मौखिक परंपरेवर आधारलेले असतात, त्याचप्रमाणे आधुनिक मौखिक परंपरा ही स्वतःच लिखाणाने ओतप्रोत भारलेली आहे.

 

पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की स्मरणशक्ती म्हणजे काही घटितांची निष्क्रिय वखार नसते, तर ती अर्थांच्या निर्मितीची एक सक्रिय प्रक्रिया असते. त्यामुळे इतिहासकारासाठी मौखिक स्रोतांची विशिष्ट उपयुक्तता ही भूतकाळाचे जतन करण्याच्या त्यांच्या क्षमतेपेक्षा स्मरणशक्तीद्वारे घडवण्यात आलेल्या या बदलांमध्येच अधिक सामावलेली असते. हे बदल (आत्म)कथनकर्त्याद्वारे भूतकाळाची संगत लावून आपल्या जीवनाला काहीएक अर्थ देण्याच्या, आणि मुलाखतीस व कथनास आपल्या ऐतिहासिक चौकटीत बसविण्याच्या प्रयासांवर प्रकाश टाकतात.

 

(आत्म)कथनकर्त्यांच्या वैयक्तिक आत्मनिष्ठ बोधावस्थेमध्ये किंवा त्यांच्या सामाजिक-आर्थिक दर्जामध्ये कालांतराने घडून आलेल्या बदलांचा परिणाम जरी पूर्वीच्या घटनांच्या प्रत्यक्ष वर्णनांवर झाला नाही तरी किमानपक्षी कहाणीच्या मूल्यमापनावर आणि तिच्यावर चढवण्यात येणाऱ्या ‘रंगावर’ नक्कीच होतो. उदाहरणार्थ, जेव्हा घातपाती कारवायांसारख्या संघर्षाच्या बेकायदेशीर मार्गांचे वर्णन करण्याची वेळ येते तेव्हा कित्येक लोक मूग गिळणे पसंत करतात. याचा अर्थ असा नाही की त्यांना त्या गोष्टी स्पष्टपणे आठवत नसतात; याचा अर्थ असा की त्यांच्या राजकीय मतांमध्ये, वैयक्तिक परिस्थितीमध्ये, किंवा त्यांच्या पक्षाच्या भूमिकेमध्ये बदल घडून आला आहे. त्यामुळे गतकाळात कायदेशीर आणि अगदी सामान्य किंवा आवश्यक मानली गेलेली कृत्ये आता अस्वीकार्य मानली जाऊ शकतात आणि परंपरेमधून अक्षरशः बहिष्कृत केली जाऊ शकतात. अशा प्रकरणांमध्ये माहितीदार जे काही लपवतात त्यामध्ये आणि त्याला ते तसे लपवतात ह्या वस्तुस्थितीमध्ये सर्वांत मौल्यवान माहिती दडलेली असते—ते जे काही सांगतात त्यात नाही.

 

तथापि पुष्कळदा आपल्या भूतकालीन दृष्टिकोनांची पुनर्रचना करण्याची क्षमता—वर्तमानकालीन दृष्टिकोनांशी त्यांचा मेळ बसत नसला तरीही—(आत्म)कथनकर्त्यांमध्ये असते. तेर्नी कारखान्यातील कामगारांच्या बाबतीत हाच प्रकार दिसून येतो. ते १९५३ सालच्या प्रचंड कामगार-कपातीस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर घेतलेला हिंसक सूड आपल्या उद्दिष्टांसाठी प्रतिकूल ठरला असण्याची शक्यता बोलून दाखवतात, मात्र त्याचबरोबर तो सूड त्यावेळी उपयुक्त आणि संयुक्तिक का वाटला होता ह्याची ते खूप सुबोधपणे पुनर्रचनादेखील करतात. सध्याच्या काळातील सर्वांत महत्वाच्या मौखिक कथनांपैकी एक असलेल्या ऑटोबायोग्राफी ऑफ माल्कम एक्स (माल्कम एक्सचे आत्मचरित्र) मध्ये (आत्म)कथनकर्ता त्याच्या वर्तमानकालीन आत्मभानापर्यंत पोहचण्याआधी त्याचे मन कशाप्रकारे काम करायचे याचे अत्यंत भावदर्शी वर्णन करतो, आणि त्यानंतर त्याच्या वर्तमानकालीन राजकीय आणि धार्मिक बोधावस्थेच्या मापदंडांवर त्याच्या भूतकालीन व्यक्तित्वाचे मूल्यमापन करतो. जर मुलाखत कुशलतेने घेतली गेली आणि मुलाखत घेण्यामागची उद्दीष्ट्ये (आत्म)कथनकर्त्यांना स्पष्टपणे माहित असली तर त्यांना स्वतःच्या भूतकालीन आणि वर्तमानकालीन व्यक्तित्वांमध्ये भेद करणे, आणि स्वतःच्या भूतकालीन व्यक्तित्वाला वर्तमानकालीन व्यक्तित्वापेक्षा वेगळे असे मूर्तरूप देणे अशक्य नसते. अशा प्रकरणांमध्ये—माल्कम एक्स पुन्हा एकदा प्रातिनिधिक ठरतो—उपरोध (irony) हा मुख्य कथन प्रकार असतो : ज्यामध्ये दोन वेगवेगळाले नैतिक (किंवा राजकीय, किंवा धार्मिक) आणि कथनात्मक मापदंड ढवळाढवळ आणि कुरघोडी करत असतात, आणि त्यांच्यामधील ताण कहाणी सांगण्याच्या पद्धतीला आकार देत असतो.

उलटपक्षी आपल्याला असेदेखील (आत्म)कथनकर्ते भेटू शकतात ज्यांची बोधावस्था त्यांच्या वैयक्तिक अनुभवाच्या निर्णायक क्षणांपाशीच खुंटलेली आहे असे वाटू लागते : उदाहरणार्थ, नाझी आक्रमणाविरुद्ध लढलेले काही स्वातंत्र्य सैनिक, किंवा युद्धकामगिरीवरून परतलेले सैनिक; आणि कदाचित १९६०च्या दशकातील लढाऊ वृत्तीचे काही विद्यार्थी कार्यकर्ते. पुष्कळदा या व्यक्ती ज्या ऐतिहासिक घटनेचा भाग असतात तिच्या साकल्यतेने पूर्णपणे वेढलेल्या असतात, आणि त्यांनी केलेले त्या घटनेचे वर्णन महाकाव्याच्या आवेगांचा व शब्दयोजनेचा आव आणते. उपरोधिक किंवा महाकाव्यात्मक शैलींमधला फरक हा ऐतिहासिक दृष्टिकोनांमधील फरक ध्वनित करतो. (आत्म)कथनाचा अर्थ निश्चित करताना आपण या फरकाला विचारात घेतले पाहिजे.

 

वस्तुनिष्ठता

मौखिक स्रोत वस्तुनिष्ठ नसतात. हे अर्थातच प्रत्येक स्रोताला लागू होते, मात्र लेखनाचे माहात्म्य आपल्याला ही गोष्ट पुष्कळदा विसरायला लावते. पण मौखिक स्रोतांची अंगभूत अवस्तुनिष्ठता त्यांच्या विशिष्ट आंतरिक वैशिष्ट्यांमध्ये सामावलेली असते, ज्यापैकी सर्वांत महत्वाची वैशिष्ट्ये म्हणजे हे स्रोत कृत्रिम, परिवर्तनशील, आणि पक्षपाती असतात.

 

ॲलेक्स हॅली ऑटोबायोग्राफी ऑफ माल्कम एक्सच्या प्रस्तावनेत सांगतात की कशाप्रकारे माल्कमने आपल्या कथनाच्या शैलीत जो बदल केला तो उत्स्फूर्तपणे नव्हे तर मुलाखतकाराच्या प्रश्नांमुळे त्याला स्वतःची आणि 'नेशन ऑफ इस्लाम'ची जी अनन्यरित्या सार्वजनिक व अधिकृत प्रतिमा तो लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत होता त्या प्रतिमेच्या चौकटीबाहेर पडावे लागल्यामुळे हा बदल घडून आला. यावरून ही वस्तुस्थिती स्पष्ट होते की मौखिक इतिहासाचे दस्तऐवज हे नेहमीच एका अशा नातेसंबंधाचा, एका अशा सामायिक प्रकल्पाचा परिणाम असतात ज्यामध्ये मुलाखतकार आणि मुलाखतदार हे दोघेही एकत्रितपणे सहभागी असतात—जरी त्यांच्यात पूर्ण एकवाक्यता नसली तरीही. लिखित दस्तऐवज हे अपरिवर्तनशील असतात; आपल्याला त्यांची खबर असो वा नसो ते अस्तित्वात असतात, आणि आपल्याला सापडल्यानंतर ते कधीच बदलत नसतात. उलटपक्षी, जोपर्यंत संशोधक मौखिक कथनाला प्रत्यक्ष साकार रूप देत नाही तोपर्यंत मौखिक कथन हे केवळ एक संभाव्य संसाधन असते. लिखित स्रोत अस्तित्वात येतात ते उत्सर्जनासाठी तर मौखिक स्रोत अस्तित्वात येतात ते प्रसारणासाठी : हा त्याच प्रकारचा फरक आहे जो रोमन याकोबसन आणि प्योत्र बगतीऱ्योफ यांनी लोकसाहित्याच्या आणि साहित्याच्या निर्मितीप्रक्रियांमध्ये केला आहे.११

 

संशोधकाच्या गरजा आणि गृहीतके यांच्याशी लिखित स्रोताच्या मजकुराला काही देणेघेणे नसते; ती एक स्थीर संहिता असते, जिचा आपण फक्त अर्थ लावू शकतो. याउलट, मौखिक स्रोतांचा मजकूर हा बव्हंशी मुलाखतकाराने त्यात प्रश्न, संवाद, आणि वैयक्तिक नातेसंबंधांच्या रूपात काय योगदान दिले यावर अवलंबून असतो.

 

मुलाखत घेतली जाईल हे ठरवणाराच मुळात संशोधक असतो. संशोधक अनेकदा विशिष्ट स्वरूपाचे विपर्यास स्वतःच निर्माण करतात : माहितीदार संशोधकांना नेमके तेच सांगतात जे संशोधकांना ऐकायचे आहे असे त्यांना वाटते; आणि अशा प्रकारे, संशोधक नेमका कोण आहे याबद्दल त्यांना काय वाटते हेच ते उघड करत असतात. याउलट, अत्यंत बंदिस्त रचना असलेल्या मुलाखतींमध्ये अशा काही गोष्टी वगळल्या जाण्याची शक्यता असते ज्यांच्या अस्तित्वाबद्दल किंवा संबद्धतेबद्दल मुलाखत घेणाऱ्याला आधी माहिती नव्हती आणि ज्यांचा प्रश्नावलीमध्ये विचार केला गेला नव्हता. अशा मुलाखती इतिहासकाराच्या संदर्भव्यूहालाच दुजोरा देत असतात.

 

म्हणूनच, पहिली आणि मुख्य अपेक्षा ही आहे की संशोधकाने माहितीदाराचा ‘स्वीकार’ करावा; तसेच, संशोधकाला स्वतःला काय ऐकायचे आहे यापेक्षा माहितीदाराला स्वतःला काय सांगायचे आहे याला प्राधान्य द्यावे—आणि अनुत्तरित राहिलेले प्रश्न नंतर विचारावेत किंवा पुढील मुलाखतीसाठी राखून ठेवावेत. संवाद नेहमीच दुतर्फा असतो. मुलाखतदार नेहमीच—भलेही अगदी नकळतपणे का होईना—पण त्यांना ‘अभ्यासणाऱ्या’ मुलाखतकारांचा अभ्यास करत असतात. अशक्यप्राय (आणि कदाचित अवांछितही) अशा तटस्थतेच्या मागे लागून वरील  वस्तुस्थितीच्या उच्चाटनाचा प्रयत्न करण्यापेक्षा इतिहासकारांनी या वस्तुस्थितीचा अंगीकार करून तिच्या फायद्यांचा पुरेपूर उपयोग करून घेणेच अधिक श्रेयस्कर ठरेल.

 

मुलाखतीचा अंतिम परिणाम हे (आत्म)कथनकर्ता आणि संशोधक या दोघांचेही अपत्य असते. पुष्कळदा असे घडते की प्रकाशनासाठी मुलाखतींची मांडणी करताना मुलाखत घेणाऱ्याचा आवाज पूर्णपणे वगळला जातो, ज्यामुळे एक सूक्ष्म विपर्यास निर्माण होतो : ती संहिता प्रश्नांविनाच उत्तरे देते; त्यामुळे असा आभास निर्माण होतो की एखादा विशिष्ट (आत्म)कथनकर्ता परिस्थिती कशीही असली तरी नेहमी त्याच गोष्टी सांगेल—दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर असा समज निर्माण होतो की बोलणारी व्यक्ती ही एखाद्या लिखित दस्तऐवजाप्रमाणेच स्थिर आणि पुनरावृत्ती करणारी असते. जेव्हा संशोधकाचा आवाज काढून टाकला जातो तेव्हा (आत्म)कथनकर्त्याचा आवाज विद्रुप होतो.

 

वस्तुतः दोन वेगवेगळ्या वेळचे मौखिक कथन हे कधीच सारखे असत नाही. हे सर्वच मौखिक संवादाचे एक वैशिष्ट्य असते; परंतु मुलाखतीमध्ये केल्या जाणाऱ्या आत्मचरित्रात्मक किंवा ऐतिहासिक विधानांसारख्या तुलनेने असंरचित असलेल्या रूपांच्या बाबतीत हे विशेषत्वाने खरे ठरते. अगदी एकाच मुलाखतकाराला त्याच (आत्म)कथनकर्त्याकडून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे म्हणणे ऐकायला मिळते. जसजशी त्या दोघांची एकमेकांशी ओळख वाढू लागते तसतशी (आत्म)कथनकर्त्याची ‘दक्षता’ क्षीण होत जाऊ शकते. वर्गाधारित दुय्यमपणाची—म्हणजेच मुलाखतकाराला ज्या कशात स्वारस्य आहे असे वाटून (आत्म)कथनकर्त्याने त्या गोष्टीशी स्वतःला जोडून घेण्याच्या प्रयत्नांची—जागा पूर्वीपेक्षा अधिक मतस्वातंत्र्य किंवा मुलाखतीच्या उद्देशाची अधिक चांगली समज घेऊ शकते. किंवा कदाचित एवढेच घडलेले असू शकते की एखाद्या मागील मुलाखतीमुळे काही आठवणी जागृत होऊन त्या नंतरच्या भेटींमध्ये सांगितल्या जातात.

 

एकाच व्यक्तीच्या मुलाखती अनिश्चित काळापर्यंत सुरू ठेवता येऊ शकतात ही वस्तुस्थिती आपल्याला  'मौखिक स्रोतांचा अंगभूत अपूर्णपणा' या प्रश्नाकडे घेऊन जाते. कोणत्याही एका माहितीदाराचे संपूर्ण स्मृती भांडार पूर्णपणे उपसून काढणे अशक्य असते; प्रत्येक मुलाखतीतून प्राप्त होणारी माहिती ही नेहमीच परस्परसंबंधांतून निर्माण झालेल्या निवडीचा परिणाम असते. त्यामुळे मौखिक स्रोतांवर आधारित ऐतिहासिक संशोधनाचे स्वरूप हे नेहमीच एखाद्या 'प्रगतीपथावर असलेल्या कार्याप्रमाणे' म्हणजेच अपूर्ण असते. १९४९ ते १९५३ दरम्यान घडलेल्या तेर्नी संपांसंदर्भातील सर्व संभाव्य मौखिक स्रोतांचा अभ्यास करण्यासाठी संशोधकाला हजारो लोकांच्या सखोल मुलाखती घ्याव्या लागतील : कोणताही नमुना हा वापरलेल्या नमुनानिवड पद्धतींइतकाच विश्वसनीय असेल, आणि तो नमुना अशी हमी कधीच देऊ शकणार नाही की ज्याचे एकुलते एक कथन आकडेवारीच्या दृष्टीने निवडलेल्या दहा कथनांइतकेच मौल्यवान ठरू शकते अशा ‘दर्जेदार’ (आत्म)कथनकर्त्याला वगळले जाणार नाही.

 

मौखिक स्रोतांचा अपूर्णपणाचा विशेष इतर सर्व स्रोतांनाही लागू पडतो. कोणतेही संशोधन (ज्या ऐतिहासिक काळाविषयीच्या जिवंत स्मृती उपलब्ध आहेत त्या काळाशी संबंधित असलेले संशोधन) जोपर्यंत मौखिक आणि लिखित या दोन्ही प्रकारच्या स्रोतांचा संपूर्णपणे उपयोग करून घेत नाही तोपर्यंत ते पूर्ण होत  नाही; आणि ज्याअर्थी मौखिक स्रोत हे कधीही न संपणारे असतात त्याअर्थी ‘सर्व’ संभाव्य स्रोतांचा सखोल अभ्यास करण्याचे आदर्श उद्दिष्ट साध्य करणे अशक्य ठरते. मौखिक स्रोतांचा उपयोग करून केले जाणारे ऐतिहासिक संशोधनकार्य त्या स्रोतांच्या स्वरूपामुळे अपूर्ण असते; तर मौखिक स्रोतांना (जेथे ते उपलब्ध असतात तेथे) वगळून केले जाणारे ऐतिहासिक संशोधनकार्य व्याख्येनुसारच अपूर्ण ठरते.

मौखिक इतिहासात कोण बोलते?

मौखिक इतिहास म्हणजे असा काही प्रकार नव्हे की जिथे कष्टकरी वर्ग स्वतः बोलतात आणि स्वतःची बाजू मांडतात. याचे विरोधी विधान अर्थातच पूर्णपणे निराधार ठरणार नाही : पोलीस आणि (पुष्कळदा प्रतिकूल भूमिका घेणाऱ्या) प्रसारमाध्यमांच्या शब्दांऐवजी कामगारांच्या शब्दांच्या व स्मृतींच्या आधारे केलेले एखाद्या संपाचे कथन हे त्या स्रोतांमध्ये (पोलीस आणि प्रसारमाध्यमांमध्ये) अंतर्निहित असलेल्या विपर्यासाचे खंडन (जरी ते आपोआप घडत नसले तरी) करण्यास अर्थातच मदत करते. उपेक्षित वर्गांच्या इतिहासासाठी मौखिक साधने ही एक अनिवार्य (परंतु पुरेशी नसलेली) पूर्वावश्यकता आहे; मात्र ज्यांचे लेखनव्यवस्थेवर नियंत्रण असते आणि ज्यांनी आपल्या मागे लेखी नोंदींचा कितीतरी विपुल साठा ठेवलेला आहे अशा सत्ताधारी वर्गांच्या इतिहासासाठी मौखिक साधने तुलनेने कमी अनिवार्य असतात (मात्र निरुपयोगी मुळीच नसतात).

 

तथापि, ऐतिहासिक संभाषणावर इतिहासकाराचेच घट्ट नियंत्रण राहते. मुलाखती कोणत्या लोकांच्या घ्यायच्या हे निवडणारा; प्रश्न विचारून आणि उत्तरांवर प्रतिक्रिया देऊन ते कथन साकारण्यात हातभार लावणारा; आणि (केवळ एकत्रीकरण व लिप्यंतरणाच्याच संदर्भात का होईना) त्या कथनाला त्याचा अंतिम, प्रकाशित आकार आणि संदर्भ प्रदान करणारा—हा खुद्द इतिहासकारच असतो. मौखिक इतिहासाच्या माध्यमातून कष्टकरी वर्ग बोलतो हे जरी मान्य केले तरीही एक गोष्ट स्पष्ट आहे की हा वर्ग काही अमूर्त स्वरूपात बोलत नाही, तर तो इतिहासकारा सोबत बोलतो, इतिहासकाराच्या समवेत बोलतो आणि—जेव्हा कधी ती सामग्री प्रकाशित होते—इतिहासकाराच्या मध्यस्थीने बोलतो.

 

अर्थात, परिस्थिती याच्या अगदी उलटही असू शकते. इतिहासकार (आत्म)कथनकर्त्यांना बोलक्या बाहुल्यांप्रमाणे वापरून त्यांच्या कथनाद्वारे आपल्या विवेचनाला दुजोरा देऊ शकतो. त्यामुळे स्रोतांच्या वस्तुनिष्ठतेमध्ये विलीन होऊन नाहीसे होण्याऐवजी इतिहासकार हा किमान संवादातील एक भागीदार म्हणून—आणि पुष्कळदा मुलाखतीचा ‘मंच-दिग्दर्शक’ किंवा कथनाचा ‘आयोजक’ म्हणून—महत्त्वाचाच ठरतो. स्रोतांचा शोध घेण्याऐवजी मौखिक इतिहासकार काही प्रमाणात स्रोतांना निर्माण करतात. कष्टकरी वर्गाचे केवळ मुखपत्र बनून राहण्याऐवजी—जरी ते इतरांचे शब्द वापरत असले तरीही—मौखिक इतिहासकार त्या एकूण संभाषणासाठी कारणीभूत असतात.

 

लिखित दस्तऐवजांच्याभोवती बहुतकरून त्यांना ज्या संस्थांनी जारी केलेले असते त्या संस्थांचेच अव्यक्तिगत वलय असते—अर्थात, जरी ते दस्तऐवज व्यक्तींनीच रचलेले असतात तरी त्या व्यक्तींविषयी आपल्याला पुष्कळदा फारशी किंवा काहीच माहिती नसते; अशा लिखित दस्तऐवजांच्या तुलनेत मौखिक साधने मात्र संपूर्ण वृत्तांतालाच त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिनिष्ठतेमध्ये सामावून घेतात. मुलाखतदाराच्या प्रथम-पुरुषी कथनाच्या जोडीनेच इतिहासकाराचेही प्रथम-पुरुषी अस्तित्व उभे असते—ज्याच्याशिवाय ती मुलाखतच अस्तित्वात आलेली नसती. माहितीदार आणि इतिहासकार या दोघांचेही विवेचन हे कथनात्मक स्वरूपाचे असते; याउलट, अभिलेखागारातील दस्तऐवजांच्या बाबतीत अशी स्थिती फारच कमी वेळा आढळते. माहितीदार हे एका अर्थाने इतिहासकारच असतात; आणि काही बाबतीत इतिहासकार हा त्या स्रोताचाच एक भाग असतो.

 

पारंपरिक इतिहासलेखक स्वतःला सहसा अशा भूमिकेत सादर करतात जिला वाङ्मयीन सिद्धांत ‘सर्वसाक्षी कथनकर्ता’ असे संबोधेल. ज्या घटनांमध्ये त्यांचा स्वतःचा सहभाग नव्हता अशा घटनांचे ते तृतीयपुरुषी निवेदन प्रस्तुत करतात; आणि त्या निवेदनावर ते पूर्णपणे व वरून (म्हणजेच, खुद्द त्या घटनांमधील सहभागींच्या बोधावस्थेच्याही पलीकडून) वर्चस्व गाजवतात. ते निःपक्षपाती आणि अलिप्त भासतात; एकोणिसाव्या शतकातील काही कादंबरीकारांच्या शैलीप्रमाणे केवळ एखाद्या तटस्थ टिप्पणीचा अपवाद वगळता ते कधीच कथानकात प्रवेश करत नाहीत. ज्याप्रमाणे आधुनिक कादंबरीने ललित कथालेखनाचे स्वरूप पालटून टाकले अगदी त्याचप्रमाणे मौखिक इतिहास हा इतिहासलेखनाचे स्वरूप बदलून टाकतो; यातील सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे आता कथनकर्ता स्वतःच त्या कथानकात ओढला जातो आणि कथेचा एक भाग बनतो.

 

हा काही तृतीय पुरुषाकडून प्रथम पुरुषाकडे झालेला केवळ व्याकरणात्मक बदल नाही, तर तो एक संपूर्णपणे नवीन कथनात्मक दृष्टिकोन आहे. कथनकर्ता आता पात्रांपैकीच एक आहे आणि कथा सांगण्याची कृती सांगितल्या जाणाऱ्या कथेचा एक भाग आहे. हा बदल बाह्य कथनकर्त्याच्या तुलनेत कितीतरी अधिक सखोल राजकीय आणि वैयक्तिक सहभाग असल्याचे अप्रत्यक्षपणे दर्शवतो. त्यामुळे मूलगामी मौखिक इतिहास लिहिणे ही काही विचारसरणीची, आत्मनिष्ठपणे कोणाची बाजू घेण्याची, किंवा स्रोतांच्या एका संचाऐवजी दुसऱ्या संचाची निवड करण्याची बाब नव्हे. किंबहुना, ते खुद्द इतिहासकाराच्या कथेतील उपस्थितीमध्ये तसेच त्या जबाबदारीच्या स्वीकारामध्येही अंतर्निहित आहे जी जबाबदारी इतिहासकाराला त्या वृत्तांतात अंतर्लिखित करते आणि इतिहासलेखनपद्धतीला कथनाचे एक स्वायत्त कृत्य म्हणून प्रकट करते. राजकीय निवडी कमी दृग्गोचर आणि कमी मुखर परंतु अधिक मूलभूत बनतात.

 

कष्टकरी वर्गाच्या स्रोतांमधील वस्तुनिष्ठ सत्यामध्ये इतिहासकार हा एक कर्ता म्हणून नाहीसा होऊ शकतो ही मिथक कल्पना राजकीय लढाऊपणाकडे पाहण्याच्या त्या दृष्टिकोनाचा भाग होती ज्यानुसार राजकीय लढाऊपणा म्हणजे सर्व व्यक्तिनिष्ठ भूमिकांना पूर्णवेळ कार्यकर्त्याच्या भूमिकेत विलीन करणे, आणि एका अमूर्त कष्टकरी वर्गाशी एकरूप होणे असा समज होता. याचा परिणाम म्हणून एका अशा पारंपारिक दृष्टिकोनाशी उपरोधिक साम्य निर्माण झाले ज्या दृष्टिकोनाला इतिहासकारांनी ते लिहित असलेल्या इतिहासात व्यक्तिनिष्ठपणे गुंतणे मान्य नव्हते. मौखिक इतिहासकार हा विवेचनातील इतर कर्त्यांसमोर दुय्यम भासतो खरा, मात्र प्रत्यक्षात त्या इतिहासकाराची भूमिका कष्टकरी वर्ग आणि वाचक यांच्यामधील एका ‘मध्यस्थाची’ न राहता ती उत्तरोत्तर एका मुख्य नायकाची भूमिका बनत जाते.

 

साहित्याप्रमाणेच इतिहासलेखनातदेखील कथनकर्त्याच्या कार्यावर लक्ष केंद्रित केल्याने हे कार्य विखंडित होते. जोसेफ कॉनरॅड यांच्या लॉर्ड जिम या कादंबरीत मार्लो हे पात्र कथनकर्तादेखील असून तो केवळ तेवढ्याच गोष्टी सांगू शकतो जेवढ्या त्याने स्वतः पाहिलेल्या आणि ऐकलेल्या असतात; त्यामुळे 'संपूर्ण कहाणी' सांगण्यासाठी त्याला आपल्या कथेत इतर अनेक 'माहितीदारांचा' समावेश करणे भाग पडते. मौखिक स्रोतांसोबत काम करणाऱ्या इतिहासकारांच्या बाबतीतही हेच घडते. कथेमध्ये उघडपणे प्रवेश केल्यानंतर इतिहासकारांनी स्रोतांना त्यांच्या स्वायत्त विवेचनासह कहाणीत प्रवेश करण्याची मुभा दिलीच पाहिजे.

 

मौखिक इतिहासाचा कोणीही एकच एक कर्ता नसतो; मौखिक इतिहास अनेकविध दृष्टिकोनांतून सांगितला जातो आणि इतिहासकारांकडून पारंपारिकपणे ज्या निःपक्षपातीपणाचा दावा केला जातो त्याची जागा येथे कथनकर्त्याचा पक्षपातीपणा घेतो. ‘पक्षपातीपणा’चा (partiality) अर्थ येथे ‘अपूर्णपणा’ (existing only in part) आणि ‘वादामध्ये एखाद्याची बाजू घेणे’ (favouring one side in a dispute above the other) अशा दोन्ही तऱ्हांनी लावायला हवा : मौखिक इतिहास हा कोणत्या तरी एका पक्षाची बाजू घेतल्याशिवाय सांगितलाच जाऊ शकत नाही, कारण मुळात सांगण्याच्या कृतीतच अशा ‘बाजू’ जमेस धरलेल्या असतात. आणि भलेही त्यांचा वैयक्तिक इतिहास आणि श्रद्धा काहीही असोत पण इतिहासकार आणि ‘स्रोत’ फारच क्वचित एकाच ‘बाजूचे’ असतात. त्यांच्या वेगवेगळाल्या पक्षपातीपणांचे संमुखीकरण—’संघर्ष’ या अर्थाने संमुखीकरण, आणि ‘एकतेचा शोध’ या अर्थाने संमुखीकरण—हेच मौखिक इतिहासाला वेधक बनवणाऱ्या बाबींपैकी एक आहे.

टीपा

१. B.Placido La Repubblica, ३ ऑक्टोबर १९७८ मध्ये.

२. इटलीतील एक अपवाद म्हणजे ‘Istituto Ernesto De Martino’ ही मिलान स्थित एक स्वतंत्र मूलगामी संशोधन संस्था; या संस्थेने १९६० च्या दशकाच्या मध्यापासून ‘लाँग-प्लेयिंग रेकॉर्ड्स’वर ‘श्राव्य संग्रह’ प्रकाशित केले आहेत—जे सांस्कृतिक क्षेत्राच्या मुख्य प्रवाहातील कोणाच्या हे लक्षातही आले नाही.

३. पहा F.Coggiola, ‘L’attivitá dell’Istituo Ernesto de Martino’, D.Carpitella (संपा.), L’etnomusicologia in Italia, Palermo, Flaccovio, १९७५ च्या आवृत्तीमध्ये पृ. २६५-२७०.

४. वाणीतील ध्वनींचे स्वरलिपीच्या सहाय्याने केलेले प्रतिरूपण या संदर्भात पहा :  G.Marini, ‘Musica popolare e parlato popolare urbano’, Circolo Gianni Bosio (संपा.), I giorni cantati, Milano, Mazzotta, १९७८ च्या आवृत्तीमध्ये पृ. ३३–३४.  A.Lomax, Folk Song Styles and Culture, Washington DC, American Association for the Advancement of Sciences, १९६८, प्रकाशन क्र. ८८ मध्ये गायनशैलींच्या इलेक्ट्रॉनिक सादरीकरणाविषयी चर्चा करतो.

५. अमानक वाणीच्या अभिव्यंजक गुणांविषयी पहा W.Labov, ‘The logic of non-standard English’, L.Kampf and P.Lauter (संपा.), The Politics of Literature, New York, Random House, १९७० च्या आवृत्तीमध्ये पृ. १९४-२४४.

६. या लेखात मी या संज्ञा G. Genette यांनी Figures III Paris, Seuil, १९७२ च्या आवृत्तीमध्ये ज्याप्रमाणे त्यांची व्याख्या केली आहे आणि ज्याप्रमाणे त्यांना वापरल्या आहेत त्याचप्रमाणे वापरल्या आहेत.

७. लोककथा आणि मौखिक कथासाहित्यातील साहित्यप्रकारांच्या भेदांविषयी, पहा:  D.Ben-Amos, ‘Categories analytiques et genres populaires’, Poétique, १९७४, क्र. १९, पृ. २६८-२९३; आणि J. Vansina, Oral Tradition, Harmondsworth, Penguin Books, [१९६१], १९७३.

८. उदाहरणार्थ, रोममधील कम्युनिस्ट कार्यकर्ते जी. बोर्डोनी यांनी आपल्या कुटुंबाविषयी आणि समाजाविषयी बोलताना प्रामुख्याने स्थानिक बोलीभाषेचा वापर केला आहे; परंतु जेव्हा-जेव्हा त्यांना पक्षाशी असलेली आपली निष्ठा पुन्हा ठासून सांगायची गरज भासे, तेव्हा-तेव्हा ते थोडा वेळ काहीशा प्रमाण इटालियन भाषेकडे वळत असत. या भाषिक बदलावरून हे स्पष्ट होते की जरी त्यांनी पक्षाचे निर्णय स्वीकारले असले, तरीही ते निर्णय त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवापेक्षा काहीसे परकेच राहिले होते. त्यांच्या बोलण्यात वारंवार येणारा एक वाक्यांश म्हणजे—'यावर तुम्ही काहीच करू शकत नाही.' पहा Circolo Gianni Bosio, I giorni cantati, पृ. ५८-६६.

९. वार्ता आणि कथानकाविषयी पहा B.Tomaševskij, ‘Sju•etnoe postroenie’, in Teorija literatury. Poetika, Moscow-Leningrad, १९२८; इटालियन भाषांतर ‘La costruzione dell’intreccio’, T.Todorov (संपा.), I formalisti russi, Torino, Einaudi, १९६८ च्या आवृत्तीमध्ये, जे पुढील नावाने प्रकाशित झाले होते : Théorie de la littérature, Paris, Seuil, १९६५.

१०. ह्या कहाण्यांची चर्चा  A.Portelli, The Death of Luigi Trastulli, Albany, State University of New York Press, १९९१ च्या आवृत्तीमध्ये प्रकरण १ आणि ६ मध्ये केली आहे.

११. R.Jakobson and P.Bogatyrev, ‘Le folklore forme spécifique de creation’, R.Jakobson, Questions de poétique, Paris, Seuil, १९७३ च्या आवृत्तीमध्ये पृ. ५९-७२.

प्रताधिकार सूचना

हा मजकूर प्रा. अलेसांद्रो पोर्तेली यांच्या “What Makes Oral History Different” या मूळ इंग्रजी निबंधाचे चंद्रकांत काळुराम म्हात्रे यांनी केलेले मराठी भाषांतर आहे.

मूळ लेखाचे सर्व प्रताधिकार (copyright) लेखकाकडे राखीव आहेत.

हे भाषांतर मूळ लेखकाच्या परवानगीने केवळ शैक्षणिक व अव्यावसायिक वापरासाठी प्रकाशित केले आहे. या भाषांतराचा कोणत्याही व्यावसायिक उद्देशासाठी वापर करता येणार नाही.

या भाषांतराचे सर्व नैतिक श्रेय भाषांतरकाराकडे राहील.

या भाषांतराचे कोणत्याही स्वरूपात पुनर्मुद्रण, पुनर्प्रकाशन किंवा प्रसारण करण्यापूर्वी लेखक व भाषांतरकार दोघांचीही पूर्वपरवानगी आवश्यक आहे.

प्रथम प्रकाशन : २३ एप्रिल, २०२६ 

© 2026 Sitaram Mhatre Foundation

Call us:

+91-865-735-1636

Find us: 

Sitaram Smaran, House no. 896,

Sector 19B, Koparkhairane,

Navi Mumbai

  • Pinterest
  • Twitter
  • LinkedIn
  • Facebook
  • YouTube

Website developed & maintained by:

Mhatre's Traslation & Allied Services

Sitaram Mhatre Foundation

Our Programmes:

English for ALL

Science for ALL

Computers for ALL

Memoirs of the PAP

Bhakti Literature in Unicode

bottom of page