top of page

 

 

Bhakti Literature in Unicode Project

Sant Janabai Gatha

Coordinator-Editor: Chandrakant Mhatre

Unicodification: Chandrakala Mhatre

***PART OF THE PROJECT SHABDAAGAR EBOOK SANT JANABAI GATHA***

संत जनाबाई गाथा


 
[१]
 
गाता विठोबाची कीर्ती । महापातके जळती ॥१॥
सर्व सुखाचा आगर । उभा असे विटेवर ॥२॥
आठविता पाय त्याचे । मग तुम्हा भय कैचे ॥३॥
कायावाचामने भाव । जनी म्हणे गावा देव ॥४॥

 
[२]
 
जन्मा येउनिया देख । करा देहाचे सार्थक ॥१॥
वाचे नाम विठ्ठलाचे । तेणे सार्थक देहाचे ॥२॥
ऐसा नामाचा महिमा । शेषा वर्णिता जाली सीमा ॥३॥
नाम तारक त्रिभुवनी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

 
[३]
 
नाम फुकट चोखट । नाम घेता न ये वीट ॥१॥
जड शिळा ज्या सागरी । आत्माराम नामे तारी ॥२॥
पुत्रभावे स्मरण केले । तया वैकुंठासी नेले ॥३॥
नाममहिमा जनी जाणे । ध्याता विठ्ठलचि होणे ॥४॥

 
[४]
 
येक नाम सर्व सार । वरकड अवघे ते असार ॥१॥
म्हणोनिया परते करा । आधी विठ्ठल हे स्मरा ॥२॥
जनी म्हणे देवाधिदेव । एक विठ्ठल पंढरीराव ॥३॥

 
[५]

काय हे करावे । धनवित्तादि आघवे॥१॥
तुझे नाम नाही जेथे । नको माझा वास तेथे ॥२॥
तुजविण बोल न मानी । करी ऐसे म्हणे जनी ॥३॥

 
[६]

विठ्ठल नामाची नाही गोडी । काळ हाणोनि तोंड फोडी ॥१॥
गळा बांधोनि खांबासी । विंचू लाविती जिव्हेसी ॥२॥
ऐसा अभिमानी मेला । नर्ककुंडी थारा त्याला ॥३॥
नामा बोध करी मना । दासी जनी लागे चरणा ॥४॥

 
[७]
 
तो हा भक्तांचे तोडरी । वाचे उच्चारिता हरी ॥१॥
काम होऊनि निष्काम । काम जाला मनी प्रेम ॥२॥
तो हा पूर्ण काम होय । अखंडित नाम गाय ॥३॥
काम निष्काम जाला मनी । वंदी नाचे दासी जनी ॥४॥

 
[८]
 
नाम विठोबाचे घ्यावे । मग पाऊल टाकावे ॥१॥
नाम तारक हे थोर । नामे तारिले अपार ॥२॥
अजामेळ उद्धरिला । चोखामेळा मुक्‍तीस नेला ॥३॥
नाम दळणी कांडणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

 
[९]
 
निराकारीचे नाणे । शुद्ध ब्रह्मीचे ठेवणे ॥१॥
प्रयत्ने काढिले बाहेरी । संतसाधु सवदागरी ॥२॥
व्यास वसिष्ठ नारद मुनी । टांकसाळ घातली त्यांनी ॥३॥
उद्धव अक्रुर स्वच्छंदी । त्यांनी आटविली चांदी ॥४॥
केशव नामयाचा शिक्का । हारप चाले तिन्ही लोकां ॥५॥
पारख नामयाची जनी । वरती विठोबाची निशाणी ॥६॥

 
[१०]
 
माझा शिणभाग गेला । तुज पाहता विठ्ठला ॥१॥
पाप ताप जाती । तुझे नाम ज्याचे चित्ती ॥२॥
अखंडित नामस्मरण । बाधू न शके तया विघ्न ॥३॥
जनी म्हणे हरिहर । भजता वैकुंठी त्या घर ॥४॥
 

[११]
 
नाम विठोबाचे थोर । तरला कोळी आणि कुंभार ॥१॥
ऐसी नामाची आवडी । तुटे संसाराची बेडी ॥२॥
नाम गाय वेळोवेळा । दासी जनीसी नित्य चाळा ॥३॥

 
[१२]
 
मारुनिया त्या रावणा । राज्य दिधले बिभीषणा ॥१॥
सोडवूनी सीता सती । राम अयोध्येसी येती ॥२॥
ख्याती केली रामायणी । म्हणे नामयाची जनी ॥३॥

 
[१३]
 
येऊ ऐसे जाऊ । जनासंगे हेचि दाऊ ॥१॥
आपण करु हरिकीर्तन । जाणोनी भक्तीचे जीवन ॥२॥
नाम संशयछेदन । भवपाशाचे मोचन ॥३॥
जनी म्हणे हो देवासी । होईल त्याला करणी ऐसी ॥४॥

 
[१४]
 
हरिहर ब्रह्मादिक । नामे तरले तिन्ही लोक ॥१॥
ऐसा कथेचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥२॥
जपे तपे लाजविली । तीर्थे शरणागत आली ॥३॥
नामदेवा कीर्तनी । ध्वजा आल्या स्वर्गाहुनी ॥४॥
देव श्रुती देती ग्वाही । जनी म्हणे सांगू कायी ॥५॥

 
[१५]
 
व्हावे कथेसी सादर । मन करुनिया स्थिर ॥१॥
बाबा काय झोपी जाता । झोके चौरासीचे खाता ॥२॥
नरदेह कैसा रे मागुता । भेटी नव्हे त्या सीताकांता ॥३॥
आळस निद्रा उठाउठी । त्यजा स्वरूपी घाला मिठी ॥४॥
जनी म्हणे हरिचे नाम । मुखी म्हणा धरूनि प्रेम ॥५॥


[१६]
 
पुंडलिक भक्‍तबळी । विठो आणिला भूतळी ॥१॥
आनंद अवतार केवळ । उभा विटेवरी सकळ ॥२॥
वसुदेवा न कळे पार । नाम्यासवे जेवी फार ॥३॥
भक्‍तभावार्था विकला । दासी जनीला आनंद जाला ॥४॥

 
[१७]
 
भक्त भला पुंडलिका । तुझ्या भावार्थाचा शिक्का ॥१॥
भले घालूनिया कोडे । परब्रह्म दारापुढे ॥२॥
घाव घातला निशाणी । ख्याती केली त्रिभुवनी ॥३॥
जनी म्हणे पुंडलिका । धन्य तूचि तिही लोका ॥४॥

 
[१८]
 
पंढरीचे सुख पुंडलिकासी आले । तेणे हे वाढिले भक्‍तालागी ॥१॥
भुक्ति मुक्ति वरदान दिधले । तेहि नाही ठेविले आपणापाशी ॥२॥
उदार चक्रवर्ती बाप पुंडलिक । नामे विश्‍व लोक उद्धरिले ॥३॥

 
[१९]
 
अरे विठ्या विठ्या । मूळ मायेच्या कारट्या ॥१॥
तुझी रांड रंडकी जाली । जन्मसावित्री चुडा ल्याली ॥२॥
तुझे गेले मढे । तुला पाहून काळ रडे ॥३॥
उभी राहूनि आंगणी । शिव्या देत दासी जनी ॥४॥
 
 
[२०]
 
जन्म खाता उष्टावळी । सदा राखी चंद्रावळी ॥१॥
राईरुक्मिणीचा कांत । भक्तीसाठी कण्या खात ॥२॥
देव भुलले पांडुरंग । ऐसा जाणावा श्रीरंग ॥३॥
जनी म्हणे देवराज । करी भक्ताचे हो काज ॥४॥


[२१]
 
ऐसा आहे पांडुरंग । भोग भोगूनि निःसंग ॥१॥
अविद्येने नवल केले । मिथ्या सत्यत्व दाविले ॥२॥
जैसी वांझेची संतति । तैसी संसार उत्पत्ति ॥३॥
तेथे कैचि बा धरिसी । ब्रह्मी पुर्ण जनी दासी ॥४॥

 
[२२]
 
स्मरताचि पावसी । तरी भक्तांसी लाभसी ॥१॥
ऐसे काहीं न घडे देवा । वाया कोण करी सेवा ॥२॥
न पुरता आस । मग कोण पुसे देवास ॥३॥
कोठे चक्रपाणि । तुज आधीन लाही जनी ॥४॥

 
[२३]

बाप रखुमाबाई वर । माझे निजाचे माहेर ॥१॥
ते हे जाणा पंढरपूर । जग मुक्‍तीचे माहेर ॥२॥
तेथे मुक्ति नाही म्हणे । जनी न पाहे त्याचे वदन ॥३॥

 
[२४]
 
अनंत लावण्याची शोभा । तो हा विटेवरी उभा ॥१॥
पितांबर माळ गाठीं । भाविकासी घाली मिठी ॥२॥
त्याचे पाय चुरी हाते । कष्टलीस माझे माते ॥३॥
आवडी बोले त्यासी । चला जाऊ एकांतासी ॥४॥
ऐसा ब्रह्मींचा पुतळा । दासी जनी पाहे डोळा ॥५॥


[२५]
देव देखिला देखिला । नामे ओळखुनी ठेविला ॥१॥
तो हा विटेवरी देव । सर्व सुखाचा केशव ॥२॥
जनी म्हणे पूर्णकाम । विठ्ठल देवाचा विश्राम ॥३॥
 

[२६]
योगीं शीण जाला । तुजवाचुनी विठ्ठला ॥१॥
योग करिता अष्टांग । तुजविण शुका रोग ॥२॥
बैसला कपाटी । रंभा लागे त्याच्या पाठी ॥३॥
तई त्वांचि सांभाळिला । जेव्हा तुज शरण आला ॥४॥
सांगोनि पुत्राते । त्वांचि छळिले कश्यपाते ॥५॥
अमरांच्या राया । म्हणे जनी सुखालया ॥६॥
 

[२७]
 
आळविता धाव घाली । ऐसी प्रेमाची भुकेली ॥१॥
ते हे यशोदेची बाळा । बरवी पाहातसे डोळा ॥२॥
विटेवरी उभी नीट । केली पुंडलिके धीट ॥३॥
स्वानंदाचें लेणे ल्याली । पाहून दासी जनी धाली ॥४॥

 
[२८]
 
स्तन पाजायाशी । आली होती ते माउशी ॥१॥
तिच्या उरावरी लोळे । विठो माझा क्रीडा खेळे ॥२॥
मेले मेले कृष्ण नाथा । सोडी सोडी रे अनंता ॥३॥
लिंग देह विरविले । जनी म्हणे या विठ्ठले ॥४॥

 
[२९]
 
अहो यशोदेचा हरी । गोपिकांसी क्रीडा करी ॥१॥
वेणु वाजवितो हरी । सर्व देवांचा साहाकारी ॥२॥
धावे धावे गाईपाठीं । जनी म्हणे जगजेठी ॥३॥

 
[३०]
 
विठो माझा लेकुरवाळा । संगे लेकुरांचा मेळा ॥१॥
निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ॥२॥
पुढे चाले ज्ञानेश्‍वर । मागे मुक्‍ताई सुंदर ॥३॥
गोरा कुंभार मांडिवरी । चोखा जीवा बरोबरी ॥४॥
बंका कडियेवरी । नामा करांगुळी धरी ॥५॥
जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ॥६॥

 
[३१]
 
नोवरीया संगे वऱ्हाडीया सोहोळा । मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥१॥
परीसाचेनि संगे लोहो होय सोने । तयाची भूषणे श्रीमंतासी ॥२॥
जनी म्हणे जोड जाली विठोबाची । दासी नामयाची म्हणोनिया ॥३॥

 
[३२]
 
तुझ्या निजरुपाकारणे । वेडावली दरुषणे ॥१॥
परि सोय न कळे त्यांसी । समीप असता देवासी ॥२॥
चारी श्रमे हो कष्टती । वेदशास्त्रे धुंडाळिती ॥३॥
परि कवणे रीति तुला । न जाणवे जी विठ्ठला ॥४॥
तुझी कृपा होय जरी । दासी जनी ध्रुपद करी ॥५॥

 
[३३]
 
पंढरी सांडोनि जाती वाराणसी । काय सुख त्यांसी आहे तेथे ॥१॥
तया पंचक्रोसी म्हणती मरावे । मरोनिया व्हावे जीवन्मुक्त ॥२॥
नको गा विठोबा मज धाडू काशी । सांगेन तुजपाशी ऐक आता ॥३॥
मरचीमात्र वेरण स्तंभी घाली । घालोनिया गाळी पापपुण्य ॥४॥
जावोनिया तेथें प्रहर दोन रात्री । सत्य मिथ्या श्रोती श्रवण करा ॥५॥
आई आई बाबा म्हणती काय करु । ऐसे दुःख थोरु आहे तेथे ॥६॥
इक्षुदंड घाणा जैसा भरी माळी । तैसा तो कवळी काळनाथ ॥७॥
लिंगदेहादिक करिती कंदन । तेथील यातना नको देवा ॥८॥
न जाय तो जीव एकसरी हरी । रडती नानापरी नानादुःखें ॥९॥
अमरादिक थोर थोर भांबावळे । भुलोनिया गेले मुक्‍तीसाठी ॥१०॥
ती ही मुक्ति माझी खेळे पंढरीसी । लागता पायांसी संतांचिया ॥११॥
ऐसिये पंढरी पहाती शिखरी । आणि भीमातीरी मोक्ष आला ॥१२॥
सख्या पुंडलिका लागताचि पाया । मुक्ति म्हणे वाया गेले मी की ॥१३॥
घररिघवणी मुक्ति होय दासी । मोक्ष तो पाठीसी धाव घाली ॥१४॥
मोक्ष सुखासाठी मुक्ति लोळे । बीं नेघे कोणी कदा काळी ॥१५॥
मोक्ष मुक्ति जिहीं हाणितल्या पायी । आमुची ती काय धरिती सोयी ॥१६॥
समर्थांचे घरी भिक्षा नानापरी । मागल्या पदरी घालिताती ॥१७॥
अंबोल्या सांडोनी कोण मागे भीक । सामराज्याचे सुख तुझे ॥१८॥
जनी म्हणे तुज रखुमाईची आण । जरी मज क्षण विसंबसी ॥१९॥

 
[३४]
 
पाय जोडुनी विटेवरी । कर ठेउनी कटावरी ॥१॥
रूप सावळे सुंदर । कानीं कुंडले मकराकार ॥२॥
गळा वैजयंती माळा । तो हा मदनाचा पुतळा ॥३॥
गरुड सन्मुख उभा । जनी म्हणे धन्य शोभा ॥४॥


[३५]
 
येगे माझे विठाबाई । कृपादृष्टीने तू पाही ॥१॥
तुजविण न सुचे काही । आता मी वो करू कायी ॥२॥
माझा भाव तुजवरी । आता रक्षी नानापरी ॥३॥
येई सखये धाउनी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

 
[३६]
 
हात निढळावरी ठेवुनि । वाट पाहे चक्रपाणि ॥१॥
धाव धाव पांडुरंगे । सखे जिवलगे अंतरंगे ॥२॥
तुजवाचुनि दाही दिशा । वोस मज जगदीशा ॥३॥
हांसे करु नको जनासी । म्हणे नामयाची दासी ॥४॥

 
[३७]
 
सख्या घेतले पदरी । आता न टाकावे दुरी ॥१॥
तुम्हा थोरांचे उचित । ऐसे नव्हे विपरीत ॥२॥
ब्रह्मियाच्या ताता । सज्जना लक्षुमीच्या कांता ॥३॥
आपुली म्हणवूनि । आपंगावी दासी जनी ॥४॥

 
[३८]
 
गंगा गेली सिंधूपाशी । तेणे अव्हेरिले तिसी ॥१॥
तरी सांगावे कवणाला । ऐसे बोले बा विठ्ठला ॥२॥
जळ कोपे जळचरा । माता अव्हेरी लेकुरा ॥३॥
जनी म्हणे शरण आले । अव्हेरिता ब्रीद गेले ॥४॥

 
[३९]
 
माझी आंधळ्याची काठी । अडकली कवणे बेटी ॥१॥
आता सांगू मी कवणासी । धावे पावे हृषिकेशी ॥२॥
तुजवाचूनी विठ्ठला । कोणी नाही रे मजला ॥३॥
माथा ठेवी तुझे चरणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

 
[४०]
 
का गा न येसी विठ्ठला । ऐसा कोण दोष मला ॥१॥
मायबाप तूचि धनी । मला सांभाळी निर्वाणी ॥२॥
त्वा बा उद्धरिले थोर । तेथे किती मी पामर ॥३॥
दीनानाथा दीनबंधु । जनी म्हणे कृपासिंधू ॥४॥

 
[४१]
 
अगा रुक्मिणीनायका । सुरा असुरा प्रिय लोका ॥१॥
ते तू धावे माझे आई । सखे साजणी विठाबाई ॥२॥
अगा शिवाचिया जपा । मदनताता निष्पापा ॥३॥
आपुली म्हणवुनी । आपंगावी दासी जनी ॥४॥

 
[४२]
 
नाही केली तुझी सेवा । दुःख वाटे माझे जिवा ॥१॥
नष्ट पापीण मी हीन । नाही केले तुझे ध्यान ॥२॥
जे जे दुःख जाले मला । ते त्वा सोसिले विठ्ठला ॥३॥
रात्रंदिन मजपाशी । दळू कांडू लागलासी ॥४॥
क्षमा करी देवराया । दासी जनी लागे पाया ॥५॥

 
[४३]
 
येरे येरे माझ्या रामा । मनमोहन मेघःशामा ॥१॥
संतमिसे भेटी । देई देई कृपा-दृष्टी ॥२॥
आमची चुकवी जन्मव्याधी । आम्हा देई हो समाधी ॥३॥
जनी म्हणे चक्रपाणि । करी ऐसी हो करणी ॥४॥


[४४]
 
अहो नारायणा । कृपा का कराना ॥१॥
मी तो अज्ञानाची राशी । म्हणोन आले पायापाशी ॥२॥
जनी म्हणे आता । सोडवी कृपावंता ॥३॥

 
[४५]
 
ऐक बापा हृषिकेशी । मज ठेवी पायांपाशी ॥१॥
तुझे रूप पाहीन डोळा । मुखी नाम वेळोवेळा ॥२॥
हाती धरिल्याची लाज । माझे सर्व करी काज ॥३॥
तुजविण देवराया । कोणी नाही रे सखया ॥४॥
कमळापति कमळपाणि । दासी जनी लागे चरणी ॥५॥

 
[४६]
 
पोट भरुनी व्यालासी । मज सांडुनी कोठे जासी ॥१॥
धरा धरा पांडुरंगा । मज का टाकिले निःसंगा ॥२॥
ज्याचा जार त्यासी भार । मजला नाही आणिक थार ॥३॥
विठाबाई मायबहिणी । तुझे कृपे तरली जनी ॥४॥

 
[४७]
 
अविद्येच्या रात्री । अडकले हो अंधारी ॥१॥
तेथुनी काढावे गोविंदा । यशोदेच्या परमानंदा ॥२॥
तुझे सन्निधेचे पाशी । ठाव नाही अविद्येसी ॥३॥
तुझे संगति पावन । उद्धरिले ब्रह्मे पूर्ण ॥४॥
अजामेळ शुद्ध केला । म्हणे दासी जनी भला ॥५॥

 
[४८]
 
धनगोत कलत्र माय । सर्व जोडी तुझे पाय ॥१॥
सखा तुजवीण पाही । दुजा कोणी मज नाही ॥२॥
माझी न करावी सांडणी । म्हणे तुझी दासी जनी ॥३॥

 
[४९]
 
मी वत्स माझी गायी । न ये आता करु काई ॥१॥
तुम्ही तरी सांगा काही । शेखी विनवा विठाबाई ॥२॥
येई माझिये हरणी । चुकले पाडस दासी जनी ॥३॥

 
[५०]
 
सख्या पंढरीच्या राया । घडे दंडवत पाया ॥१॥
ऐसे करी अखंडित । शुद्ध प्रेम शुद्ध चित्त ॥२॥
वेध माझ्या चित्ता । हाचि लागो पंढरीनाथा ॥३॥
जावे ओवाळुनि । जन्मोजन्मी म्हणे जनी ॥४॥

 
[५१]
 
का गा उशिर लावला । माझा विसर पडिला ॥१॥
तुजवेरी संसार । बोळविले घरदार ॥२॥
तो तू आपुल्या दासासी । म्हणे जनी विसंबसी ॥३॥

 
[५२]
 
किती सांगू तूते । बुद्धि शिकवणे हे माते ॥१॥
सोमवंशाच्या भूषणा । प्रतिपाळी हर्षे दीना ॥२॥
शिकवावे तूते । हाचि अपराध आमुते ॥३॥
स्वामीलागी धीट ऐसी । म्हणती शिकवी जनी दासी ॥४॥

 
[५३]
 
शिणल्या बाह्या आता । येऊनिया लावी हाता ॥१॥
तू माझे वो माहेर । काय पहातोसी अंतर ॥२॥
वोवाळुनी पाया । जीवे भावे पंढरीराया ॥३॥
धर्म ताता धर्म लेकी । म्हणे जनी हे विलोकी ॥४॥

 
[५४]
 
योग न्यावा सिद्धि । सकळ गुणाचिया निधी ॥१॥
अरुपाच्या रूपा । सांबराजाचिया जपा ॥२॥
ब्रह्मियाच्या ताता । म्हणे जनी पंढरिनाथा ॥३॥

 
[५५]
 
माय मेली बाप मेला । आता सांभाळी विठ्ठला ॥१॥
मी तुझे गा लेकरु । नको मजशी अव्हेरु ॥२॥
मतिमंद तुझी दासी । ठाव द्यावा पायांपाशी ॥३॥
तुजविण सखे कोण । माझे करील संरक्षण ॥४॥
अंत किती पाहासी देवा । थोर श्रम जाला जीवा ॥५॥
सकल जीवाच्या जीवना । म्हणे जनी नारायणा ॥६॥

 
[५६]
 
अहो सखीये साजणी । ज्ञानाबाई वो हरिणी ॥१॥
मज पाडसाची माय । भक्तिवत्साची ते गाय ॥२॥
का गा उशीर लाविला । तुजविण शिण जाला ॥३॥
अहो बैसले दळणी । धाव घाली म्हणे जनी ॥४॥
 

[५७]
 
काय करु या कर्मासी । धाव पाव हृषिकेशी ॥१॥
नाश होतो आयुष्याचा । तुझे नाव न ये वाचा ॥२॥
काय जिणे या देहाचे । अखंड अवघ्या रात्रींचे ॥३॥
व्यर्थ कष्टविली माता । तुझे नाम न ये गाता ॥४॥
जन्म मरणाचे दु:ख । म्हणे जनी दाखवी मुख ॥५॥

 
[५८]
 
अहो ब्रह्मांडपाळका । ऐके रुक्मिणीच्या कुंका ॥१॥
देवा घेतले पदरीं । ते तू टाकू नको दुरी ॥२॥
होते लोकामध्ये निंद्य । ते त्वा जगात केले वंद्य ॥३॥
विनवीतसे दासी जनी । परिसा माझी विनवणी ॥४॥

 
[५९]
 
अहो देवा हरिहर । उतरी आम्हा भवपार ॥१॥
देवा आम्ही तुझे दास । करु वैकुंठीं वो वास ॥२॥
जनी म्हणे कल्पवृक्ष । देव दुष्टासी पै भक्ष ॥३॥

 
[६०]
 
शरण आले नारायणा । आता तारी हो पावना ॥१॥
शरण आला मारुतिराया । त्याची दिव्य केली काया ॥२॥
शरण प्रल्हाद तो आला । हिरण्यकश्यपू मारिला ॥३॥
जनी म्हणे देवा शरण । व्हावे भल्याने जाणोन ॥४॥


[६१]
 
ऐका बापा माझ्या पंढरीच्या राया । कीर्तना आलेया आर्तभूतां ॥१॥
माझ्या दुणेदारा पुरवी त्यांची आस । न करी निरास आर्तभूतां ॥२॥
त्रैलोक्याच्या राया सख्या उमरावा । अभय तो द्यावा कर तयां ॥३॥
जैसा चंद्रश्रवा सूर्य उचैश्रवा । अढळपद ध्रुवा दिधलेसे ॥४॥
उपमन्यु बाळका क्षीराचा सागरु । ऐसा तू दातारू काय वानू ॥५॥
म्हणे दासी जनी आलेया कीर्तनी । तया कंटाळुनी पिटू नका ॥६॥

 
[६२]
 
गजेंद्रासी उद्धरिले । आम्ही तुझे काय केले ॥१॥
तारिली गणिका । तिही लोकी तुझा शिक्का ॥२॥
वाल्हा कोळी अजामेळ । पापी केला पुण्यशीळ ॥३॥
गुणदोष मना नाणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

 
[६३]
 
राजाई गोणाई । अखंडीत तुझे पायी ॥१॥
मज ठेवियले द्वारी । नीच म्हणोनि बाहेरी ॥२॥
नारा गोंदा महादा विठा । ठेवियले अग्रवाटा ॥३॥
देवा केव्हा क्षेम देसी । आपुली म्हणोनि जनी दासी ॥४॥

 
[६४]
 
काय करु पंढरीनाथा । काळ साह्य नाही आता ॥१॥
मज टाकिले परदेशी । नारा विठा तुजपाशी ॥२॥
श्रम बहु जाला जीवा । आता सांभाळी केशवा ॥३॥
कोण सखा तुजविण । माझे करी समाधान ॥४॥
हीन दीन तुझे पोटी । जनी म्हणे द्यावी भेटी ॥५॥

 
[६५]
 
तुझे पाय रूप डोळा । नाही देखिले गोपाळा ॥१॥
काय करु या कर्मासी । नाश होतो आयुष्यासी ॥२॥
जन्मा येऊनिया दुःख । नाही पाहिले श्रीमुख ॥३॥
लळे पुरविसी आमुचे । जनी म्हणे ब्रीद साचे ॥४॥

 
[६६]
 
वाट पाहते मी डोळा । का गा न येसी विठ्ठला ॥१॥
तू वो माझी निज जननी । मज का टाकियले वनी ॥२॥
धीर किती धरू आता । कव घाली पंढरीनाथा ॥३॥
मला आवड भेटीची । धणी घेईन पायांची ॥४॥
सवे जिवांचे स्वामिणी । म्हणे जनी मायबहिणी ॥५॥

 
[६७]
 
येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥१॥
भीमा आणि चंद्रभागा । तुझे चरणीच्या गंगा ॥२॥
इतुक्यासहित त्वा बा यावे । माझे रंगणी नाचावे ॥३॥
माझा रंग तुझिया गुणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

 
[६८]
 
आता वाट पाहू किती । देवा रुक्माईच्या पती ॥१॥
येई येई पांडुरंगे । भेटी देई मजसंगे ॥२॥
मी बा बुडते भवजळी । सांग बरवी ब्रीदावली ॥३॥
राग न धरावा मनी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

 
[६९]
 
विठोबारायाच्या अगा लेकवळा । जाऊनी कळवळा सांगा माझा ॥१॥
विठोबारायाच्या अगा मुख्य प्राणा । भेटवी निधाना आपुलिया ॥२॥
अगे क्षेत्र माये सखे पंढरीये । मोकलिते पाय जीव जातो ॥३॥
विश्वाचिये माते सुखाचे अमृत । सखा पंढरीनाथ विनवी तरी ॥४॥
तू मायबहिणी देवाचे रुक्मिणी । धरोनिया जनी घाली पायी ॥५॥

 
[७०]
 
का गे निष्ठुर जालीसी । मुक्या बाळाते सांडिसी ॥१॥
तुज वाचोनिया माये । जीव माझा जावो पाहे ॥२॥
मी वत्स माझी माय । न ये आता करू काय ॥३॥
प्राण धरियेला कंठी । जनी म्हणे देई भेटी ॥४॥


 [७१]
 
धन्य ते पंढरी धन्य पंढरिनाथ । तेणे हो पतित उद्धरिले ॥१॥
धन्य नामदेव धन्य पंढरिनाथ । तयाने अनाथ उद्धरिले ॥२॥
धन्य ज्ञानेश्वर धन्य त्याचा भाव । त्याचे पायी देव आम्हा भेटो ॥३॥
नामयाची जनी पालट पै जाला । भेटावया आला पांडुरंग ॥४॥

 
[७२]
 
चिंतनी चित्ताला । लावी मनाच्या मनाला ॥१॥
उन्मनीच्या सुखाआत । पांडुरंग भेटी देत ॥२॥
कवटाळुनी भेटी पोटी । जनी म्हणे सांगू गोष्टी ॥३॥

 
[७३]
 
देहाचा पालट विठोबाचे भेटी । जळ लवणा गाठी पडोन ठेली ॥१॥
धन्य मायबाप नामदेव माझा । तेणे पंढरिराजा दाखविले ॥२॥
रात्रंदिवस भाव विठ्ठलाचे पायी । चित्त ठायीचे ठायीं मावळले ॥३॥
नामयाचे जनी आनंद पै जाला । भेटावया आला पांडुरंग ॥४॥

 
[७४]
 
पुंडलिके नवल केलें । गोपिगोपाळ आणिले ॥१॥
हेचि देई हृषिकेशी । तुझे नाम अहर्निशी ॥२॥
नलगे आणिक प्रकार । मुखी हरी निरंतर ॥३॥
रूप न्याहाळिन डोळा । पुढे नाचेन वेळोवेळा ॥४॥
सर्वांठायी तुज पाहे । ऐसे देऊनि करी साह्य ॥५॥
धावा करिता रात्र जाली । दासी जनीसी भेट दिली ॥६॥

 
[७५]
 
झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणि ॥१॥
पाटी घेऊनि डोईवरी । नेऊनिया टाकी दुरी ॥२॥
ऐसा भक्तीसी भुलला । नीच कामे करू लागला ॥३॥
जनी म्हणे बा विठ्ठला । काय उतराई होऊ तुला ॥४॥

 
[७६]
 
पूर्वी काय तप नेणे पै हो केले । निधान जोडिले पंढरीचे ॥१॥
येऊनिया देव दळू लागे अंगे । रखुमाईचा संग दूर केला ॥२॥
तैसाचि पै संगे येऊनि बाहेरी । वेचोनिया भरी शेणी अंगे ॥३॥
ओझे जाले म्हणोनि पाठी पितांबरी । घेऊनिया घरी आणितसे ॥४॥
ऐसे जेथे काम करी चक्रपाणि । तेथे कैची जनी नामयाची ॥५॥
 

[७७]
 
येकलीच गाणे गासी । दुजा शब्द उमटे पाशी ॥१॥
कोण गे तुझ्याबरोबरी | गाणे गाती निरंतरी ॥२॥
पांडुरंग माझा पिता । रखुमाई जाली माता ॥३॥
ऐशियाच्या घरी आले । जनी म्हणे धन्य जाले ॥४॥

 
[७८]
 
जनी डोईने गांजली । विठाबाई धाविन्नली ॥१॥
देव आले लवडसवडी । उवा मारितसे तातडी ॥२॥
केश विंचरूनी मोकळे । जनी म्हणे निर्मळ जाले ॥३॥

 
[७९]
 
जनी बैसली न्हायाला । पाणी नाही विसणाला ॥१॥
घागर घेउनि हातांत । पाणी आणी दीनानाथ ॥२॥
करूनिया येरझार । पाणी भरी सारंगधर ॥३॥
पुरे पुरे रे विठ्ठला । जनिचा अंतरंग धाला ॥४॥

 
[८०]
 
एके दिवशी न्हावयास । पाणी नव्हते विसणास ॥१॥
देव धावोनिया आले । शीतळ उदक घे घे बोले ॥२॥
आपुल्या हाते विसणी । घाली जनीच्या डोयी पाणी ॥३॥
माझ्या डोईच्या केसांस । न्हाणे नव्हतें फार दिवस ॥४॥
तेणे मुरडी केशांस । का म्हणे उगीच बैस ॥५॥
आपुल्या हाते वेणी घाली । जनी म्हणे माय आली ॥६॥

 
[८१]
 
तुळशीचे वनी । जनी उकलीत वेणी ॥१॥
हाती घेऊनिया लोणी । डोई चोळी चक्रपाणि ॥२॥
माझे जनीला नाही कोणी । म्हणूनी देव घाली पाणी ॥३॥
जनी सांगे सर्व लोका । न्हाऊ घाली माझा सखा ॥४॥

 
[८२]
 
साळी कांडायास काढी । चक्रपाणि उखळ झाडी ॥१॥
कांडिता कांडिता । शीण आला पंढरिनाथा ॥२॥
कांडीताना घाम आला । तेणे पितांबर भिजला ॥३॥
पायी पैंजण हातीं कडी । कोंडा पाखडोनि काढी ॥४॥
हाता आला असे फोड । जनी म्हणे मुसळ सोड ॥५॥

 
[८३]
 
ज्याचा सखा हरी । त्यावरी विश्व कृपा करी ॥१॥
उणे पडो नेदी त्याचे । वारे सोसी आघाताचे ॥२॥
तयावीण क्षणभरी । कदा आपण नव्हे दुरी ॥३॥
आंगा आपुले ओढोनी । त्याला राखे जो निर्वाणी ॥४॥
ऐसा अंकित भक्तांसी । म्हणे नामयाची जनी दासी ॥५॥

 
[८४]
 
पक्षी जाय दिगंतरा । बाळकांसी आणी चारा ॥१॥
घार हिंडते आकाशी । झेप घाली पिल्लांपासी ॥२॥
माता गुंतली कामासी । चित्त तिचे बाळापाशी ॥३॥
वानर हिंडे झाडावरी । पिली बांधुनी उदरी ॥४॥
तैसी आम्हांसी विठ्ठल माये । जनी वेळोवेळा पाहे ॥५॥
 

[८५]
 
भक्‍त जे जे कर्म करिती । ते तू सोसिसी कृपामूर्ती ॥१॥
हे तो नवल नव्हे देवा । तू भुललासी भक्तिभावा ॥२॥
वाग्दोर धरुनी हाती । चारी घोडे चहू हत्ती ॥३॥
धूता लाज नाही तुला । दासी जनी म्हणे भला ॥४॥

 
[८६]
 
देव भावाचा लंपट । सांडुनि आला हो वैकुंठ ॥१॥
पुंडलिकापुढे उभा । सम चरणींची शोभा ॥२॥
हाती चक्र पायी वांकी । मुख भक्ताचे अवलोकी ॥३॥
उभा बैसे न सर्वथा । पाहे कोठे भक्‍तकथा ॥४॥
सर्व सुखाचा सागर । जनी म्हणे शारंगधर ॥५॥


[८७]
 
दुःशासन द्रौपदीसी । घेउनी आला तो सभेसी ॥१॥
दुर्योधन आज्ञा करी । नग्न करावी सुंदरी ॥२॥
आता उपाय कृष्णा काय । धावे माझे कृष्णमाय ॥३॥
निरी ओढिता दुर्जन । जाले आणिक निर्माण ॥४॥
ऐसी असंख्य फेडिली । देवी तितुकी पुरविली ॥५॥
तया संता राखिले कैसे । जनी मनीं प्रेमे हांसे ॥६॥

 
[८८]
 
ब्राह्मणाचे पोर । मागे दूध रडे फार ॥१॥
माता म्हणे बालकासी । दूध मागे देवापाशी ॥२॥
क्षिराब्धीची वाटी । म्हणे जनी लावी होटी ॥३॥

 
[८९]
 
पंढरीच्या राया । तुझ्या विनवणी पाया ॥१॥
काय वर्णू हरिच्या गोष्टी । अनंत ब्रह्मांडे याचे पोटी ॥२॥
सेना न्हावी याचे घरी । अखंड राबे विठ्ठल हरी ॥३॥
राम चिंता ध्यानी मनी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

 
[९०]
 
भिल्लणीची फळे कैशी । चाखोनी वाहातसे देवासी ॥१॥
भावे तिची अंगिकारी । सर्वांहुनी कृपा करी ॥२॥
गुज वान्नरांसी पुसावे । राक्षसाते हो जिंकावे ॥३॥
वान्नर अवघे भुभुःकार । बोलताती रामासमोर ॥४॥
आज्ञा करावी आम्हांसी । रावण आणितो तुम्हापासी ॥५॥
तुझ्या नामाच्या प्रतापे । हनुमंत गेला जो संतापे ॥६॥
सीताशुद्धि करूनी आला । दासी जनीस आनंद जाला ॥७॥

 
[९१]
 
यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्‍तांचा कळवळा ॥१॥
त्याचा जाला म्हणीयारा । राहे धरी धरी थारा ॥२॥
देव बाटविला त्याणे । हांसे जनी गाय गाणे ॥३॥

 
[९२]
 
चोखामेळा संत भला । तेणे देव भुलवीला ॥१॥
भक्ति आहे ज्याची मोठी । त्याला पावतो संकटी ॥२॥
चोख्यामेळ्याची करणी । तेणे देव केला ऋणी ॥३॥
लागा विठ्ठल चरणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

 
[९३]
 
माळियाचा लेक जाला । सेखी कुर्म्यालागी गेला ॥१॥
चांभाराने जानव्यासी । काढोन दाविले भटांसी ॥२॥
तुरका घरी सेले विणी । म्हणे नामयाची जनी ॥ ३॥

 
[९४]
 
माझा लोभ नाही देवा । तुझी करी ना मी सेवा ॥१॥
नाही अंगी थोरपण । मिथ्या धरिसी गुमान ॥२॥
रागा येऊनि काय करिसी । तुझे बळ आम्हापासी ॥३॥
नाही सामर्थ्य तुज हरी । जनी म्हणे धरिला चोरी ॥४॥

 
[९५]
 
द्रौपदीकारण । पाठीराखा नारायण ॥१॥
गोरा कुंभाराच्या संगे । चिखल तुडवू लागे अंगे ॥२॥
कबिराच्या बैसोनी पाठी । शेला विणिता सांगे गोष्टी ॥३॥
चोख्यामेळयासाठी । ढोरे ओढी जगजेठी ॥४॥
जनीसंगे दळू लागे । सुरवर म्हणती धन्य भाग्ये ॥५॥

 
[९६]
 
देव भक्‍ताचा अंकित । कामे त्याची सदा करित ॥१॥
त्याचे पडो नेदी उणे । होय रक्षिता आपण ॥२॥
जनी म्हणे भक्तिभाव । देवदास ऐक्य जीव ॥३॥

 
[९७]
 
बाळे भोळे ठकविशी । ते तव न चाले आम्हापाशी ॥ १॥
गर्व धरिसी नामाचा । सोहं सोहं गर्जे वाचा ॥२॥
आशा तृष्णा तुम्हापाशी । नाही म्हणे जनी दासी ॥३॥
 

[९८]
 
जेवी जेवी बा मुरारी । तुज वाढिली शिदोरी ॥१॥
कनकाचे ताटी । दहीदुधे भरली वाटी ॥२॥
आमुचे ब्रह्म सारंगपाणि । हिंडतसे रानोरानी ॥३॥
गोपाळांचे मेळी । हरि खेळे चेंडुफळी ॥४॥
तुळसीचे वनी । उभी राहे दासी जनी ॥५॥

 
[९९]
 
जनी म्हणे पांडुरंगा । माझ्या जीवीच्या जीवलगा ॥
विनविते सांगा । महिमा साधुसंतांचा ॥१॥
कैसी वसविली पंढरी । काय महिमा भीमातीरी ॥
पुंडलिकाच्या द्वारी । का उभा राहिलासी ॥२॥
कैसा आला हा गोविंद । कैसा जाला वेणुनाद ॥
येउनी नारद । का राहिला ॥३॥
कृपा करा नारायणा । सांगा अंतरीच्या खुणा ॥
येऊ दे करुणा । दासी जनी विनवितसे ॥४॥

 
[१००]
 
दुर्योधना मारी । पांडवासी रक्षी हरी ॥१॥
पांडव वनवासी जाये । तयापाठी देव आहे ॥२॥
उणे न पडे तयाचे । काम पुरवी हो मनाचे ॥३॥
जनी म्हणे विदुराच्या । कण्या भक्षी हो प्रीतीच्या ॥४॥
 

© 2025 Sitaram Mhatre Foundation

Call us:

+91-865-735-1636

Find us: 

Sitaram Smaran, House no. 896,

Sector 19B, Koparkhairane,

Navi Mumbai

  • Pinterest
  • Twitter
  • LinkedIn
  • Facebook
  • YouTube

Website developed & maintained by:

Mhatre's Traslation & Allied Services

Sitaram Mhatre Foundation

Our Programmes:

English for ALL

Science for ALL

Computers for ALL

Memoirs of the PAP

Bhakti Literature in Unicode

bottom of page