संत बहिणाबाईंचे आत्मचरित्र

ISBN: 978-81-987918-6-3
संत बहिणाबाई शिऊरकर (१६२८-१७००) ह्या संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन. लहानपणापासूनच अध्यात्माची विलक्षण ओढ. एका कुलकर्णी कुटुंबात जन्म होऊनदेखील वयाच्या तिसऱ्याच वर्षी त्यांचे लग्न ३० वर्षांच्या विधुराशी लावून दिले गेले आणि सुरू झाली अंनत छळांची व न सरणाऱ्या संकटांची मालिका. जेमतेम सात वर्षांच्या असताना त्यांना आपले जन्मगाव सोडून आपल्या आई-वडिलांबरोबर गावोगावी हिंडावे लागले, तेही पायीच. महिनोनमहिने भिक्षा मागून त्यांच्या कुटुंबाची गुजराण चालत असे. इतक्या लहानपणी ह्या हालअपेष्टा कमी होत्या की काय म्हणून त्यांचा अति कोपिष्ट व हृदयशून्य नवरादेखील ह्या अक्काबाईच्या फेऱ्यात त्यांच्या कुटुंबासोबत असायचा. एखादे दिवशी जेवण मिळेल न मिळेल पण नवऱ्याच्या हातचा (व लाथांचा देखील) मार ठरलेलाच! अगदी कोवळी पोर असल्यापासून ते तीन महिन्यांची गरोदर असेपर्यंत त्यांच्या नवऱ्याने त्यांना यथेच्छ तुडवले. त्यांच्या तथाकथित उच्च वर्णाने घरगुती हिंसाचाराच्या ह्या अखंड नरकातून त्यांची सुटका करण्यासाठी काही केले तर नाहीच, उलट त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत त्यांना हात-पाय बांधून अक्षरशः ढोरासारखे बडवले जायचे.
मात्र बहिणाबाई मुक्या जनावरांप्रमाणे गप्प बसल्या नाहीत. आपल्यावर झालेल्या ह्या अत्याचाराला त्यांनी आपल्या आत्मचरित्रातून वाचा फोडली. सतराव्या शतकात आपले जीवनानुभव शब्दबद्ध करून त्या अखिल भारतातील पहिल्या महिला आत्मचरित्रकार बनल्या. जागतिक साहित्याच्या इतिहासातील घरगुती हिंसाचाराच्या पीडितांच्या आत्मकथनांमध्ये संत बहिणाबाईंच्या आत्मचरित्राचा साहित्यगुणदृष्ट्या तसेच कालदृष्ट्या फार वरचा क्रमांक लागतो व ते अशा प्रकारचे अनुभव व्यक्त करणारे अखिल जगातील कदाचित पहिलेच आत्मकथन ठरते. बहिणाबाईंनी आपल्या ह्या आत्मचरित्रामध्ये पितृसत्ताक समाजव्यवस्थेवर घणाघाती आघात केले, तेदेखील स्त्रीवादाच्या जननी मानल्या जाणाऱ्या मेरी वॉलस्टोनक्राफ्ट ह्यांच्या शंभर वर्षे आधी! विवाहित स्त्रीला पुरुषाची संपत्ती मानणाऱ्या पुरुषप्रधान समाजपद्धतीला आपल्या आत्मचरित्रामधून आरसा दाखवणाऱ्या संत बहिणाबाई स्त्रीवादी साहित्याच्या संस्थापक माता ठरतात. इतके विविध पैलू लाभलेल्या संत बहिणाबाईंच्या आत्मचरित्राबरोबरच ह्या पुस्तकात त्यांनी केलेले वज्रसूची उपनिषदाचे भाषांतरदेखील समाविष्ट केले आहे. सतराव्या शतकात रचल्या गेलेल्या व प्रसिद्ध पावलेल्या ह्या भाषांतराच्या आधारे संत बहिणाबाई अखिल भारतातील पहिल्या महिला भाषांतरकार ठरतात. खऱ्या ब्राम्हण्याची व्याख्या करणारे हे भाषांतर जातीय विषमतेचे पुनरुज्जीवन करू पाहणाऱ्या आपल्या सध्याच्या काळात फारच प्रासंगिक ठरते.
***जलद दुवे***
गावठाण प्रतिनिधी, युवा प्रतिनिधी व युवा संपादकीय मंडळाच्या सभासदपदासाठी अर्ज
मातोश्री तुलसीबाई सीताराम म्हात्रे शिष्यवृत्ती

