top of page

 

आम्ही काय प्रकाशित करतो

प्रकल्पग्रस्तांच्या बातम्या

प्रकल्पग्रस्तांची आत्मकथने

प्रकल्पग्रस्तांची कर्तृत्वे

मत-मतांतरे

संपादकांस पत्रे

बातमी-लायक फोटो (Geo-Tagged)

बातमी-लायक व्हिडिओ

स्थानिक संस्कृतीविषयक लेख

स्थानिक भाषांमधील साहित्य

We the PAP_Header_website.png

विकासाचे ग्रहण

विकासाच्या नावाखाली भरडल्या जाणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या व्यथांचे दस्तऐवजीकरण

संपादकीय टिप

'विकासाचे ग्रहण’ या सदरात विकासप्रकल्पांमुळे प्रभावित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे अनुभव, स्मृती, लेख, निवेदने आणि दस्तऐवज प्रकाशित केले जातील. विकासाच्या मुख्य प्रवाहातील कथनांमधून वगळल्या गेलेल्या आवाजांना आणि स्मृतींना सार्वजनिक अवकाश उपलब्ध करून देणे हा या प्रयत्नामागील व्यापक हेतू आहे.

लेख

सावधान, सिद्धेश्वर धरणाचे पाणी पेटू देऊ नका!

लेखक: प्रा. डॉ. विठ्ठल खंडुजी जायभाये
प्रकाशन दिनांक : १२ मे २०२६
विषय: सिद्धेश्वर धरण, सिंचन, पाणी हक्क, ग्रामीण विकास

 

 

रडल्याशिवाय माय सुद्धा लेकराला जवळ घेत नाही. आपणच आपला आवाज झालं पाहिजे. जी माणसं स्वतःचा आवाज मोठ्या ताकदीने लेखणी, भाषण, उठाव, आंदोलन, मोर्चे इत्यादी माध्यमांतून लोकांसमोर मांडतात तीच माणसं खऱ्या अर्थाने जिवंत असतात. स्वतःच्या राजकीय अथवा आर्थिक क्षुल्लक लाभापायी एखाद्या धनदांडग्या, राजकीय व्यक्तीच्या पायावर लोळण घेणारी माणसं ही कधीही समाजाचं भलं करू शकत नाहीत. पाठीचा कणा नसलेल्या अशा माणसांकडून समाजाला कधीच लाभ होत नाही. अशी स्वार्थाने बरबटलेली माणसं फक्त स्वतःचं राजकीय पद, संपत्ती वाढवू शकतात. हे केवळ स्वार्थी ढेकुण!

 

मित्रहो, एवढं लिहिण्याचं कारण म्हणजे आमच्या औंढा नागनाथ तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील साळणा, गोजेगाव, सावळी, पारडी, येळी, केळी, चिमेगाव, भगवा, एकबुर्जी वाडी, अनखळी, पोटा, बेरुळा, हिवरखेडा, उंडेगाव इत्यादी गावांच्या उत्तरेला एवढं मोठं सिद्धेश्वर धरण असूनही या खालच्या गावातील लोकांना शेत सिंचनासाठी शेकडो फूट विहिरी खोदूनही पाणी लागत नाही. ऐन उन्हाळ्यात गुरा-वासरांना पाणी नाही, बाया-बापड्यांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. “धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी भयावह अवस्था या गाव-शिवारांची झाली आहे. मित्रहो, जरा पश्चिम महाराष्ट्रात जा. पाय ठेवाल तिथं पाणी आहे. याचं कारण म्हणजे तेथील राजकीय, सामाजिक लोकांना दूरदृष्टी आहे. त्यांनी आपल्या लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील लोक सुजलाम, सुफलाम, शांत, श्रीमंत असून कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या पुढे-पुढे अथवा मागे-मागे करताना दिसत नाहीत. असो. राजकीय भाग बाजूला ठेवा. आता आंदोलन करण्याची निर्णायक वेळ येऊन ठेपली आहे!

 

वरील गावातील युवकांनो, जरा जागे व्हा! स्वतःच डोकं स्वतःच्या धडावर असल्यासारखे वागा! हातातील मोबाईल कधीतरी आपल्या भागाच्या उत्कर्षासाठी उपयोगात आणा. हा देह आणि मिळालेले तारुण्य हे थोडे तरी आपल्या भागासाठी वापरण्यासाठी घराबाहेर पडा. आंदोलन करा. मोर्चे काढा. सिद्धेश्वर धरणाच्या खालचा म्हणजेच दक्षिणेतील सर्वच भाग हा का बरं कोरडवाहू आहे? तिथल्या एकाही राजकारणी व्यक्तीला याच्याकडे लक्ष द्यायची गरज आतापर्यंत का बरं पडली नाही? या अगोदरही आमच्या गोजेगावचा भूमिपुत्र साम टीव्हीचा जिल्हा प्रतिनिधी संदीप नागरेने “धरण उशाला आणि कोरड घशाला” ही मालिका चालवली होती. त्यावेळी आश्वासनही देण्यात आले; परंतु कालौघामध्ये ही आश्वासनं हवेत विरून गेली. अनेक निवडणुका झाल्या. लोक वेगवेगळ्या पदावर विराजमान झाले आणि सिद्धेश्वरच्या खालच्या म्हणजेच दक्षिणेकडील गावांच्या सिंचनाचा प्रश्न मात्र तसाच भिजत पडला!

 

युवकांनो, आपल्या भागाचं प्रतिनिधित्व आपण स्वतः करा. जात, धर्म, पंथ, लिंग इत्यादी भेद बाजूला ठेवा आणि युवकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा द्या. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील सुज्ञ, जाणकार लोकांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून लढणाऱ्या पोरांच्या आंदोलनाला बळ द्या. सर्व गावातील तरुण सुज्ञ माणसांनी एकत्र येऊन पंचक्रोशीचा सिंचनाचा मूलगामी प्रश्न मिटवण्यासाठी शासनाला आणि प्रशासनाला प्रश्न विचारण्यासाठी रस्त्यावर या. आंदोलन, मोर्चे, उठाव करत असताना कोणत्याही सामूहिक, देशाच्या मालमत्तेचे आपल्याकडून नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. आंदोलनातून जात, धर्म आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन शंभर टक्के समाजकारण या न्यायाने हे आंदोलन तुम्ही-आम्ही सगळे मिळून एकत्र येऊन यशस्वी करूया!

 

मित्रहो, आपल्या भागात सिद्धेश्वर धरणाचे पाणी आल्यास काय काय होईल(?) जरा याचा विचार करा. प्रत्येक हाताला काम मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. फळ-फळावळ, भाजीपाला इत्यादी आपल्याला पिकवता येईल. प्रत्येक घरी दूध होईल. गावागावातील मुलं वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसाय करून शेतीच्या माध्यमातून आपल्या घराचा उत्कर्ष करतील. पाणीच हे खऱ्या अर्थानं आपल्या भागाचं उद्धार करणारं साधन आहे हे लक्षात असू द्या. अलीकडे शासकीय नोकऱ्या गोठलेल्या असताना आपण आपल्या शेतात आपल्या हक्काचं पाणी आणून सिंचनाच्या माध्यमातून वेगवेगळे छोटे मोठे उद्योग सुरू करूया. यातून आपण आपली आर्थिक उन्नती करू शकता. आपल्या भागात पाणी आल्यास डोंगरावर सुद्धा तुम्ही सफरचंद, अंगूर, टरबूज, खरबूज, खारीक इत्यादी फळबागांची शेती करू शकता. सावळी, पारडी, गोजेगाव, धार हा जो डोंगरपट्टा आहे; या डोंगरावर पाणी नेऊन प्रत्येक शेतकरी स्वावलंबी होऊ शकतो. ​कुणीही तुम्हाला पाणी आणून देणार नाही, त्यासाठी तुम्हाला भांडावं, लढावं लागेल! तुम्हाला व्यवस्थेला आणि सत्तेला प्रश्न विचारावे लागतील. यासाठी कविवर्य प्रा.इंद्रजीत भालेराव सरांची​

शिक बाबा शिक, लढायला शिक

कुणब्याच्या पोरा आता, भांडायला शिक

ही कविता आम्हाला लढायला शिकवते. तुम्हाला प्रशासन, शासन, राजकारण अंगावर घ्यावं लागेल. स्वार्थ बाजूला ठेवून लढावं लागेल. व्यवस्थेला खेटावं लागेल. असं झाल्यास कितीही कठीण परिस्थिती असली तरी व्यवस्था तुम्हाला शरण आल्याशिवाय राहणार नाही! तेव्हा मित्रहो, या तरुणांनी आंदोलन छेडलेलच आहे, तर त्यांच्या आंदोलनात सहभागी व्हा! कोणीही त्याचे राजकीय भांडवल करून स्वार्थापायी एकमेकांचे पाय खेचू नका. तसे केल्यास काळ आणि या पंचक्रोशीतील जनता तुम्हाला माफ करणार नाही हे लक्षात ठेवा! राजकारण आणि पद आज आहे आणि उद्या नाही हे कृपया लक्षात ठेवा!

 

आंदोलन करणारी मुलं ही तरुण आहेत. हिंगोली जिल्हा, औंढा नागनाथ तालुक्यातील शासन, प्रशासन आणि राजकारणी व्यक्तींनी तरुणांच्या आणि आमच्या पंचक्रोशीतील लोकांच्या मागणीकडे आपुलकीने, सहानुभूतीपूर्वक पहावे. हा प्रश्न मूलभूत आहे या विचाराने याकडे पाहून तात्काळ त्या संदर्भाने पत्रव्यवहार करावा. या धरणातील पाणी खाली वसमत, नांदेडपर्यंत १००-२०० किलोमीटर जाऊ शकते; मग जवळच ५-१० किलोमीटर अंतरावर का येऊ शकत नाही(?) याचा आपुलकीने विचार करा. शासनाला पत्रव्यवहार करताना केवळ चॉकलेट देऊ नका, तर त्या अनुषंगाने सर्वच लोकप्रतिनिधींनी सिद्धेश्वर धरणातील पाणी हे केळीच्या आणि गोजेगावच्या तलावात आणून सोडताना खालच्या अनखळी, पोटा, चिमेगाव, भगवा, साळणा, बेरूळा, हिवरखेडा, उंडेगाव इत्यादी शिवारांमध्ये सिद्धेश्वर धरणातून पाणी नेण्यासाठी तात्काळ कॅनलचे प्रस्ताव शासनाकडे पाठवून मंजूर करून घ्या. सिद्धेश्वर धरणाचे पाणी दक्षिणेकडील अत्यंत जवळच्या गावांना का नाही मिळू शकत? या पाण्यावर सर्व लोकांचा हक्क आहे, ती नैसर्गिक संपत्ती आहे. याचबरोबर दरवर्षी पावसाळ्यामध्ये धरण भरल्यानंतर लाखो क्युसेक लिटर पाणी वाया जाते, त्यासाठी सुद्धा शासनाच्या विविध प्रकारच्या कृतीशील योजना या डोंगरपट्ट्यातील गावांसाठी आखून त्यांचा सिंचन-रोजगाराचा प्रश्न सोडवा.

 

तेव्हा शेतकरी मित्रांनो, चला उठा आणि सिद्धेश्वर धरणातील आपलं हक्काचं पाणी घेण्यासाठी पेटून उठा! कोणत्याही व्यवस्थेला वेठीस न धरता, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान न करता, स्वतःची काळजी घेत न्याय हक्काने आपली मागणी लावून धरा!

 

पंचक्रोशीची एकच हाक, केळी-गोजेगाव तळ्यात पाणी टाक!

​प्रथम प्रकाशन : आधुनिक केसरी

लेखक परिचय
प्रा. डॉ. विठ्ठल खंडुजी जायभाये हे गोजेगाव पंचक्रोशीचे भूमिपुत्र असून कै. रमेश वरपुडकर वरिष्ठ महाविद्यालय, सोनपेठ, जि. परभणी येथे इंग्रजी विभागात अधिव्याख्याता आहेत.

प्रताधिकार सूचना

हा लेख लेखकाच्या परवानगीने पुनर्प्रकाशित करण्यात आला आहे.

मूळ लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव आहेत.

© 2025 Sitaram Mhatre Foundation

Call us:

+91-865-735-1636

Find us: 

Sitaram Smaran, House no. 896,

Sector 19B, Koparkhairane,

Navi Mumbai

  • Pinterest
  • Twitter
  • LinkedIn
  • Facebook
  • YouTube

Website developed & maintained by:

Mhatre's Traslation & Allied Services

Sitaram Mhatre Foundation

Our Programmes:

English for ALL

Science for ALL

Computers for ALL

Memoirs of the PAP

Bhakti Literature in Unicode

bottom of page