top of page

 

 

Bhakti Literature in Unicode Project

Sant Nivruttinath Gatha: Abhang 1-100

Coordinator-Editor: Chandrakant Mhatre

Unicodification: Chandrakant Mhatre

***START OF THE PROJECT SHABDAAGAR EBOOK SANT NIVRUTTINATH GATHA***

संत निवृत्तीनाथ गाथा

 

 

[१]

 

आदीची अनादी मूळ पै सर्वथा । पराविया कथा हारपती ॥१॥ 

ते अव्यक्‍तरूप देवकीचे बाळ । वसुदेवकुळ कृष्णठसा ॥२॥

मुरली ब्रह्मांडे अमिते पै अंडे । ढिसाळ प्रचंडे जया अंगी ॥३॥

निवृत्तीचे धन माजी तो श्रीकृष्ण । सांगितला प्रश्‍न गयनीराजे ॥४॥


 

[२] 

 

बिंबी बिंब येक बिंबले सम्यक्‌ । आपण तिन्ही लोक एक्या रूपे ॥१॥ 

तो कृष्णरूपठसा गोपाळां लाधला । सर्वत्र देखिला चतुर्भुज ॥२॥ 

निळिमा अंबरी नीळवर्ण तेज । गोपाळ सहज बिंबाकार ॥३॥ 

निवृत्ति परिपाठ नीळवर्ण खरा । नंदाचिया घरा कृष्ण आले ॥४॥


 

[३]

 

कामना कामीक वासना तार्किक । रजतमसात्विक येक्या रूपे ॥१॥ 

ते हे कृष्णमये कृष्णनाम खेळे । भवितभावलळे पोषीतसे ॥२॥ 

नित्य ते अनित्य आपणचि सत्य । कार्याकारणकृत्य हरपे जेथे ॥३॥ 

निवृत्तीचे ध्यान धारणाविवर । सर्वरूपे घर वैकुंठ माझे ॥४॥


 

[४] 

 

मीरूप कळले तूपण सांडिले । कल्पने तोडिले मुळीहुनी ॥१॥

मूळ ते नुगवे फळ ते निमाले । हरि हे घेतले जीवनहेतु ॥२॥

जाला पै सरता हरिनामपाठे । नेतसे  वैकुंठे गुरुकृपा ॥३॥ 

निवृत्ति गयनीनाम नारायणी । अखंडता ध्यानी रामनाम ॥४॥


 

[५]

 

सनकसनंदन भक्त अंतरंग । हरिरूपे सांग पूर्ण झाले ॥१॥

तेथील उद्बोध उद्गारु पारुषे । सवे हाचि दिसे हरि आम्हा ॥२॥

निवृत्तिसंग सुलभ श्रीरंग । टाकिला उद्वेग कल्पनेचा ॥३॥


 

[६]

 

बुद्धिबोध नाही क्षमारूप सर्व । तेथे देहभाव अर्पियेला ॥ १॥

नाही काळवेळ नाही तो नियम । सर्व यमनेम बुडोनि ठेले ॥२॥

हरिरूप सर्व गयनीप्रसादे । सर्व हा गोविंद आम्हा दिसे ॥ ३॥

निवृत्ति सफळ गयनी वोळला । सर्व काळ जाहला हरिरूप ॥५॥


 

[७]

 

गयनी गहिवर कृपेचा उद्गार । वरुषला उदार अमृतमय ॥१॥

तोचि ओघ साचा मुक्‍ताईसि लाठा । चालिलो वेकुंठा समारंभे ॥२॥ 

कुंचे गरुडटके टाळ श्रुति हरि । चालिलो गजरी हरिसंगे ॥३॥ 

निवृत्ति वैष्णव सोपान खेचर । करिताती गजर हरिनामे ॥४॥ 


 

[८]

 

जेथुनी हे परा पश्यंती वोवरा । मध्यमा निर्धारा वैखरी वाहे ॥१॥ 

ते रूप सुंदर नाम ते श्रीधर । जेणे चराचर रचियेले ॥२॥

वेदाचे जन्मस्थान वेदरूप आपण । तो हा नारायण नंदाघरी ॥३॥

निवृत्तिदैवत पूर्ण मनोरथ । गोपिकांचे हित हरि माझा ॥ ४॥


 

[९]

 

भावयुक्‍त भजता हरि पावे पूर्णता । तो गोकुळी खेळता देखो हरी ॥१॥ 

मुक्‍तीचे माजिवडे ब्रह्म चहूंकडे । गौळणी वाडेकोडे खेळविती ॥२॥ 

न संपडे ध्यानी मनी योगिया चितनी । तो गोकुळीचे लोणी हरि खाये ॥ ३॥ 

निवृत्तिजीवन गयनीनिरूपण । तो हा नारायण गोकुळी वसे ॥४॥


 

[१०]

 

सत्यभामा माये अन्नपूर्णा होये । वेळोवेळा सोय कवळु मुखी ॥१॥ 

राही रखुमाई आदिमाता मोहे । नामा तो उपाये बुझाविती ॥२॥ 

घेरे नाम्या ग्रास ब्रह्मीचा गळाला । आवडसी गोपाळा प्रीतिहुनी ॥३॥ 

कुर्वाळितो हरि नुघडी तो दृष्टी । सप्रेमाचा पोटी अधिक होसी ॥४॥ 

धरूनि हनुवटी पाहे कृपादृष्टी । आनंदाचे सृष्टी माजी नामा ॥५॥ 

निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगा हरि । यांसि परोपरी कवळु देतु ॥६॥


[११] 

 

नुघडिता दृष्टि न बोले तो वाचा । हरिरूपी साचा तल्लीनता ॥१॥ 

उठि उठि रे नाम्या चाल रे सांगाते । माझे आवडते जीवलगे ॥२॥ 

कुरवाळिला करे पुसतुसे गूज । घेई ब्रह्मबीज सदोदीत ॥३॥

ज्ञानासी लाधले निवृत्ति फावले । सोपाना घडले दिनकाळ ॥४॥

ते हे रे सखया खेचरासि पुसे । गुरुनामी विश्वासे ब्रह्मरूपे ॥५॥

निवृत्ति म्हणे आता अनाथ श्रीहरि । तूचि चराचरी हेचि खूण ॥६॥

 

[१२]

नुघडूनिया दृष्टि नामा पाहे पोटी । आनंदाची सृष्टि तया जाली ॥१॥ 

घे रे नाम्या कवळु आनंदाचा होसी । तुजमाजी निवासि हरि आहे ॥२॥ 

नामा पसरी मुख आनंदला तृप्त । केवळ पूर्ण भरित हरिराज ॥३॥ 

निवृत्तीने सेविला कवळु हा हरि । तूचि चराचरी दिससी आम्हा ॥४॥


 

[१३] 

 

तंत आणि वितंत त्यामाजी मथित । नाद उमटत स्वानंदाचा ॥१॥ 

सोहंबीजतत्त्व गुरुनाममंत्र । ज्ञानी उपासित हरिराज ॥२॥

भेदूनि कुंडलिनी गोल्हाट निकट । आत्माराम पेठ पांडुरंग ॥३॥

निवृत्ति म्हणे मी सर्वस्व होईन । हरि हा भरीन पूर्ण देही ॥४॥


 

[१४]

 

आगम निगम सर्व सर्वोत्तम । दिननिशी राम सेवीतुसे ॥१॥ 

आत्मा गोड हरि आम्हा चाड धरी । अरिते संहारी आम्हा माजी ॥२॥ 

नेघो हरीविण दुजे ते पै भिन्न । सांगितली खूण गुरुराजे ॥३॥ 

निवृत्ति गयनीप्रसाद उन्मनी । निरंतर ध्यानी रामनाम ॥४॥


 

[१५]

 

भक्तीचे महिमान भक्तांसी फळले । दिनकाळ केले ब्रम्हार्पण ॥१॥ 

ब्रम्हार्पण राम संतोषरूप जाला । ब्रह्मचि रूप केला आपण्याऐसा ॥२॥ 

सर्व ब्रह्म राम वेदादिक शब्द । आपण गोविंद सर्वाघटी ॥३॥ 

निवृत्तीने ब्रह्म देखिले परिपूर्ण । माजी सनातन ब्रह्म सुखे ॥४॥


 

[१६]

 

सर्व हरि ब्रह्म वेदादिक मती । श्रुतीही बोलती तेणे पंथे ॥१॥ 

ब्रह्मामाजी जयो ब्रह्मांड उदयो । ब्रह्म हे स्वयमेवो आत्माराम ॥२॥ 

शास्त्रे समवाय उपनिषदे गोमती । चैतन्याची श्रुती ब्रह्ममय ॥३॥ 

निवृत्ति निरोपण सर्व नारायण । हरिविण दिन रिता नाही ॥४॥


 

[१७]

 

श्रुतिशास्त्रवेद यांसी नाहीं भेद । भेदवादी द्वंद्व वेगळे पडे ॥१॥ 

वेगळा भाविता वेगळाचि होये । ब्नह्मासी न साहे तेथिचा मळ ॥२॥ 

मळेसि वोविळा राहाटी गोविला । तो कैसा खुंटला बोलो आम्ही ॥३॥ 

निवृत्ति साधन न करा हा विश्वास । गुरुविण पाश न तुटती ॥४॥


 

[१८]

 

ध्येयध्याताध्यान ज्ञेयज्ञाताज्ञान । दृश्य द्रष्टा भान हरपती ॥१॥ 

पुज्य ते पूजक पूजन स्वभाव । अंती ब्रह्म एव ब्रह्मामाजी ॥२॥ 

तेचि हे धारणा तर्क सर्व पूर्ण । विवेक ही खूण सहजस्थिति ॥३॥ 

निवृत्तिधारणा ब्रह्म सनातना । नित्य नारायणा चिंती सुखे ॥४॥


 

[१९]

 

गगनीच्या गगनी तेजपूर्ण धरणी । आपणचि तरणी जगा यया ॥१॥ 

ब्रह्म माजीवडे गोपाळ संगती । वेद वाखाणिती ज्याची महिमा ॥२॥ 

लोपती त्या तारा हारपे दिनमणी । तो खेळे चक्रपाणी गोपाळामाजी ॥३॥ 

निवृत्तिनिधान श्रीरंग खेळतु । गोपिकांसी मातु हळुहळु ॥४॥


 

[२०]

 

गगन घोटीत उठी पृथ्वी सगळी । दाटी आपणचि पाठी कूर्म जाला ॥१॥ 

कासवीतुषार अमृत सधर । भक्त पारावार तारियेले ॥२॥ 

उचलिती ढिसाळ सवे हा गोपाळ । तो यशोदेचा बाळ नंदाघरीं ॥३॥ 

निवृत्ति सादर हरिरूप श्रीधर । आपण चराचर विस्तारला ॥४॥


 

[२१]

 

निरालंबबीज प्रगटे सहज । तो गौळियांचे काज करी कृष्ण ॥१॥

हरि हा सावळा वेधिलिया बाळा । माजी त्या गोपाळा गायी चारी ॥२॥ 

वंदिती सुरवरगण ब्रह्मादिक शरण । तो यशोदेसी स्तन मागे हरि ॥३॥ 

निवृत्ति ध्यान मनाचे उन्मन । योगिया जीवन हरि माझा ॥४॥

 

[२२]

 

वैकुंठदैवत देवा मुगुटमणी । ऐकिजे पुराणी कीर्ति ज्याची ॥१॥ 

तो हरि बाळके गोपिका कौतुक । गोपाळ सकळिक सवंगडे ॥२॥ 

आदि शिवा जप जपतु अमुप । ते प्रत्यक्ष स्वरूप नंदाघरी ॥३॥ 

निवृत्तिसमाधि उगवली सकळिका । तारी तिन्ही लोका एका नामे ॥४॥


 

[२३]

 

ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इच्छे घडी । उच्छिष्टे काढी धर्माघरी ॥१॥ 

देखिला वो माये चक्रभूज स्वभावी । वारु ते वागवी अर्जुनाचे ॥२॥ 

याज्ञीक अर्पिती मंत्राच्या आहुती । द्रोपदियेप्रति भाजी मागे ॥३॥ 

निवृत्तिदैवत पूर्ण मनोरथ । पांडव कृतार्थ कृष्णनामे ॥४॥

 

[२४]

 

ब्रह्मादिक पूजा इच्छिती सहजा । तो गौळियांच्या काजा तिष्ठतुसे ॥१॥ 

देखिले सावळे पुजिती गोवळे । नंदाघरी खेळे स्वामी माझा ॥२॥ 

निवृत्तिदैवत पूर्ण मनोरथ । योगिये चिंतित हृदयी जया ॥३॥


 

[२५]

 

वेदबीज साचे संमत श्रुतीचे । गृह्य या शास्त्रांचे हरि माझा ॥१॥ 

तो हरि खेळतु प्रत्यक्ष मूर्तिमंतु । दुष्टा मुक्ति देतु जीवघाते ॥२॥ 

अर्जुना साहाकारी द्रौपदी कैवारी । तो विदुराचे घरी अन्न मागे ॥३॥ 

निवृत्तीचे धन गोकुळी श्रीकृष्ण । यादव सहिष्ण हरि माझा ॥४॥


 

[२६] 

 

देवां मुकुटमणी ऐकिजे पुराणी । तो हा चक्रपाणी नंदाघरीं ॥१॥ 

नंदनंदन हरि गौळणी गोरस । गोकुळी हृषीकेश खेळतुसे ॥२॥ 

हरि हा सुकुमार भौमासुर पैजा । वोळलासे द्विजा धर्माघरी ॥३॥ 

निवृत्ति रोकडे नाम फाडोवाडे । हरिरूप चहुंकडे दिसे आम्हा ॥४॥


 

[२७]

 

योगियांचे धन ते ब्रह्मसंपन्न । तो हा जनार्दन नंदाघरी ॥१॥ 

हरिरूप माये सर्वाघटी आहे । दूधलोणी खाये गौळियांचे ॥२॥ 

चिंती अजामेळ नाम आले मुखा । तो वैकुंठीच्या सुखा देतु हरि ॥३॥ 

निवृत्तीचे धन जगाचे जोवन । नाम नारायण तरणोपाव ॥४॥

 

 

[२८]

 

जेथूनि उद्गारु प्रसवे ॐकारु । तोचि हा श्रीधरु गोकुळी वसे ॥१॥ 

जनकु हा जगाचा जीवलगु साचा । तो हरि आमुचा नंदाघरी ॥२॥ 

न माये वैकुंठीं योगियांचे भेटी । पाहता ज्ञानदृष्टी नये हाता ॥३॥ 

निवृत्ति म्हणे देवो म्हणविताहे रावो । तो सुखानुभवो यादवांसी ॥४॥


 

[२९] 

 

नाही हा आकार नाही तो विकार । चतुर्भुजधर हरि माझा ॥१॥ 

हरिरूपजप हरिहररूप । गौळियांचे तप सहज कृष्ण ॥२॥ 

हरिरूप घरी सोळा सहस्र नारी । तो बाळ ब्रह्मचारी गायी राखे ॥३॥ 

निवृत्ति रोकडे ब्रह्मा माजिवडे । तो यशोदेचे पुढे लोणी मागे ॥४॥


 

[३०] 

 

नाही यासी गोत नाही यासी  कुळ । शेखी आचारशीळ कोण म्हणे ॥१॥ 

बाळरूपे हरि गोकुळी लोणी चोरी । त्या यशोदा पाचारी स्तन द्याया ॥२॥ 

सोवळा हरि वागवी सिदोरी । गोपाळांच्या करी काला देतु ॥३॥ 

निवृत्ति संपूर्ण कवळु देतु आण । ब्रम्ह सनातन गोकुळीचे ॥४॥


 

[३१]

 

न साहे दुजेपण आपण आत्मखूण । श्रुतीही संपूर्ण हारपती ॥१॥ 

वेदरूप श्रीकृष्ण योगियां जीवन । ते रूप परिपुर्ण आत्माराम ॥२॥ 

न दिसे वैकुंठी योगियां ध्यानबीज । तो गोपाळांचे काज करी हरि ॥३॥ 

निवृत्ति गयनी हरी उच्चारीत । माजी करी मनोरथ कामसिद्धि ॥४॥


 

[३२] 

 

हे व्यापूनि निराळा भोगि वैकुंठसोहळा । नंदाघरी गोवळा हरि माझा ॥१॥ 

न साहे सगुण अवघाचि निर्गुण । तो कृष्ण आपण गोपाळवेषे ॥२॥ 

गायी चारी हरि मोहरी खांद्यावरी । वेणु नानापरि वातु असे ॥३॥ 

निवृत्ति गयनीकृपा जपतो अमुप जाण । सांगितली खूण गोरक्षाने ॥४॥


 

[३३]

 

दिसे वरिवरि नाम अवघे वैकुंठधाम । जपतो शिव वर्म रामनामे ॥१॥ 

ते रूप समरस गोकुळी हृषीकेश । नंदाघरी गोपवेषे हरि खेळे ॥२॥ 

समाधिधनधाम वैकुंठ हरिसम । योगिया पूर्णकाम हृदयी सदा ॥३॥ 

निवृत्तीने कथिले गुरु गयनीप्रसादे । सकळ हा गोविंद आत्माराम ॥४॥


 

[३४]

 

सर्वस्वरूपे नाम सर्वघटी घनश्याम । तो गोकुळी आत्माराम दूध मागे ॥१॥ 

भाग्येविण दुभते दैव उभडते । नंदाघरी आवडते हरि खेळे ॥२॥ 

मंजुळ वेणुवाद्ये लुब्धल्या धेनुवा । नंदाघरी दोहवा पूर्ण वाहे ॥३॥ 

घरोघरी दुभते गौळियां परिपूर्ण । यशोदा ते आपण गोरस घुसळी ॥४॥ 

गो गोपाळ हरिखु नंदा यशोदा देख । गौळियां कौतुक करिती हरि ॥५॥ 

निवृत्ति गयनी देव उपदेशिला सर्व । गोरक्षीं गुह्यभाव सांगती मज ॥६॥


 

[३५]

 

गोकुळी वैकुंठ वसे गोपाळामाजी सौरसे । अभक्ता न दिसे काय करू ॥१॥ 

पूर्वपुण्य चोखडे ब्रह्मांडकोडे । ते यशोदेकडे शोभे कैसे ॥२॥ 

वसुदेव अमुप देवकीये समीप । वैकुंठीचे दीप लाडेकोडे ॥३॥ 

उग्रसेन संप्रधार केला राज्यधर । यादवपरिवार रामकृष्ण ॥ ४॥ 

द्वारकानाथ हरि सोळा सहस्र नारी । बळिराम परिवारी हरि माझा ॥५॥ 

निवृत्ति जीवन ध्यान एक रामकृष्ण | उच्चारणी कोटि यज्ञ होती नामे ॥६॥


 

[३६]

 

भाग्येविण नसे जना भाव वसे । तेथे सर्व दिसे हरि माझा ॥१॥ 

फळले अमूप कृष्णनामरूप । उच्चारिता खेप हरे जना ॥२॥

नंद ते यशोदा देवकी मुकुंदा । वसुदेव सदा भाग्यनिधी ॥३॥

निवृत्ति संपूर्ण गुरुमुखे खूण । भाग्येविण जाण नये मुखा ॥४॥


 

[३७]

 

रूप हे सावळें भोगिता डोळे । उद्धवा सोहळे अक्रूरासी ॥१॥ 

पद रज वंदी ध्यान हे गोविदी । उद्धवा मुकुंदी तल्लीनता ॥२॥ 

विदुर सुखाचा नाम जपे वाचा । श्रीकृष्ण तयाचा अंगीकारी ॥३॥ 

निवत्तीचे ध्यान ज्ञानदेव खूण । सोपान आपण नामपाठे ॥४॥


 

[३८]

 

वैकुंठ दुभते नंदाघरी माये । ते पुर्ण पान्हा ये यशोदेसी ॥१॥ 

ते रूप रूपस कासवी प्रकाश । योगिजनमानस निवताती ॥२॥ 

सुंदर सुनीळ राजस गोपाळ । भक्तीसी दयाळ एक्या नामे ॥३॥

निवृत्ति गयनी मन ते चरणी । अखंडता ध्यानी तल्लीनता ॥४॥

 

 

[३९]

 

ब्रह्मांड करी हरि ब्रह्म झाडा करी । ते नंदयशोदेघरी खेळतुसे ॥१॥ 

त्रेलोक्यदुर्लभ ब्रह्मादिका सुलभ । रुक्मिणीवल्लभ कृष्ण सावळा ॥२॥ 

हिरण्याक्ष वधूनि दाढे धरी मेदिनी । तो हा चक्रपाणि यशोदेचा ॥३॥ 

रामावतारु गाढा दशशिरार गडा। रिठासुर दाढा तेणे पाडे ॥४॥ 

चतुर्भूज श्रीपति सुकुमार साजती । शंखचक्रांकिती हरि माझा ॥५॥ 

निवृत्ति ध्यानशूर सर्वरूपे श्रीधर । जिंकिला भौमासुर रणयुद्धी ॥६॥


 

[४०]

 

कल्पनामासोळी भवजाळ जाळी । पाशाचिये जाळी गुंतताहे ॥१॥ 

मायाजाळ गोवी भवसिंधु दावी । मन हे माधवी गोवी जना ॥२॥ 

विषयाचे पोखणे पहा तेथे शून्य । झणी हे तू मन जाऊ देसी ॥३॥ 

निवृत्तिसाधन मन हे अनावर । गुरुचरणी थार बिढार धरी ॥४॥

[४१]

 

भवार्णव हेतु काय सांगू मातु । कल्पना हे तंतु छेदीयेला ॥१॥ 

नाही आम्हा ठावो नाही आम्हा ठावो । वासना संदेहो बुझालासे ॥२॥ 

नामाचे सुमन वाचे नारायण । जनीं जनार्दन ययाहेतु ॥३॥ 

निवृत्तिनिरोपण ब्रह्म हे साधन । गुरुकृपाखूण हिता आली ॥४॥


 

[४२] 

 

भवसागरसार तरणोपाव सोपा । कृष्णनाम खेपा हरिती जना ॥१॥ 

रामकृष्णमंत्र जनासी उद्धार । आणिक साचार मार्ग नाही ॥२॥ 

निष्काम कल्पना आधी साधी मना । ऐक्यसमीरणा हेचि करी ॥३॥ 

निवृत्तिधारणा गुरुचरणखुणा । ब्रह्मांड या खुणा गुरुकृपा ॥४॥


 

[४३]

 

प्रकृतीचा पैठा कल्पनामाजिठा । नपवे तो वैकुंठा कर्मजाड्य ॥१॥ 

आहिसेचें स्वरूप हेचि हरिरूप । न म्हणे हरि आप सर्व आहे ॥२॥ 

नाही त्यासी जय नुद्धरे सर्वथा । हरिविण व्यथा कोण वारी ॥३॥

निवृत्ति म्हणे धरी गुरुचरणसोये । तेणे मार्गे पाहे हरि सोपा ॥४॥


 

[४४]

 

जेथे पाहे तेथे व्यापिले अनंते । तयाविण रिते कोण ठाय ॥१॥

गगनेवीण ठावो नाही जैसा रिता । तैसा या अच्युताविणे काही ॥२॥ 

तेथे माझ्या चित्ता करी रहिवासु । न नकरी उदासु ऐसियाते ॥३॥ 

निवृत्तीने मन ठेविले चरणी । नामाची निशाणी अखंडित ॥४॥


 

[४५]

 

कासवीची पिली करुणा जरी भाकी । परी सापडली निकी चरणसोय ॥१॥

कामधेनु घरी हरि माझा गोपाळ । मज काळवेळ नाठवे तैसी ॥२॥ 

चातकाची चिंता जरी नपवे जीवन । तरीच शोके प्राण तृषाहेतु ॥३॥ 

निवृत्ति स्वानंदु कामधेनु गुरु । नामाचा उच्चारु तेणे छंदे ॥४॥

 

 

[४६]

 

करुणाकल्लोळणी अमृताची खोटी । भरलीसे सृष्टि हरिच्या नामे ॥१॥ 

सवे हरि आत्मा वेद बोले सीमा । हरि परब्रह्म रामकृष्ण ॥२॥ 

हरिविण ठावो न दिसे सर्वत्र । हरिविण परत्र नाही नाही ॥३॥ 

निवृत्तीचे घर गयनी साचार । त्यामाजी उच्चार हरि आम्हा ॥४॥


 

[४७]

 

शून्य साकार घटी जीवशिव काष्टी । मीपणासी तुटी एक्या नामे ॥१॥ 

ते हे नाम सोपे रामकृष्णमाळा । यासी काळवेळा नाही नाही ॥ २॥ 

शून्य हे ही ठाय जीव जाये जिवी । मन हे माधवी हरपत ॥ ३॥ 

निवृत्ति निमग्न शून्याकार घट । गुरुनामे मठ तेथे केला ॥४॥


 

[४८]

 

अनंत ब्रम्हांडे अनंत रचना । शून्य हे वासना तेथे जाली ॥१॥ 

मन गेले शून्यी ध्यान ते उन्मनी । चित्त नारायणी दृढ माझे ॥२॥ 

तेथे नाही ठावो वेदांसी आश्रयो । लोपले चंद्र सूर्य नाही सृष्टी ॥३॥ 

निवृत्ति म्हणे तो ठाव मज पैठा । नेतसे वैकुंठा गुरु माझा ॥४॥


 

[४९]

 

शून्य ते पूशिले निरशून्य निंबले । ब्रम्ह उगवले तेजाकार ॥१॥ 

काळासी करिते वासना आकळीते । दिनकाळ हरीते सेवीतसे ॥२॥ 

माजिटा श्रीहरि दिसे परोपरी । घटमठसरी एकु शोभे ॥३॥

निवृत्ति दाटुगे गुरुमुखे कळले । सर्वत्र गोपाळे केले मज ॥४॥


 

[५०]

 

ध्यान ना उन्मनी दृढ ना बंधन । सर्वीं सर्वपूर्ण हरि एकु ॥१॥ 

वेदाचा वेदकु शास्त्रांचा विवेकु । श्रुती परलोकु हरि माझा ॥२॥ 

उगवले क्षेत्र पिकते घोळत । तैसे हे अनंत रूप दिसे ॥३॥

निवृत्ति चोखाळ गयनीप्रसाद । श्रीरंग गोविंद दिधला मज ॥४॥

[५१]

 

पूर्वीलिये क्षेत्री पूर्वज पुरता । तरिच अरुता हरि दिसे ॥१॥ 

सर्व भावी नाम वोळले सर्वदा । अखंड गोविदा गाऊ गीतीं ॥२॥ 

शामतनु हरि प्रभा दिसे भानु । तो माझा जीवनु हरि आत्मा ॥३॥ 

निवृत्ति आवडे सद्गुरु गयनी । चित्त नारायणी तल्लीनता ॥४॥


 

[५२]

 

पीतांबर दीपडे दीपकळिका शाम । शिव आत्माराम प्रेमतनु ॥१॥ 

ब्रम्हांड धवळले दिसे दशदिशा । ब्रम्हचि सहसा ब्रम्हपणे ॥२॥ 

न दिसे भानमान दृश्याचा अनुमान । आपणचि पूर्ण तदाकार ॥३॥ 

निवृत्ति निर्विकार मनोमय सार । सर्व हा आचार ब्रम्हरूप ॥४॥


 

[५३]

 

गगनग्रास घोटी ब्रम्हांड हे पोटी । चैतन्याची सृष्टि आपण हरि ॥१॥ 

देखिला गे माये सुंदर जगजेठी । नंदयशोदे दृष्टी ब्रम्ह खेळे ॥२॥ 

आकाश सौरस तत्त्व समरस । तो हा हृषीकेश गोपीसंगे ॥३॥ 

निवृत्तिसाधन निरालंबी ध्यान । तोचि हा श्रीकृष्ण घ्यान माझे ॥४॥


 

[५४]

 

चतुराननघन अनंत उपजती । देवोदेवी किती तयांमाजी ॥१॥ 

तेचि हे सावळे अंकुरले ब्रम्ह । गोपसंगे सम वर्ते रया ॥२॥ 

निगम नाठवे वेदाचा द्योतकु । तो चतुर्भुज देख नंदाघरी ॥३॥

निवृत्ति म्हणे शंखचक्रांकित मूर्ति । आपण श्रीपति क्रीडतसे ॥४॥


 

[५५]

 

चिंतिता साधक मनासी नाकळे । तो पिकांसी आकळे करिता ध्यान ॥१॥ 

देखिला गे माये सगुण गुणनिधी । यशोदा गोविंदी प्रेमपान्हा ॥२॥ 

न माये सर्वांघटी आपणचि सृष्टी । तो यमुनेच्या तटी गायी चारी ॥३॥ 

निवृत्तिसाधन कृष्णाचे रूपडे । ब्रम्हांडा एवढे तदाकार ॥४॥


 

[५६]

 

निजलक्षाचे लक्ष हरपले भान । दिनमान शून्य जयारूपी ॥१॥ 

ते ब्रम्ह गोजिरे गोपाळसंगती । संवगडे सांगाती भाग्यवंत ॥२॥ 

वेणुवाद्यध्वनि यमुनाजळ स्थिर । ध्यानाचा प्रकार कृष्णनामी ॥३॥ 

निवृत्ति म्हणे ते स्वरूपसौख्य रूपडे । पाहाती चहूकडे योगीजन ॥४॥


 

[५७]

 

अनंतरूप देव अनंत आपण । अंतर्बाह्य खूण योगियासी ॥१॥ 

तो हा हरि माये गोकुळी अवतार । गोपीसंगे श्रीधर खेळतुसे ॥२॥ 

शास्त्रांसी नाकळे श्रुति ती बरळे । ते गोपवेषे खेळे गोपाळांमाजी ॥३॥ 

निवृत्तीचे सार गयनीविचार । ब्रम्ह चराचर माजी वसे ॥४॥


 

[५८]

 

ज्या रूपाकारणे देव वोळंगणें । योगी गुरुखुणे सेविताती ॥१॥ 

ते रूप गोकुळी गोपाळांचे मेळी । अखंड समेळी खेळतुसे ॥२॥ 

ब्रम्हांड कडोविकडी ब्रम्हांडघडी । या योगपरवडी हरपती ॥३॥ 

निवृत्तीचे धन ब्रम्ह हे रोकडे । गौळणी त्या पुढे खेळविती ॥४॥


 

[५९] 

 

जेथे नरिघे ठाव लक्षिता लक्षण । सुर्यतारांगण हरपती ॥१॥ 

ते रूप रूपस कृष्णब्रम्हनाम । गौळियां सप्रेम वोळलेसे ॥२॥

जेथे लयलक्ष हरपो नसोये । द्वैत ते न साहे सोहंबुद्धि ॥३॥ 

निवृत्ति मान्यता सेवितु साकार । आपण तदाकार गोपवेषे ॥४॥ 


 

[६०]

 

मीपणे सगळा वेदु हरपला । शास्त्रांचा खुंटला अनुवाद ॥१॥ 

ते रूप सुंदर कृष्णनाम सोपार । निरालंब गोचर गोकुळीचे ॥२॥ 

सेविता योगियां सुलभ दुर्गम । गौळियां सुगम नाम घेता ॥३॥ 

निवृत्तिनिकट कृष्णनामसार । पापाचा संचार नामछेदे ॥४॥


 

[६१]

 

ध्यानाची धारणा उन्मनीचे बीज । लक्षिता सहज नये हाता ॥१॥ 

ते हे कृष्णनाम सखे नंदाघरी । गौळिया माझारी ब्रम्ह खेळे ॥२॥ 

न दिसे पाहता शेषांदिका गति । यशोदे श्रीपति बाळ जाला ॥३॥ 

गुंतलो मायाजाळी अनंतरचने । तो चतुरानना खुणे न संपडे ॥४॥ 

नकळे हा निर्धारु तो देवकी हो देवी । शेखी तो अनुभवीं भुलविला ॥५॥ 

निवृत्तिरचना कृष्णनामे सार । नंदाचे बिढार ब्रम्ह जाले ॥६॥


 

[६२]

 

हा पुरुष की नारी नव्हे तो रूपस । शेखी जगदीश जगद्रूपे ॥१॥ 

ते हे कृष्णरूप यशोदेकडीये । नंदाघरी होये बाळरूप ॥२॥ 

ज्याते नेणे वेद नेणती त्या श्रुती । त्या गोपिका भोगिती कामरूपे ॥३॥ 

निवृत्तीचे ब्रम्ह कृष्णनामे खेळे । असंख्य गोवळे ब्रह्मरूप ॥४॥


 

[६३]

 

जेथे नाही वेदु नाही पै शाखा । द्वैताचा हा लेखा हारपल ॥१॥ 

ते रूप वोळले नंदायशोदेसार । वसुदेवबिढार भाग्ययोगे ॥२॥ 

न मायेपुरता ब्रम्हांड उभवणी । त्यालागी गौळणी खेळविती ॥३॥ 

निवृत्ति ब्रम्हरस सेवितुसे सोपे । नामे पुण्यपापे हारपती ॥४॥


 

[६४]

 

आगमनिगम बोलत वैखरी । तो यशोदेच्या करी धरुनि चाले ॥१॥ 

न संपडे शिवा बैसताचि ध्यानी । जालिया उन्मनी दृश्य नव्हे ॥२॥ 

कमलासनी ब्रम्हा ध्यानस्थ बैसला । पाहता पाहता मुळा न संपडे ॥३॥

निवृत्ति गयनी सांगतुसे खुणा । तो देवकीचा तान्हा बाळ जाला ॥४॥


 

[६५]

 

अष्टांगसाधने साधिती पवन । ज्यासि योगीजन शिणताती ॥१॥ 

तो हा कृष्ण गोपीगोपाळांमाझारी । क्रीडा नानापरी करी आत्मा ॥२॥ 

अठरा साहीजणे बोलती परवडी । तो माखणासी जोडी स्वये कर ॥३॥ 

निवृत्तीचे ध्येय कृष्ण हाचि होय । गयनीनाथे सोय दाखविली ॥४॥


 

[६६]

 

म्हणवितो नंदाचा बाळ यशोदेचा । आपण चौवाचातीत कृष्ण ॥१॥ 

शब्दांसी नातुडे बुद्धीसी सांकडे । तो सप्रेमे आतुडे स्मरता नाम ॥२॥ 

उपचाराच्या कोटी न पाहे परवडी । तो प्रेमळाची घोडी धोई अंगे ॥३॥ 

निवृत्तीचे तप फळले अमुप । गयनीराजे दीप उजळिला ॥४॥


 

[६७]

 

अंधारिये राती उगवे हा गभस्ति । मालवेना दीप्ति गुरुकृपा ॥१॥ 

तो हा कृष्ण हरि गोकुळामाझारी । हाचि चराचरी प्रकाशला ॥२॥ 

आदिमध्यअंत तिन्ही जाली शून्य । तो कृष्ण निधान गोपवेशे ॥३॥ 

निवृत्तिनिकट कृष्णनामपाठ । आवडी वैकुंठ वसिन्नले ॥४॥


 

[६८]

 

न जाणू त्या कळाकुसरी गोपाळा । नाम हे मंगळ अच्युताचे ॥१॥ 

हेचि मज द्यावे सप्रेम आपुले । ध्यातुसे पाउले एवढ्यासाठी ॥२॥ 

न मागे नेघे काही याविण आणिक । सप्रेमाची भूक तृष्णा करी ॥३॥ 

समर्थाचे घरी काही नाही उणे । अखंड प्रेम देणे कृष्णनामी ॥४॥ 

इतुकेचि दातारा पुरवि माझे कोड । याविण काबाड भार नेघे ॥५॥ 

निवृत्ति सप्रेम संजीवनी मूळ । स्मरता काळ वेळ नाही नामी ॥६॥


 

[६९]

 

परंपरा भक्त उद्धरिले प्रेमे । सांडिले दुर्गम सांसारिक ॥१॥ 

नसते भवभय होते जे मानसी । स्मरता नाम त्यासी नाही केले ॥२॥ 

पाहता तुझे नामरूप दृश्य नोहे । तो भक्‍तालागी होय कृष्णठसा ॥३॥ 

निवृत्तीचे नाम रूप निराकार । कृष्ण हा साचार गयनीकृपा ॥४॥


 

[७०] 

 

आदिनाथ उमा बीज प्रकटिले । मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती ॥१॥ 

तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली । पुर्ण कृपा केली गयनीनाथा ॥२॥ 

वैराग्ये तापला सप्रेमे निवाला । ठेवा जो लाधला शांतिसुख ॥३॥ 

निर्द्वंद्व निःशंक विचरता महीं । सुखानंद हृदयी स्थिर जाला ॥४॥ 

विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख । देऊनि सम्यक अनन्यता ॥५॥ 

निवृत्ति गयनी कृपा केली पूर्ण । कूळ हे पावन कृष्णनामे ॥६॥


 

[७१] 

 

आकारी दिसे निराकारी वसे । तोचि हृदयी दिसे अगा रया॥१॥ 

नाही तो आहे न दिसे ना पाहे । अवघा होऊनि राहे तन्मयता ॥२॥ 

स्वरूप उखर नमो मनसार । एकतत्त्वनिर्धार हरि नांदे ॥३॥ 

निवृत्तीची खूण अवघेचि होणे । एका नारायणे भरले दिसे ॥४॥


 

[७२]

 

विश्वी विश्‍वपति असे लक्ष्मीनाथ । आपणचि समर्थ सर्वारूपी ॥१७ 

ते रूप गोकुळी नंदाचिये कुळी । यशोदेजवळी बाळकृष्ण ॥२॥ 

सर्वघटी नांदे एकरूपसत्ता । आपणचि तत्वता सर्वांरूपी ॥३॥ 

निवृत्तीचे पार कृष्णचि पै सार । गोकुळी अवतार नंदाघरीं ॥४॥


 

[७३]

 

एकरूप दिसे भेदरूपे भासे । ज्ञानियासी कैसे एकतत्व ॥१॥ 

तत्वता श्रीहरि एक असे सर्व । सांडूनि देहभाव पूर्ण पाहा ॥२॥ 

देवेविण कोठे रिते नाही सर्वथा । संपुर्ण परता हरि आहे ॥३॥ 

निवृत्तीची खूण एकतत्वरूपे । पाहता हे सोपे गुरुखुणे ॥४॥


 

[७४]

 

देहाच्या दीपकी एकी वस्तु चोख । असोनिया शोक का करितोसी ॥१॥ 

देहभरि आत्मा नांदे निरंतर । असता हा विचार का धावतोसी ॥२॥ 

तुझे तू पाही आहे ते घेई । एकरूप होई गुरुखुणे ॥३॥ 

निवृत्तीचे सार हरिरूप सदा । नित्य परमानंदा रातलासे ॥४॥


 

[७५]

 

नेणो पै द्वैत अवघेचि अद्वैत । एकरूप मात करू आम्ही ॥१॥ 

अवघाचि श्रीहरि नांदे घरोघरी । दिसे चराचरी ऐसे करा ॥२॥ 

सेवावे चरण गुरुमूर्तिध्यान । नयनी संपन्न ब्रम्हरसे ॥३॥ 

निवृत्ति चोखडा ब्रम्हरसु उघडा । गुरुकृपे निवाडा निवडिला ॥४॥


 

[७६]

 

समता धरा आधी टाका द्वैतबुद्धि । आपे आप शुद्धि गोविंदी रया ॥१॥ 

सम नांदे हरि विषम अघोरी । निवत्ति चराचरी सांगतुसे ॥२॥ 

सम शेजबाज सम सम केशीराज । सम तृष्टे भोज आत्मराज ॥३॥

निवृत्तीचे धन अखंड परिपूर्ण । आपणचि नारायण तुष्टे सदा ॥४॥


 

[७७]

 

राम राम जप समत्वे साधावा । अहंकार टाकावा अहंबुद्धि ॥१॥ 

सुटसी रे नामे आपे आप संभ्रमे । नित्य नाम नेमे जपतु जावे ॥२॥ 

देवेविण नाही सर्व शास्त्र बोले । हरिरूपी बोधले तेचि धन्य ॥३॥ 

सुखावरी सुख निःसंग रे आचरे । केशव निर्धारे तुष्टे सदा ॥४॥ 

निवृत्ति म्हणे पुण्य होईल अगाध । एकनामे गोविंद तुष्टे सदा ॥५॥


 

[७८]

 

दुभिले द्विजकुळी आले पै गोकुळी । नंदयशोदे जवळी बाळकृष्ण ॥१॥ 

खेळे लाडेकोडे गौळणी चहूकडे । नंदाचे केवढे भाग्य जाणा ॥२॥ 

ज्या रूपे वेधले ब्रम्हांड निर्मळे । तेचि हे आकारले कृष्णरूपे ॥३॥ 

निवृत्ति दिवटा कृष्णाचिया वाटा । नामेचि वैकुंठा पावन होती ॥४॥


 

[७९]

 

देही देव आहे हे बोलती वेद । परि वासनेचे भेद न दवडिती ॥१॥ 

वसना पै चोख तेथेचि वैकुंठ । भावोचि प्रगट होय जना ॥२॥ 

न लगती सायास करणे उपवास । नाममात्र पाश तुटे जना ॥३॥ 

निवृत्ति पाहातु देहामाजी प्रांतु । देवोचि दिसतु सर्वां घटीं ॥४॥

 

 

[८०]

 

जाणिवेचेनि पैसे वासना हे हिंडे । आनान ब्रम्हांडे शोधिताहे ॥१॥ 

तैसे नको जना निरंतर वासना । वैकुंठभजना करिजो रया ॥२॥ 

जाणीव नेणीव अवघा श्रीअनंत । नेणोनि उचित हरि भजे ॥३॥ 

निवृत्तीचे तट भजन अविनाश । भजनेचि पाश तुटे रया ॥४॥


 

[८१]

 

एकतत्त्व हरि अवघी सृष्टी त्याची । वासना मोहाची जाली असे ॥१॥ 

तत्व ते श्रीहरि अद्वैत कुसरी । ब्रम्हांडवोवरी क्षरलासे ॥२॥ 

त्रिपुटी त्रिगुण सत्वरजसार । नामेचि वेव्हार तुटे रया ॥३॥ 

निवृत्ति समता हरिप्रेमगुण । कृष्ण हेचि ध्यान मनामाजी ॥४॥


 

[८२]

 

शांतीचे भजन क्षमेचा कळवळा । गोपाळ सकळा देही नांदे ॥१॥ 

आचार पवित्र नामचि पै पात्र । साठविले शास्त्र दो अक्षरी ॥२॥ 

रूपाचे सगुण निर्गुण दाटले । नामेचि आटले मोहजाळ ॥३॥ 

निवृत्ति पडळ उडाले पै भान । गयनीने ज्ञान उपदेशिले ॥४॥


 

[८३]

 

भेदूनि ब्रह्मांड आणियेली कळा । नित्यता सोहळा हरिप्रेमे ॥१॥ 

हरि धरा चित्ती मन मारा मुक्‍ती । प्रपंचसमाप्ति हटेपाटे ॥२॥ 

विश्रांतीसी स्थान आसनी शयनी । हरिध्यानपर्वणी पुरे आम्हा ॥३॥ 

निवृत्तिसागर हरिरूप नित्य । सेविला तो सत्य दो अक्षरी ॥४॥


 

[८४]

 

दीपाची कळिका दीपी कीं सामावे । तैसा जीवशिव वोळखीजो जी ॥१॥ 

दीप आहे देही तयाचे हे प्रकाश । त्याचेनि सावकाश हरि भजे रया ॥२॥ 

न मिळे आयुष्य न मिळे घटिका । देह क्षण एका जाईल रया ॥३॥ 

निवृत्तीचा दीप दीपचि ये मुसे । आटोनी सौरसे एक जाला ॥४॥


 

[८५]

 

कळिकेसी ज्योति सामावली तेजी । तैसा हरि हा सहजी सर्वगतु ॥१॥ 

सर्वत्र भजन हरि हेचि खूण । हरि हा प्रमाण दो अक्षरी ॥२॥ 

नित्यमुक्‍त एक आत्मतत्व दीप। हरि हा संकल्प करिजेसु ॥३॥ 

निवृत्ति सर्वदा हरिभजन दाट । नित्यता वैकुंठ अखंडित ॥४॥


 

[८६]

 

अनुभवाच्या गावी ज्ञान हेचि फळ । विज्ञान केवळ वृक्ष तया ॥१॥ 

साधनीं स्वानुभव अनुभवीं अनुभव । ब्रम्हाची राणीव आम्हा घरी ॥२॥ 

रिकामा बरळु नसे खेळे मेळे । ब्रम्हचि कल्लोळे भोगीतुसे ॥३॥ 

निवृत्ति सरळ निरसले अज्ञान । सर्वत्र संपन्न आत्माराम ॥४॥


 

[८७]

 

गगनघास घोटी सर्व ब्रम्हांडे पोटी । निमूनिया शेवटी निरालंबी ॥१॥ 

ते ब्रम्ह सावळे माजी लाडेकोडे । यशोदेमायेपुढे खेळतसे ॥२॥ 

ब्रम्हांडाच्या कोटी तरंगता उठी । आप आपासाठी होत जात ॥३॥ 

निवृत्तीचे ध्यान यशोदेचे धन । वासुदेव खूण आम्हामाजी ॥४॥

   

 

[८८[

 

प्रकृतीचेनि घाये घायवट नव्हे । आत्मारामसोये आत्मकळिके ॥१॥ 

कळिका उन्मनी गोल्हाट कवळी । सत्रावीचे जवळी आत्मा स्वामी ॥२॥ 

हे खूण घेई सोपानाजवळी । मनाची काजळी उरो नेदी ॥३॥ 

निवृत्ति म्हणे ज्ञान सोपान सांग । विकल्पाचा पांग नाही नाही ॥४॥


 

[८९]

 

क्षमा सम नेम हाचि परिपुर्ण । राम होई तू निष्काम निःसंदेह ॥१॥ 

तूचि रे साचार होसील पूर्णता । निर्गुणी समता नाही जैशी ॥२॥ 

व्योमामाजी अभ्र जातसे सरळ । त्यासी अळुमाळ दृश्य नव्हे ॥३॥ 

निवृत्ति म्हणे नव्हे हे तैसे चोख । अंतरबाह्य वेष आत्मरूपे ॥४॥


 

[९०]

 

रामनाम मुखी तो एक संसार । येऱ्हवी अघोर नरक रया ॥१॥ 

संसारनरक रामनामसार । तरले पामर पतित देखा ॥२॥

अजामिळ नामे तरला पतित । नारायण त्वरित आले तेथे ॥३॥

हरिनाम हेचि शास्त्र पै जयाचे । तयासी यमाचे भय नाही ॥४॥

उघडा मोक्षमार्ग गोविंदस्मरणे । रामनामकीर्तने मोक्षपद ॥५॥

निवृत्तिसंचित रामनाम महिमा । अवघीच पोर्णिमा हरिपाठे ॥६॥


 

[९१]

 

सोपान सवंगडा स्वानंद ज्ञानदेव । मुक्‍ताईचा भाव विठ्ठलराज ॥१॥ 

दिंडी टाळ घोळ गाती विठ्ठलनाम । खेचरासी प्रेम विठ्ठलाचे ॥२॥ 

नरहरि विठा नारा ते गोणाई। प्रेमभरीत डोही वोसंडती ॥३॥ 

निवृत्ति प्रगट ज्ञानदेवा सांगे । पुंडलीकासंगे हरि खेळे॥४॥


 

[९२]

 

काला तव निकटी श्रीरंग जाले । भक्तांचे सोहळे पुरविले ॥१॥ 

वेणुनादी काला एकत्र पै जाला । दहीभात झेला झेलीतु देव ॥२॥ 

तोचि कवळु घेतु नामयासी देतु । ज्ञानासी भरीतु पूर्णदोषे ॥३॥ 

निवृत्ति सोपान कालवले कालीं । खेचरासी धाली ताहानभूक ॥४॥


 

[९३]

 

वैष्णवांचा मेळ सकळ मिळाला । विठ्ठलनाम काला पंढरीसी ॥१॥ 

हरिनाम विनट हरि उच्चारीत । सप्रेम डुलत भक्‍तजन ॥२॥ 

चालिला सोपान ज्ञानदेव निधी । मुक्‍ताई गोविंदी तल्लीनता ॥३॥ 

निवृत्ति खेचर परसा भागवत । आनंदे डुलत सनकादिक ॥४॥


 

[९४]

 

चांगया लाधले नामया फळले । दिधले विठ्ठले हरिकृपा ॥१॥ 

प्रेमाचे पुतळे भीमातीरा आले । जयजयकार केले हरिभक्तीं ॥२॥ 

वैकुंठ आपण भक्तामाजी खेळे । पुंडलीकलीळे खेळतुसे ॥३॥ 

निवृत्ति निवाला आनंदे नाचतु । उन्मनी भरितु ज्ञानदेव ॥४॥


 

[९५]

 

आनंद सर्वांचा काला अरुवार । नामया साचार फुंदतुसे ॥१॥ 

राहीरखुमाई सत्यभामा माता । आलिया त्वरिता काल्यामाजी ॥२॥ 

उचलिला नामा प्रेमाचे स्फुंदन । नुघडी तो नयन काही केल्या ॥३॥ 

बुझावीत राही रखुमादेवी बाही । पितांबर साई करिती हरि ॥४॥ 

ज्ञानासी कवळु सोपानासी वरु। खेचरा अरुवारु कवळु देतु ॥५॥ 

निवृत्ति पूर्णिमा भक्‍तीचा महिमा । नामयासी सीमा भीमातीरी ॥६॥


 

[९६]

 

तव आनंदला हरि पूर्ण लोटला । मुक्‍ताई लाधला प्रेमकवळु ॥१॥ 

चांगयाचे मुखी घालीत कवळु । आपण गोपाळु दयासिंधु ॥२॥ 

दिधले ते घेई पूर्ण ते होई । सप्रेमाचे डोही संतजग ॥३॥ 

नामया विठया नारया लाधले । गोणाई फावले अखंडित ॥४॥ 

राही रखुमाई कुरवंडी करिती । जिवे वोवाळिती नामयासी ॥५॥ 

निवृत्ति खेचर ज्ञानदेव हरि । सोपान झडकरी बोलाविला ॥६॥


 

[९७]

 

आपलेनि हाते कवळु समर्पी । ब्रम्हार्पण मुखी ब्रम्हपणे ॥१॥ 

सोपान सावता निवृत्तिनिधान । यासि जनार्दन कवळ देतु ॥२॥ 

ब्रम्हपद हरि ब्रम्ह अभ्यंतरी । सर्वत्र श्रीहरि दिसे तयां ॥३॥ 

देऊनि हस्तक पुशी पीतांबरे । पुसतसे आदरे काय आवडे ॥४॥ 

राही रखुमाई कांसवीतुषार । अमृतपाझर सर्वांघटी ॥५॥ 

निवृत्ति खेचर सोपान सावता । हरि कवळु देता तृप्त जाले ॥६॥


 

[९८]

 

गोपाळ सवंगडे आले वाडे कोडे । असंख्य बागडे हरिरूपी ॥१॥ 

बिंबली पंढरी हरिरूपी सार । अवघा श्रृंगार विठुलराजु ॥२॥ 

कालया कौशल्य नामदेव जाणे । तेथिलीये खुणे निवृत्तिराजु ॥३॥ 

ज्ञानदेव सोपान जगमित्र नागा । नरहरि वेगा झेलिताती ॥४॥ 

वैकुंठ सावळे माजी भक्‍तमेळे । काला एक्या काळे करिताती ॥५॥ 

निवृत्ति संपुर्णता घेऊनि उद्गारू । सेविला उदारू हरिराणा ॥६॥


 

[९९]

 

पांडुरंग हरि माजी भक्‍तजन । कैसे वृंदावन शोभतुसे ॥१॥

ब्रम्हादिक ठेले विमाने अंबरी । काला तो गजरी पंढरीये ॥२॥

सनकादिक देव देहुडा पाऊली । गोपाळ वाकुली दाविताती ॥३॥

पुंडलीक नाचे देवमुनी सर्व । भीमातीरी देव प्रगटले ॥४॥ 

ज्ञानदेव सोपान विसोबा खेचर । नरहरि सोनार नाचताती ॥५॥ 

निवृत्ति मुक्‍ताई चांगदेव गाढा । हरीचा पवाडा झेलिताती ॥६॥


 

[१००]

 

न साधे योगीं न संपडे जगी । ते नंदाच्या उत्संगी खेळे रूप ॥१॥ 

कृष्ण माझा हरि खेळतो गोकुळी । गोपिकां सकळी वेढियेला ॥२॥

गायींचे कळप गोपाळ अमूप । खेळतसे दीप वैकुंठीचा ॥३॥ 

निवृत्ति दीपडे वैकुंठ सांवडे । यशोदामाये कोडे चुंबन देत ॥४॥

 

© 2025 Sitaram Mhatre Foundation

Call us:

+91-865-735-1636

Find us: 

Sitaram Smaran, House no. 896,

Sector 19B, Koparkhairane,

Navi Mumbai

  • Pinterest
  • Twitter
  • LinkedIn
  • Facebook
  • YouTube

Website developed & maintained by:

Mhatre's Traslation & Allied Services

Sitaram Mhatre Foundation

Our Programmes:

English for ALL

Science for ALL

Computers for ALL

Memoirs of the PAP

Bhakti Literature in Unicode

bottom of page