top of page

Bhakti Literature in Unicode Project

Sant Namdev Gatha: Abhang 1401-1500

Coordinator-Editor: Chandrakant Mhatre

Unicodification: Kajol Mhatre

***PART OF THE PROJECT SHABDAAGAR EBOOK SANT NAMDEV GATHA***

संत नामदेव गाथा

[ १४०१ ]

 

इलुसाची प्रपंच परि हा लटिका । तेणे तुज व्यापका झाकियेले ।।१।।

ऐसियाचा मज घालोनिया खेवा । स्वामिद्रोहि देवा करिसी मज ।।२।।

मेरुचिया गळा बांधोनि मशक । पाहसि कौतुक अनाथनाथा ।।३।।

नामा  म्हणे देवा कळली तुझी माव । माझा मी उपाव करीन आता ।।४।।


 

[१४०२]

 

श्रीहरि श्रीहरि ऐसे वाचे म्हणेन । वाचा धरिसी तरी श्रवणें ऐकेन ।।१।।

श्रवणीं दाटसी तरी मी नयनीं पाहिन । ध्यानी मी ध्याईन जेथे तेथे ।।२।।

जेथे जाये तेथे लागलासी आम्हा । न संडी म्हणे नामा वर्म तुझे ।।३।।


 

[१४०३]

 

आम्हा सापडले वर्म । करू भागवतधर्म ।।१।।

अवतार हा भेटला । बोलू चालू हा विसरला  ।।२।।

अरे हा भावाचा लंपट । सांडूनि आलासे वैकुंठ ।।३।।

संतसंगती साधावा । धरूनि हृदयी बांधावा ।।४।।

नामा म्हणे केउता जाय । आमुचा गळा त्याचे पाय ।।५।।


 

[१४०४]

 

काय गुणदोष आणितोसी मना । नका नको नारायणा अभक्तची ।।१।।

शरीरसंबंधा सुचती अंतरे । काय म्या पामरे आवरावे ।।२।।

नामा म्हणे मज नागविसी दातारा । नको बा अंतरा पाहो अंत ।।३।।


 

[१४०५]

 

काय गुण दोष माझे विचारिसी । आहे मी तो राशी अपराधांची ।।१।।

अंगुष्ठापासोनी मस्तकापर्यंत । अखंड दुश्चित आचरलो ।।२।।

स्वप्नीं देवा तुझी नाही घडली भक्ति । पुससी विरक्ति कोठोनिया ।।३।।

तूची माझा गुरू तूची तारी स्वामी । सकळ अंतर्यामी गाऊ तुज ।।४।।

नामा म्हणे माझे चुकवी जन्ममरण । नको करू शीण पांडुरंगा ।।५।।


 

[१४०६]

 

चोर ओढोनिया नेईजे जै शुळी । चालता पाउली मृत्यु जैसा ।।१।।

तैसी परी मज जाली नारायणा । दिवसेदिवस उणा होत असे ।।२।।

वृक्षाचिये मुळी घालिता कृऱ्हाडी । वेचे तैसी घडी आयुष्याची ।।३।।

नामा म्हणे हेही लहरींचे जळ । आटत सकळ भानुतेजे ।।४।।

 

[१४०७]


 

संसारीच्या आह्या आहाळलो भारी । निववी गा श्रीहरि अमृतदृष्टी ।।१।।

मी अनाथ अपराधी दुर्बळ दुराचारी । कृपाळू बा हरी तारी मज ।।२।।

नामा म्हणे विठो कृपेचा कोवळा । जाणसी कळवळा अनाथनाथा ।।३।।


 

[१४०८]

 

सांडोनि संसार जालो मी अंकित । ऐशियाचा अंत पाहू नको ।।१।।

पातकी मी सत्य पातकी मी सत्य । पातकी मी सत्य पांडुरंगा ।।२।।

माझे गुणदोष न धरिसी चित्ती । थोरपण ख्याति दावी आम्हा ।।३।।

ऐसा अपराध आणू नको मना । पंढरीच्या राणा म्हणे नामा ।।४।।

 

[१४०९]

 

देशी परदेशी जालों तुजविण । माझे समाधान कोण करी ।।१।।

चातक चकोरापरी पाहे वास । तू का गे उदास पांडुरंगे ।।२।।

नामा म्हणे चित्त देई माझ्या बोला । जीउ हा उरला तो निघो पाहे ।।३।।


 

[१४१०]

 

वत्साकारणे मोहाळु गाये । अनुसरलेया पान्हा ये ।।१।।

तैसे तुझे वासरू बांधलो मी असे । मज लावे कांसे आपुलिया ।।२।।

मज बांधले त्वा संसारखुंटी । माझी माउली दूर वैकुंठी ।।३।।

थोरू करी मना लाहो । तव आणिके नेती पान्हावो ।।४।।

धीरू नव्हे याचि परि । नामा विनवितसे मुरारी ।।५।।

[१४११]

 

आपुले रूपी मज लपवी निरंतरी । समाये भीतरी आड राहे ।।१।।

परि तुज मज असावा संवादु । भ्रांति मायाबाधु काय करी ।।२।।

काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर । हे वैरी अपार मारी माझे ।।३।।

नामा म्हणे आम्ही जन्माजन्मांतरींचे । पोसणे घरीचे सदा तुझे ।।४।।

 

[१४१२]

 

मुंगीचिया गळा बांधोनिया मेरू । तेणे हा प्रकारू कळो आला ।।१।।

माळियाचे पोरे लपविले पोटी । तेणे जगजेठी सुख मानी ।।२।।

कुलालाचे हाती तुडविले मूल । दाखवी नवल तयासाठी ।।३।।

मजसाठी काय धरियेले मौना । धाव नारायणा नामा म्हणे ।।४।।



 

[१४१३]

 

विठ्ठल विद्गदे पुंडलिकवरदे । अनंत अभेदे नामे तुझी ।।१।।

पाव गे विठ्ठले मजलागी झडकरी । बुडतो भवसागरी काढी मज ।।२।।

आकांत अवसरी स्मरले साच । दीनानाथे ब्रीदे सत्य केली ।।३।।

स्मरली संकटी द्रौपदी वनवासी । धावोनि आलासि लवडसवडी ।।४।।

प्रल्हादे तुजलागी स्मरिले निर्वाणी । संकटापासोनि राखियेले ।।५।।

नामा म्हणे थोर पीडिलों गर्भवासे । अखंड पाहातसे वाट तुझी ।।६।।

 

[१४१४]

 

रमासिंधुमाजी सौंदर्याची धणी | ब्रीदे चक्रपाणि मिरविती ।।१।।

मेघदेहाकृति घनःश्याम मूर्ति । नटतसे भक्ती भक्तजना ।।२।।

भाक देऊनिया गौळियाचे घरी । गाई निरंतरी चारितसे ।।३।। 

इंद्र वेडावला मुनि थोर थोर । न कळेचि पार नामा म्हणे ।।४।।

 

[१४१५]

 

पांचमुखी रुद्र स्वये करी स्तुति । चहू मुखी कीर्ति वर्णी ब्रह्मा ।।१।।

देवी देव सर्व विस्मयो पावती । विठोबाची ख्याति कोण वानी ।।२।।

परीक्षितीसाठी प्राण त्यजी सर्व । रावणाचा गर्व स्वये हाणी ।।३।।

नामा म्हणे तुज सकळ समान । माझे दोष गुण मानी काय ।।४।।

 

[१४१६]

 

गुण दोष माझे पाहो नको आता । तारिसी अनंता मज आता ।।१।।

अगाध महिमा काय वानू हरी । गोकुळाभीतरी गाई राखी ।।२।।

अंबऋषीसाठी जन्म सोशियले । महत्त्वाचे केले हूड स्वये ।।३।।

नामा म्हणे तुझे नामाचेनि बळ । प्रसादे केवळ लाधलो मी ।।४।।

 

[१४१७]

 

मी तो तुझा दास न करी उदास । मायामोहपाश तोडी देवा ।।१।।

प्राण जावो परी नको करू त्याग । करी अंगसंग अंगिकार ।।२।।

अंगीकारी आता अजामेळ अंती । समान श्रीपती सम करी ।।३।।

नामा म्हणे ऐसे वर्णावे म्या किती । नामे केली ख्याति चराचरी ।।४।।

 

[१४१८]

 

वानरांच्या संगे स्वये क्षेम देसी । मज हृषिकेशी न बोलावे ।।१।।

रिसांपाशी सदा स्वभावे तुम्ही खेळा । माझिया कपाळा नातुडसी ।।२।।

पक्षि जटायूचे लेकरू तू होसी । माझ्या का मनासि नातुडसी ।।३।।

लावोनि चरण तारियेली शिळा । कोळियाचा केला अंगिकार ।।४।।

नामा म्हणे तुम्हा सांगावे म्या किती। राग माना चित्ती काय वाणु ।।५।।

 

 

[१४१९ ]

 

पतितपावना धावसी निर्वाणी । ब्रीद चक्रपाणि सत्य केले ।।१।।

काय अपराध कोणाचे पाहिले । नाही तुवा त्यागिले नष्टखळा ।।२।।

अजामेळासाठी आहार वर्जिले । बीज ते भाजिले भवमूळ ।।३।। 

नामा म्हणे नागवेचि बरे । आता उणे पुरे पाहू नका ।।४।।

 

[ १४२० ]

 

विश्वंभर नाम तुझे कमळापती । जगी श्रुति स्मृति वाखाणिती ।।१।।

गौळिया घरीचे दही लोणी चोरूनी । खाता चक्रपाणि लाजसी ना ।।२।।

आता दीनानाथा तुझे ब्रीद साचे । तरी भूषण आमुचे जतन करीं ।।३।।

येर ठेवाठेवी कायसी आता । तुम्हा विनवितो नामा केशिराजा ।।४।।

 

[ १४२१ ]

 

शरीराचा भाव तुज नाही देवा । तेथे मी केशवा काय बोलू ।।१।।

अंगदाचे अंगी बळ देसी फार । बहु उपकार कळो आले ।।२।।

तुम्हा नित्य न्याय नोव्हे साचपण । बळि तूते दान देउनि ठके ।।३।।

नामा म्हणे सदा काय म्या गाऱ्हाणें । किती नारायणे देऊ आता ।।४।।

 

[ १४२२]

 

जन्मल्यापासूनि सोशिले प्रवास | वियोग पहावयास जाले आता ।।१।।

आता एक करी धावणिया धावा । बुडतो केशवा काढी मज ।।२।। 

लाभ नव्हे हानि जाली भागाभाग । तूचि पांडुरंग पुरविसी ।।३।। 

नामा म्हणे ऐसे सर्वस्व रक्षिले । पाषाण तारिले जळामाजी ।।४।।

 

[१४२३]

 

दुर्घट ते दुःख लागो नेदी भक्ता । त्याची तुज चिंता असे फार ।।१।। 

आणिक प्रकार घडे तो निकट । पैठणी प्रकट रूप दावी ।।२।।

जेथुनि सत्वर निघाले स्वदेशा । मुक्त केलें महिषा मार्गी जाण ।।३।। 

जाणती प्रेमळ कीर्तनासी नर । समाधि निरंतर म्हणे नामा ।।४।।

 

[१४२४]

 

हिरे जळामधी भिजतील कधी । तैसे कृपानिधी केले आम्हा ।।१।।

आमुचा विकल्प आमुचा विकल्प । आमुचा विकल्प आम्हा नाडी ।।२।।

कामधेनु संगे गाढव बांधिले । तयाचे ते मोले तुके केवि ।।३।।

काय म्या करावे पाठी लागे भोग । नामा म्हणे योग्य तुझ्या हाती ।।४।।


 

[१४२५]

 

आशा मनिषा तृष्णा लागलीसे पाठी । धाव जगजेठी स्वामी माझ्या ।।१।। 

गेलासि केउता वाढिले दुश्चिता । अगा कृपावंता स्वामी माझ्या ।।२।।

नामा म्हणे मज नाही कोण गत । तारिसी अनंत स्वामी माझ्या ।।३।।


 

[१४२६]

 

तुजविण आम्हा कोण हो पोषिता । अहो जी कृपावंता पंढरिराया ।।१।।

न करी विठ्ठला आता लाजिरवाणे । मी तुझे पोसणे पांडुरंगा ।।२।। 

काकुळती कोणा येऊ हो मी आता । अनाथाचे नाथा विठ्ठला तू ।।३।। 

एक वेळ आता पाहे मजकडे । नामा म्हणे वेडे रंक तुझें ।।४।।


[१४२७]

 

माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा । केशवा माधवा नारायणा ।।१।। 

नाही नाही मज आणिक सोयरा । न करी अव्हेरा पांडुरंगा ।।२।।

अनाथाचा नाथ होसी तू दयाळा । किती वेळोवेळां प्रार्थूं आता ।।३।। 

नामा म्हणे जीव होतो कासावीस । केली तुझी आस आता बरी ।।४।।

 

 

[१४२८]

 

समर्थाचे बाळ पांघरे वाकळ । हासती सकळ लाज कोणा ।।१।। 

देव आप्त दैन्य उरे कैचे बापा । आम्हासि तू का पा विसरलासी ।।२।। 

ऐसा तू अविनाश त्रिभुवनिंचा राजा । नामा म्हणे माझा तूचि स्वामी ।।३।।

 

[१४२९]

 

आम्ही काय जाणो तुझा अंत पार । होसी तू साचार निवारिता ।।१।। 

बहु अपराधी जाण यातिहीन । पतितपावन पांडुरंगा ।।२।।

नामा म्हणे ऐसा पातकी पामर । करिसी उद्धार साच ब्रीद ।। ३।।

 

[१४३०]

 

नेणे घातमात नव्हे कळावंत । शास्त्रज्ञ पंडित तोहि नव्हे ।।१।। 

रंकाहुनि रंक संतांचा सेवक । मी नामधारक विठोबाचा ।।२।।

 नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशीळ । नव्हे मी वाचाळ तर्कवादी ।।३।। 

नामा म्हणे राया विठोचा डिंगर । नामे पैलपार पावविलो ।।४।।

(अपूर्ण)

© 2025 Sitaram Mhatre Foundation

Call us:

+91-865-735-1636

Find us: 

Sitaram Smaran, House no. 896,

Sector 19B, Koparkhairane,

Navi Mumbai

  • Pinterest
  • Twitter
  • LinkedIn
  • Facebook
  • YouTube

Website developed & maintained by:

Mhatre's Traslation & Allied Services

Sitaram Mhatre Foundation

Our Programmes:

English for ALL

Science for ALL

Computers for ALL

Memoirs of the PAP

Bhakti Literature in Unicode

bottom of page